अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करू नका

0
51

-• भारताने चीनला ठणकावले
-• दलाई लामांच्या तवांग भेटीचा मुद्दा
नवी दिल्ली, ४ एप्रिल 
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचलप्रदेशच्या तवांग येथील दौर्‍यावर आक्षेप घेणार्‍या आणि भारताला परिणामांची धमकी देणार्‍या चीनला भारताने आज मंगळवारी अतिशय कठोर शब्दात ठणकावले. अरुणाचल हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि भारताचे अतिथी असलेले दलाई लामा देशातील कोणत्याही राज्याला भेट देऊ शकतात. त्यामुळे चीनने भारताच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करू नये, अशी स्पष्ट ताकिद भारत सरकारने दिली.
भारताने आजवर कधीच चीनच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप केला नाही. ‘एक चीन धोरण’ आम्ही स्वीकारले आहे. तेव्हा चीननेही भारताच्या अंतर्गत व्यवहारात लक्ष द्यायला नको, असे आम्हाला वाटते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दलाई लामा तिबेटचे धार्मिक गुरू असून भारतात त्यांचा आदर केला जातो. त्यांच्या भेटीवरून कोणलाही कृत्रिम वाद निर्माण करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दलाई लामा यांची अरुणाचल भेट पूर्णपणे धार्मिक स्वरूपाची आहे. त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. अरुणाचल हे भारताचेच अंग आहे. हा वादग्रस्त प्रदेश मुळीच नाही.
सीमेवरील चिन्हांकनावरून भारत आणि चीनमध्ये काही मतभेद असू शकतात, पण अरुणाचलवरून चीनने भारताला धमक्या देण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे या राज्यात कोण येते आणि कोण जाते, यावर आक्षेप घेण्याचा चीनला अधिकारच नाही, असेही रिजिजू यांनी सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचाही आक्षेप
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही चीनच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला आहे. दलाई लामा यांच्या तवांग भेटीवरून चीन कृत्रिम वाद निर्माण करीत आहे. दलाई लामा हे धार्मिक नेते असून, भारतात सर्वत्रच त्यांना आदर केला जातो, हे भारताने यापूर्वी वारंवार स्पष्ट केले असल्याचे मंत्रालयातील प्रवक्त्याने सांगितले.
दलाई लामांच्या दौर्‍यात बदल
दरम्यान, खराब हवामानामुळे दलाई लामा यांच्या तवांग दौर्‍यात काही बदल करण्यात आला आहे. हवामान खराब असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना कारने हा प्रवास करावा लागला. हेलिकॉप्टरने ते आजच तिथे पोहोचणार होते. पण, आता ते तवांगला उद्या बुधवारी पोहोचणार आहेत. (वृत्तसंस्था)