१५ वर्षांत देशात ३८,५८५ प्रेमी युगलांच्या हत्या

0
57

– प्रेमभंगामुळे ७९,१८९ तरुण-तरुणींची आत्महत्या
– दररोज सात हत्या, ४७ अपहरण
– सर्वेक्षणातील भीषण वास्तव
नवी दिल्ली, २ एप्रिल 
मनासारखा जीवनसाथी निवडणे, प्रेम करून विवाह करणे आजही आपल्या समाजाच्या पचनी पडताना दिसत नाही. केवळ प्रेम केल्यामुळे गेल्या १५ वर्षांत देशात ३८,५८५ प्रेमी युगलांच्या हत्या करण्यात आल्या असून दहशतवादी हल्ल्यात होणार्‍या मृत्यूंपेक्षा प्रेमात बळी जाणार्‍यांचा हा आकडा सहापट अधिक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तर प्रेमभंग झाल्याने आणि त्याच्याशी संबंधित विविध कारणांनी ७९,१८९ तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.
२००१ ते २०१५ या कालावधीत प्रेमप्रकरणामुळे झालेल्या हत्यांचा आकडा सरकारने जारी केला असून त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात प्रेम प्रकरणांवरून दररोज ७ हत्या, १४ आत्महत्या आणि ४७ अपहरणाचे प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे. प्रेम केल्यामुळे किंवा प्रेमास नकार दिल्यामुळे गेल्या १५ वर्षात २.६० लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. देशात गेल्या १५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यात २० हजार लोक ठार झाले आहेत. त्या तुलनेत प्रेम प्रकरणामुळे करण्यात आलेल्या हत्यांचा आणि आत्महत्यांचा आकडा मोठा आहे. गेल्या १५ वर्षांत प्रेम केल्यामुळे झालेल्या हत्या आणि आत्महत्यांचा आकडा एकत्रित केल्यास तो एक लाखाहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या
या आकडेवारी नुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशात प्रेम प्रकरणामुळे करण्यात आलेल्या हत्यांचा आकडा सर्वाधिक असल्याचेही उघड झाले आहे. या पाचही राज्यात गेल्या पंधरा वर्षांत तीन हजारांहून अधिक हत्या झाल्या आहेत. आई-वडिलांची सहमती नसताना परस्पर विवाह करणे, आंतरजातीय विवाह, प्रेमभंग आदी कारणांमुळे या हत्या-आत्महत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पश्‍चिम बंगाल आघाडीवर
प्रेम प्रकरणात आलेल्या निराशेमुळे होणार्‍या आत्महत्यांच्या घटनांमध्ये पश्‍चिम बंगाल आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या १४ वर्षांत १५ हजार तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्या. त्यापाठोपाठ तामिळनाडूत गेल्या पंधरा वर्षांत ९,४५० जणांनी आत्महत्या केल्या. तर आसाम, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी पाच हजार लोकांनी प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.(वृत्तसंस्था)