स्टेट बँकेच्या बेस रेटमध्ये कपात

0
43

– कर्ज स्वस्त होणार
नवी दिल्ली, ३ एप्रिल 
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एसबीआयने बेस रेटमध्ये ०.१५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे एसबीआयच्या कर्जाचा बेस रेट आता ९.२५ वरून ९.१० टक्के झाला आहे. बेस रेट कमी केल्याने कर्जदारांच्या व्याजात कपात होऊन, कर्ज स्वस्त होईल. एसबीआयचे नवे व्याजदर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत.
कुणाला थेट फायदा?
एसबीआयच्या बेस रेटमध्ये घट करण्याचा फायदा बँकांच्या जुन्या ग्राहकांना मिळेल आणि त्यांच्या गृहकर्जाचा व्याज दर ९.२५ टक्क्यांवरून ९.१० टक्के होईल. बेस रेट स्वस्त झाल्याने ग्राहकांचे गृहकर्ज, वाहनकर्ज, खाजगी कर्ज, व्यावसायिक कर्ज इत्यादींवरील व्याज दर कमी होतील. एसबीआयच्या बेस रेटमधील कपातीमुळे कर्जाच्या ईएमआयमध्ये वर्षाकाठी किमान २ हजार रुपये बचत होईल.
नव्या ग्राहकांसाठी
एसबीआयच्या बेस रेट कपातीमुळे नव्या ग्राहकांना स्वस्त कर्जाचा फायदा मिळणार नाही. कारण नव्या ग्राहकांच्या कर्जावरील व्याज एमसीएलआरच्या मार्फत निश्‍चित होते. सध्या एसबीआयचे १ वर्षांसाठीचे एससीएलआर ८ आणि २ वर्षांसाठीचे एमसीएलआर ८.१ टक्केआहे.
बेस रेट म्हणजे काय?
बँकांमध्ये एक किमान दर असतात, ज्यांवर आधारित बँका आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारचे कर्ज देतात. त्या दरांना बेस रेट म्हणतात. कोणतीही बँक बेस रेटपेक्षा कमी दरात ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाहीत. याची खबरदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली जाते. (वृत्तसंस्था)