भाजपाची विजयी घोडदौड

0
63

अन्वयार्थ
‘भारतीय जनता पार्टी’ या पक्षाचा उदय ६ एप्रिल १९८० ला झाला. अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पाहिले अध्यक्ष होते. तसे पाहिले तर या पक्षाची सुरुवात १९५१ साली ‘जनसंघ’ या नावाने श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली. १९५१ पासून १९८० पर्यंत अनेक मातब्बर लोकांनी जनसंघाचे नेतृत्व केले. यात प्रामुख्याने श्यामाप्रसाद मुखर्जी, बापूसाहेब सोहनी, आचार्य रघुवीर, प्रा. देवप्रसाद घोष, पंडित बच्छाराजजी व्यास, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता.
६ एप्रिल १९८० ला अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आपली घोडदौड सुरू केली. १९८४ साली भाजपाने प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपाचे २ खासदार निवडून आले. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर कॉंग्रेसने ४०४ जागा जिंकल्या.
१९८४ नंतर झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकीत वर्ष २००९ वगळता कॉंग्रेस कमी कमी होत गेली, तर उलट १९८४ नंतर झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकीत वर्ष २००४, २००९ वगळता भाजपा वाढत गेली. १९८४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ५० टक्के मते मिळाली, पण २०१४ मध्ये ती १९.५ टक्केपर्यंत खाली आली. १९८४ मध्ये भाजपाला ७ टक्के मते मिळाली होती. ती वाढून २०१४ मध्ये ३१.३ टक्के झाली, जी कॉंग्रेस १९८४ मध्ये ४०४ वर होती ती आता ४०४ मधला ‘०’ गायब होऊन ४४ वर पोहोचली व १९८४ मध्ये २ वर असलेली भाजपा २०१४ मध्ये २८२ वर पोहोचली.
भाजपा सध्या १० राज्यांत स्वबळावर सत्तेत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, आसाम, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश.
भाजपाचे तीन राज्यात युतीचे सरकार आहे- महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर.
एकेकाळी संपूर्ण भारतात सत्तेवर असलेली कॉंग्रेस आता फक्त ५ राज्यात सत्तेवर आहे-कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, पंजाब. २०१७ ची उत्तरप्रदेशची निवडणूक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे, असे सांगितले गेले. २०१२ च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपाला ४७ जागा मिळाल्या होत्या. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपाला ३१२ जागा मिळाल्या. हे मिळालेले यश असाधारण असे आहे. या पूर्वी १९९१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला २२१ जागा मिळाल्या होत्या.
२०१२ साली समाजवादी पक्षाला स्वबळावर २२५ जागा मिळाल्या होत्या. पण, २०१७ च्या निवडणुकीत समाजवादीने, उत्तरप्रदेशात कोणतेही अस्तित्व नसलेल्या कॉंग्रेससोबत युती केली. २०१७ च्या उत्तरप्रदेश निवडणुकीत कॉंग्रेसचे पुरे पानिपत झाले. त्यांच्या जागा उत्तरप्रदेशात हातावर मोजण्याइतक्या राहिल्या. दोघांना मिळून केवळ ५४ जागांवर समाधान मानावे लागले. मायावतींच्या बसपाचेपण पूर्ण पानिपत झाले. कॉंग्रेसचा सफाया करून भाजपाने उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमत मिळवले. कॉंग्रेसने स्वबळावर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार टक्कर दिली. मणिपूरमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली व २०१२ मध्ये ० असलेली भाजपा २१ वर पोहोचली. आतापर्यंत पूर्वोत्तर राज्यात भाजपाचे कधीच अस्तित्व नव्हते, पण गेल्या तीन वर्षांत आसाम, अरुणाचल प्रदेश आणि आता मणिपूरमध्ये जवळजवळ सत्तेपर्यंत पोहोचणे, हे भाजपाचे यश नक्कीच अधोरेखांकित करते. गोवा आणि मणिपूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण, भाजपाने चतुराई दाखवून दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन केली. विरोधी पक्षांनी नोटबंदीच्या मुद्यावरून मोदींवर प्रखर टीका केली. पण, जनतेने नोटबंदीचे समर्थन करून विरोधी पक्षाची हवा काढून टाकली. जर जनता नोटबंदीच्या विरोधात असती तर त्याचा परिणाम मतदानात दिसला असता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदी यांना मिळालेले यश पाहता, मोदीलाट ओसरली, असे हिणवणारे आता कुठे आहेत?
२०१७ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश व उत्तराखंडात भाजपाला मिळालेले यश पाहता, नरेंद्र मोदींची लाट अजूनही कायम आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. सध्या भाजपाचे देशात असलेले समर्थन पाहता, देशातल्या जवळपास ५८ टक्के जनतेचे समर्थन भाजपाला मिळाले आहे. भाजपाची ही घोडदौड अशीच कायम राहणार, यात शंका नाही.
– प्रशांत देशमुख
९४२०८४५२९३