प्रासंगिक करारांसाठी एसटी सज्ज

0
61

मात्र प्रवास टाळण्याचा सल्ला
अकोला,३ एप्रिल 
उन्हाळा आणि सर्वत्र लग्नसराईची धूम या महिन्यापासून सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने लग्नकार्यासाठी प्रासंगिक करार व ग्रूप बुकिंगवर जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. विभागाच्या वतीने एप्रिल ते जूनपर्यंत या जादा गाड्यांचे नियोजन देखील केले गेले आहे. असे असताना काही प्रमाणात नियमित प्रवासी गाड्या या लग्नसराईत जाणार नसल्याने लग्न मुहूर्तावर प्रवास टाळावा, असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील जाणकार देतात. त्याचे नियोजन आतापासूनच करावे, असेही सल्लागारांचे म्हणणे आहे. प्रवास आनंदायी होण्यासाठी हे नियोजन आवश्यक असून लहान मुलांना उन्हाचा व प्रवासाचा त्रास नको यासाठी काळजी घेण्याची गरज वर्तवली जात आहे. एप्रिलमध्ये चार दिवस, मेमध्ये पंधरा दिवस, तर जून मध्ये १४ दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत. या तारखांना शक्यतो प्रवास टाळण्याची गरज वर्तवण्यात आली आहे.
उन्हाळी सुटीसाठी गावाला जाणार्‍या प्रवाशांसाठी विभागाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एसटी महामंडळकडून देण्यात आली. हंगामी भाडेवाढीबद्दल अद्याप कोणतेही संकेत नसल्याने चालू दराप्रमाणेच प्रवाशांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य परिवहन महामंडळामार्फत एप्रिल, मे व जून २०१७ हा उन्हाळी गर्दीचा हंगाम असल्याने या महिन्यात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा वाहतूक करण्यात येते.
अकोला विभागातर्फे लग्नकार्यासाठी प्रासंगिक करार व ग्रूृप बुकिंगवर बसेस देण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, ज्यांना लग्नकार्यासाठी अथवा अन्य बाबींकरिता बसेस बुक करावयाच्या आहेत त्यांनी देखील आगाराशी संपर्क सुरू केला आहे.
विवाह मुहूर्तांच्या दिवशी प्रवासी मागणीनुसार जादा वाहतूक करण्यात येणार असून मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील वाहतुकीवर यामुळे मोठा परिणाम होतो. तो टाळण्यासाठीचे नियोजन एस.टी.चे आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी या काळात प्रवासाचा योग नको, असे म्हणत प्रवास लग्न मुहूर्तापूर्वी करा किंवा नंतर करा, असाच सल्ला दिला आहे. (तभा वृत्तसेवा)