संगीताचे अध्यात्म जाणणारी गायिका!

0
85

अग्रलेख

संगीताचे आपले एक विज्ञान असते, असे मानले जायचे. त्याचे अध्यात्मही असते, हा साक्षात्कार किशोरीतार्ईंना आधी झाला आणि मग त्यांनी रागांच्या आध्यात्मिक गाभार्‍यापर्यंत पोहोचण्याचा प्रवासच आरंभला.

बहरू लागलेल्या चैत्रात कोकिळेने बडा ख्याल, छोटा ख्याल आळवून आता बंदिशी गायला सुरुवात केली असता आता चैत्र सर्वांगाने गाऊ लागेल, असे वाटत असताना अन् सुरांनाही सुगंधाचा मोहोर दाटून आलेला असताना त्या गेल्या… किशोरीताईंचा जन्म झाला तेव्हा भारतीय चित्रपट संगीताचा चैत्र नेमका असाच त्याच्या सर्व कलांनी बहरू लागलेला होता. ‘आलमआरा’ या पहिल्या बोलपटाचा तो काळ होता. चित्रपट बोलका होणे, ही वैश्‍विक दृक्‌श्राव्य माध्यमात एक क्रांतीच होती. त्या काळात नेमका या अभिजात गायिकेचा जन्म व्हावा, हा काही निव्वळ योगायोग नव्हता; पण नियतीचे असले संकेत त्यांचे गूढ उकलून कळू लागायला नक्कीच वेळ लागत असतो. नियतीचे संकेत असे स्पष्ट असते, तर मग त्यातील गंमतच संपली असती. आता जागतिकीकरण माणसाच्या जगण्याच्या सर्वच विधांमध्ये आविष्कृत होऊ लागले असताना संगीताचे क्षेत्र त्यापासून वेगळे कसे राहणार? पॉप, जॉजपासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापर्यंत सार्‍याच सुरावटी सप्तसुरांचा तळ शोधू लागल्या असताना आणि वैश्‍विक गाण्याचे पंचप्राण निसर्गात भरून राहिलेल्या संगीताला नियमांच्या शिस्तबद्ध चौकटीत बांधून गाणार्‍याच्या गळ्यात त्यांची स्थापना करण्याचे नेमके अध्यात्म गवसू लागले असताना, संगीतर्षी किशोरीताईंचे जाणे हा कसला संकेत आहे?
कुठल्याही व्यक्तीच्या यशस्वी जगण्याचा आलेख मांडण्याचा करंटेपणा आपण करतच असतो. तो करंटेपणा यासाठीच, की आपण त्या कलावंतांचे, सृजनाचे यश हे त्याच्या भौतिक मिळकतीत मोजत असतो. त्यांनी कुठल्या चित्रपटाची गाणी गायली, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, त्यांच्या नावावर कुठली गाणी आहेत, ते किती मानधन घेत… यावरच आपण त्यांचे कलावंत म्हणून अलौकिकत्व शोधत असतो. मागे एका प्रख्यात सतारवादकाची भेट झाली. त्यांचा कार्यक्रम ऐकून मन तृप्त झाले होते. काय षड्‌ज लागला होता आज, अशी सहज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘षड्‌ज लगे इसलीए तो हम जिंदगी निकाल देते हैं. किसी अलौकिक पल मे वह लग जाता हैं. आप तारीफ करतें हैं… हमे तो पताही नही चलता!’’ हे इतके अस्तित्वाच्या पल्याडचे असते. किशोरीताई त्या पातळीच्या गायिका होत्या. त्या कुठल्याही रागाच्या प्राणतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अत्यंत प्राणपणाने करायच्या. संगीताचे आपले एक विज्ञान असते, असे मानले जायचे. त्याचे अध्यात्मही असते, हा साक्षात्कार किशोरीतार्ईंना आधी झाला आणि मग त्यांनी रागांच्या आध्यात्मिक गाभार्‍यापर्यंत पोहोचण्याचा प्रवासच आरंभला. त्यासाठी मग लौकिक मिळकतींकडे, कलावंतांना त्यांची कला देत असते त्या श्रीमंतीकडे पाठ फिरवावी लागते. त्याचमुळे ताईंच्या मैफली झडल्या नाहीत असे नाही, त्यातून त्यांनी कधी ‘मी’पण उजागर होऊ दिले नाही. एखादी मैफल झाली आणि मग कुणी, ‘‘आज किशोरीताईंचा भूप काय लागला होता…!’’ अशी प्रतिक्रिया दिली तर ताई तो आपला पराभव मानायच्या. ‘‘आज काय भूप अवतरला!’’ इतकाच अहसास रसिकांची तहान आणखी वाढवून गेला तर तो गायिका म्हणून माझा विजय आहे, असे त्या मानायच्या. प्रत्येक मैफल वेगळी असते आणि तिचे तसे असणे हेच जिवंतपणाचे लक्षण असते, हे अधोरेखित झाले असले की, मग ‘मी’पण सहज गळून पडत असते. बा. भ. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘पक्व फळापरी ‘मी’पण माझे गळले रे…’ ही अवस्था कलावंतांचा पार्थिवभाव संपविणारी असते. ती गाठण्यासाठी प्रचंड साधना लागते. ती करण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास आणि अध्यात्माचा ध्यास असावा लागतो. त्यासाठी स्वत:च्या पातळीवर साधक नास्तिक असावा लागतो आणि ध्यासविषयाच्या बाबत त्याचे आस्तिकपण प्रज्वलित झालेले असावे लागते. कारण विज्ञान हे नास्तिक माणसाचे अध्यात्म असते आणि अध्यात्म हे आस्तिक माणसाचे अध्यात्म! किशोरीताईंनी सृजनाला अवगत असाव्या अशा या जगात असलेल्या दोन्ही भाषा अवगत केल्या होत्या. साधनेत ‘बागेश्री’ राग गात असताना त्या इतक्या समर्पित झाल्या की, त्या रागाचा स्वभाव त्यांच्या पार्थिव आणि अपार्थिव जाणिवांत अवतरित झाला. तो क्षण होता त्यांच्या साधी गायिका ते आज सार्‍या जगाला ज्ञात असलेली किशोरी आमोणकर होण्याचा! ‘रागाला तुम्ही समर्पित झाला नाहीत तर तो आविष्कृत होतच नाही,’ हे सूत्र त्यांनी जगाला दिले. या ध्यासपर्वातून झालेल्या अभ्यासातून ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ साकारला. किशोरीताईंच्या मातोश्री मोगुबाई कुर्डीकर या, त्या काळातील एक तपस्वी आणि तालेवार कलावंत. त्या अल्लादिया खॉंसाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या एक कसदार आणि पेचदार गायिका होत्या. त्यांच्याकडूनच ताईंना हा वारसा मिळाला, हे मानणे म्हणजेही आपल्या कलाजाणिवा त्रोटक असण्याचेच द्योतक आहे. कारण, कला जीन्समधून पाझरत नाही. कला हेच आपले प्राण आहे, याचा साक्षात्कार ती कला धारण करणार्‍या कुडीला व्हावा लागतो. तो किशोरीताईच काय, कुठल्याही कलावंताला होण्याचा नि मग त्याचे वहन, निभाव करण्याची कसरतल साधना त्याची त्यालाच करावी लागत असते. ‘कलेसाठी कला,’ हेच ताईंचे जगणे होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल घटना आणि प्रसंगांची चर्चा निघतच नाही. किशोरी आमोणकर यांच्याबद्दल चर्चा सुरू होते ती संगीतानेच आणि ती संपतेही संगीतावरच…! ‘‘मैफल सुरू होते, मी शांत सूर लावते. टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या सुरातला सैतान जागा होतो, मैफल तिथेच संपते…’’ हे ताईंचे वचन कलासाधकांचा मंत्रच आहे! संगीत ही कला म्हणून बहिर्मुख असली, तरीही प्रक्रिया म्हणून ती अंतर्मुखच असते, हे त्यांच्या गाण्यातून पटवून देणारी एक ऋषितुल्य गायिका आज देहातीत झाली आहे. अशा विभूतींचे शरीर हे कलात्मकता प्रसवण्याचे माध्यम असते. अशी माणसं अनंतात विलीन होत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाचे गाणे होऊन ते निर्गुणात विलीन होत असते. आता तसेच झाले आहे…!