आधुनिकेतच्या काळात सायकल रिक्षा कालबाह्य

0
61

वाशीम, ३ एप्रिल 
उदयास आलेल्या यंत्रयुगामुळे एकेकाळी भरवशाच्या सायकल रिक्षांना वाईट दिवस आले असून, ऍटोरिक्षाच्या वाढत्या प्रमाणामुळे रिक्षाचालक व त्यांचे कुटुंबीय हालाखीचे जीवन जगत आहेत. तीन चाकी ऑटोरिक्षामुळे सायकल रिक्षा आता कालबाह्य झाली आहे.
परिवर्तन हा जगाचा नियम आहे. हा नियम कोणीही मोडू शकत नाही. मात्र, या परिवर्तनाचे स्वागत करतांना परिवर्तनाच्या या चक्राखाली भरडल्या जाणार्‍यांच्या जीवनाची तजवीज करायला हे जग विसरते. अशीच काहीशी वाईट परिस्थिती एकेकाळी हमखास वाहतुकीचे साधन असणार्‍या सायकल रिक्षावाल्यांची झाली आहे.
प्रवाशांना नाममात्र दरामध्ये घरपोच सेवा देण्याचे एकमेव साधन म्हणजे रिक्षा हेच होते. मानवी श्रमाच्या मोबदल्यात हे रिक्षावाले नाममात्र पैसे घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचवित होते. या रिक्षावाल्यांच्या जीवनावर सुप्रसिद्ध विनोदी नट मेहमूद यांनी कुंवारा बाप या चित्रपटाची निर्मिती करून भारतातील रिक्षावाल्यांना कोणकोणत्या समस्यांशी दोन हात करावे लागतात, याचे दर्शन घडविले होते.
दरम्यान गतिमान युगात रिक्षापेक्षाही लवकर गंतव्यस्थळी पोहचवून देणारे साधन म्हणून जागोजागी टॅक्सी, ऑटो दिसू लागले. वेळेचा अभाव असणार्‍या भारतीयांनी या साधनांकडे धाव घेतली. दिवसाकाठी १०० ते २०० रुपये कमावून आपल्या कुटुंबाची गुजराण करणारा रिक्षावाला या यंत्रयुगाच्या आक्रमणामुळे पुरता हतबल झाला आहे. नैराश्येच्या पोटी व्यसनाधीन होत आहे.
ऑटो, टॅक्सीचा उदय झाल्यानंतर अनेक बेरोजगारांना कमाईचे साधन मिळाले. ज्यांच्याजवळ पैसा आहे, आर्थिक पाठबळ असणार्‍यांनी ऑटोचा व्यवसाय सुरू केला. मात्र, ज्याच्याकडे तीनचाकी भाड्याची रिक्षावाला आहे, तो कुठून ऑटो विकत घेणार? जो रिक्षावाला झोपडपट्टीत राहतो, ज्याच्याकडे स्वत:च्या कुटुंबाला राहण्याचे सुध्दा हक्काचे घर नाही तो लाख रुपयाची टॅक्सी कुठून विकत घेणार? त्यामुळे जीवनाचा सामना करण्यास हतबल ठरलेल्या अशा अनेक रिक्षावाल्यांनी आपल्या जीवनाला व्यसनाच्या खाईत लोटले आहे.
भारतात एकेकाळी विकासाला हातभार लावणारे
अनेक घटक आहेत जे आज परिवर्तनाच्या चक्राखाली भरडल्या जात आहेत. सरकारला त्यांच्या समस्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. (तभा वृत्तसेवा)