एका लग्नाची डोंगराएवढी गोष्ट…

0
140

अन्वयार्थ
माणूस आता काहीच करण्यासारखे शिल्लक नाही, अशा स्थितीत लग्न करतो आणि मग लग्न केले असल्याने बरेच काही करत आयुष्य घालवितो. तरीही इतर प्राणी विवाह करत नाहीत आणि मग माणूसच ते का करतो, असा सवाल भाबडेपणा म्हणा, पण आपल्याला अनेकदा पडला आहे. अनेक लोक नेमके लग्न का करतात, असाही एक सवाल नेहमीच पडत आला आहे. त्यात सानथोर सारेच आहेत. त्यात हिटलर हा अग्रणी आहे. आता जगाला हलवून सोडणार्‍या या माणसाने(!) इव्हा ब्राऊन या त्याच्या अखंड मैत्रिणीशी नेमके मरायच्या दोन तास आधी का विवाह केला, असा सरळ प्रश्‍न गेली अनेक वर्षे पडला आहे. इव्हाच्याबाबत ‘अखंड मैत्रीण’ असा उल्लेख यासाठी की, त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या. त्याच्या जगण्याच्या शैलीचे सार्वजनिक प्रदर्शन अन् मांडणी वेगळी होती आणि त्याचे खासगी आयुष्य फारच वेगळे होते. म्हणजे तो राष्ट्राचाच नेहमी विचार करायचा अन् त्यासाठी त्याने सचोटीने जगण्याचा मार्ग स्वीकारला होता. तो चित्र काढायचा आणि ती विकून त्यावर त्याचा निर्वाह चालायचा, असे मांडले गेले. तो जर्मनीचा चान्सलर असतानाही एक किंवा दोन ड्रेसच असायचे… ‘मी दासी हिटलरची’ हे अत्यंत दुर्मिळ पुस्तक आहे आणि त्यात त्याच्या ‘थर्ड रीश’ मधून जिवंत राहिलेल्या एका जर्मन वंशाच्या, पण ज्यूसोबत विवाह केलेल्या नर्सने त्याच्या वार्डरोबचे वर्णन केले आहे ते डोळे दीपविणारे आहे… तरीही सवाल तो नाहीच. जगातील यच्चयावत माणसांवर प्रभाव टाकणार्‍या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात असली विसंगती असतेच. मूळात प्रत्येकच माणसाच्या आयुष्यात विसंगती असतातच. माणसाचे जगणे हेच एक ढोंग असते. त्यामुळे हिटलर त्याला अपवाद असूच शकत नाही. विचार त्याच्या विवाहाचा… आयुष्यभर इव्हा त्याला विवाहासाठी आळवत राहिली आणि तो, ‘‘माझे जर्मनीच्या जनतेशी लग्न झाले आहे, आता दुसरा विवाह मी कसा करू?’’ असे तिला विचारत राहिला. असे असताना त्याने इव्हाची अखेरची इच्छा म्हणून तिच्याशी विवाह केला. मरणे समजून घेता येईल, पण विवाह? दोन तास आधी विवाह करण्याचे कारण काय? वि. का. राजवाड्यांचे ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ यासह या विषयावरची अनेक पुस्तके वाचून झाली, पण हा सवाल मात्र अजूनही कायम आहे…
विवाह म्हणजे नेमके काय? अगदी साठेक वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाची पत्रिका, ‘अमक्याचा तमकीशी शरीरसंबंध जुळलाअसे’ असा स्पष्ट उल्लेख असलेल्या असायच्या. खरे सांगायचे तर माणसाची रक्ताची नाती ही शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधांसाठीच निर्माण झालेली असतात. मनाचे मनाशी असलेले नाते केवळ मैत्रीचे… अर्थात तेही दिवास्वप्नच! आजकाल नागरीकरण झालेला म्हणजे ‘सीव्हिलाइज्ड’ समाज विवाहाला पर्याय शोधू लागला आहे.
तरीही विवाह काही थांबलेले नाहीत. फार पूर्वी ‘किस्त्रीम’ या मासिकात प्रख्यात विनोदी लेखक वि. आ. बुवा यांचे प्रश्‍नोत्तराचे एक सदर चालायचे. त्यात त्यांना एका वाचकाने प्रश्‍न विचारला होता, ‘‘प्रेम म्हणजे काय?’’ त्यांनी उत्तर मात्र अत्यंत गंभीर दिले होते, ‘‘निसर्गाने त्याची प्रजोत्पादनाची गरज भागवून घेण्यासाठी दोन भिन्नलिंगी जिवात निर्माण केलेला तो भ्रम असतो…’’
आता हा सवाल यासाठी पडला आहे की, पुन्हा एक डोंगराएवढा विवाहसोहळा येत्या ९ एप्रिलला नागपुरात होऊ घातला आहे. राम इंगोले नावाच्या तालेवार फकिराच्या लेकीचा हा विवाह आहे. राम इंगोले कोण, असा सवाल या समाजाला पडू शकण्याइतका आपला समाज कृतघ्न आहेच म्हणून सांगून टाकतो… जांबुवंतराव धोटे हे त्यांच्या भरारीच्या काळात फळ म्हणून सूर्यच खायला निघालेल्या हनुमंतासारख्या अचाट लीला करायचे. त्यांनी त्या काळात (१९७०-७२ असावे) नागपुरातील बदनाम वस्ती ‘गंगा- जमुना’त जाऊन तिथल्या स्त्रियांचा भगिनी म्हणून स्वीकार केला. त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. त्यात अनेक कार्यकर्ते होते. राम इंगोले हा बावीस-पंचविशीतला तरुण त्यातलाच एक. वर्तमानपत्रात बातमी आली. छायाचित्रे झळकली. तसे या घटनेचे महत्त्व संपले होते. मात्र, रामभाऊला काही झोप लागली नाही. आपण देहविक्रयाचे लाजिरवाणे जिणे ज्यांच्यावर लादले त्या अभागिनींना भगिनी मानले तर मग आपले काही कर्तव्य आहे, असे त्याला वाटले आणि त्याने त्या भगिनींच्या चुका आपल्या शेल्यात बांधण्याचे ठरविले. त्यांची शरीरधर्माच्या अगतिकतेने जन्मास आलेली लेकरं स्वीकारली. आईच्या नावाने ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना केली. या असिधाराव्रतासाठी त्याने उपसलेले कष्ट आणि वाट्याला आलेला उपहास यावर फार बोलणार नाही. अव्यक्ताच्या अवकाशात प्रज्ञेचा वापर करून सुज्ञांनी तो समजून घ्यावा. एवढेच की, बाळ म्हणून तिथून आणलेल्या मुली वयात आल्या की दलालांच्या डोळ्यात भरायच्या. इथपासून राम इंगोले चांगले काम करतो, असे अभिनिवेशाने म्हणणारा पांढरपेशा समाज रामच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली की मात्र अंगावर पाल पडल्यागत झटकायचा इथवर सारेच या ‘रामकथेत’ समाविष्ट आहे.
नंतर त्याने पोटासाठी परागंदा अवस्थेत जिणे जगणार्‍या मजुरांची लेकरंही विमलाश्रमाच्या सावलीत आणली. पालकांचा अभाव असलेले अनेक दुर्दैवी जीव स्वत:च ‘राममामा’चा पत्ता शोधत त्याच्याकडे जाऊ लागले. लोकही आपण फार मोठे काम करतोय्, असा आव आणत अनाथ लेकरं रामाच्या उंबर्‍यावर सोडू लागली. विमलाश्रम बहरला… खरेतर ही दुर्दैवी बाब आहे. रामभाऊने विवाह केला नाही. त्याच्या आश्रमातली ही मुलं आता शिकली, सवरलीही… कारण त्याचे कायमचे म्हणणे हेच की, माझ्या लेकरांना मला केवळ जगवायचे नाही, वाढवायचेही नाही. त्यांना प्रतिष्ठित नागरिक म्हणून या समाजात त्यांच्या हक्काचे स्थान मला मिळवून द्यायचे आहे. त्याच्या आश्रमातली एक लेक दिल्लीत एका बड्या कॉर्पोरेट कंपनीत सीईओदेखील आहे!
नवर्‍याला ‘नाथ’ म्हणण्याचा प्रघात आपल्या समाजात आहे. मात्र, रामभाऊंच्या आश्रमातील कन्यांचा ‘नाथ’ होण्याचा मर्दपणा गाजविण्याचा पुरुषार्थ कुणी दाखवायला तयार नसतो. आता बी. एड. झालेल्या त्याच्या एका कन्येचा विवाह येत्या ९ एप्रिलला आहे. ती उपवर झाल्यावर आपल्या दयाभूत समाजाने तिच्यासाठी स्थळे नेण्याचा मोठेपणा दाखविलाना… एक जण गेले. रामला त्यांनी प्रस्ताव दिला. मुलगा श्रीमंत. शेतीवाडी, घरी किराण्याचे बडे दुकान. मुलाला काहीच नको. उलट ‘पार्टी’च चार-दोन लाख देणार रामच्या आश्रमाला देणगी…
मुलगा ४५ चा. व्यवसाय आणि व्यवहार लहान भाऊच बघतो. काय आहे मुलाच्या डोक्यात थोऽऽडा फरक आहे… मुलगी २३ वर्षांचीच ना केवळ. फार अंतर नाही वयात… असेही. रामने अशांना वाटेला लावले. माझी मुलगी अव्यंग्य आहे. पूर्ण स्त्री आहे. तिला तिचे जगणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे… त्याला तिचा विवाह करायचाय् कारण त्याच्या आश्रमाची पुढची पिढी आहे- ‘विमलाश्रम घराण्याची’ पुढीची पिढी आहे. रामभाऊ आता थकला आहे. त्याने या कामासाठी कधीही शासकीय मदत, अनुदान वगैरे घेतले नाही. कुणी मदत करायला गेलेही तर तो, या मुलांशी तुम्ही नाते जोडा, अशी विनंती करायचा. प्रतिष्ठित घरची मुलं तुमच्या घरी ‘काका’, ‘मामा’, ‘दादा’, ‘आत्या’, ‘मावशी’, ‘काकू’ म्हणून येतात तितक्याच हक्काने ही मुलंही तुमच्या घरी येऊ शकली पाहिजेत. हे मान्य असेल तर मदत करा…
आता या मुलीसाठी त्याने एक गरीब, पण होतकरू मुलगा शोधला आहे. त्याला १० हजार पगार आहे एका कंपनीत. मुलीचे पालकत्व आयएएस दाम्पत्य प्रवीण आणि पल्लवी दराडे यांनी आधीच स्वीकारले आहे. तेच कन्यादान करणार आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांत मागे अधीक्षक असणारे आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा हे मामा म्हणून उपस्थित राहणार आहेत…
माणसाच्या आयुष्यात विवाहाची यथार्थता आणि सार्थता कशी, या कधीच्या पडलेल्या प्रश्‍नाचे उत्तर किमान मला तरी या विवाहाने सापडले आहे. आपल्यात कुणाला आशीर्वाद देण्याची खर्‍या अर्थाने धमक आहे, असे वाटत असेल तर या लग्नाला निमंत्रण नसतानाही हजेरी लावावी. अहेर नेऊ नये; पण… पण, रामभाऊच्या पदरी दोनशेच्या पलीकडे मुलं-मुली आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारता येत असेल, त्यांना रोजगार, नोकरी देता येत असेल तर नक्की द्यावी. त्यासाठी रामभाऊचा पत्ता, संपर्क वगैरे देणार नाही. खरी कळकळ असेल तर अनेक जण तो शोधून घेतील…
– श्याम पेठकर