‘योद्धा मोदीं’चा सर्वोत्तम क्षण!

0
341

५० वर्षांपूर्वी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी कोझीकोड (कालिकत) येथे जनसंघाचे अध्यक्ष या नात्याने जे ऐतिहासिक भाषण दिले होते, त्यात महिषासुरमर्दिनी दुर्गेचे स्मरण करून त्यांनी भारतमातेच्या अशा स्वरूपाचा उल्लेख केला होता, जी दुष्टांचा असा विनाश करेल- जसा दुर्गेने केला होता.
२०१६ मध्ये ५० वर्षांनी नियतीने हा योगायोग नरेंद्रभाई मोदींसमोर प्रस्तुत केला आहे की, त्यांनीही दीनदयालजींची वचने आत्मसात करीत, दुष्ट पाकिस्तानचे कठोरपणे निर्दालन केले पाहिजे.
पाकिस्तान योग्य मार्गावर यावा, दोघांचे संबंध चांगले होवोत आणि भारत आर्थिक विकासाच्या मार्गावर लक्ष केंद्रित करून पुढे जावा, यासाठी सामान्य अपेक्षांची कक्षा असामान्य स्वरूपात वाढवून नरेंद्र मोदींनी एवढे प्रयत्न केले की, कट्‌टर विरोधकही हैराण झाले. काबूलवरून लाहोरला जाणे, नवाज ‘शरीफ’ यांना लोकशाहीवादी आणि शांततापूर्ण मार्गाने समजावणे, ही अशी अभूतपूर्व आणि साहसी पावले गणली गेली, ज्याची शत्रूनेही मुळीच अपेक्षा केली नव्हती. मात्र, पाकिस्तानने नरेंद्र मोदींच्या सहज, सज्जन व्यवहाराचे उत्तर पठाणकोट आणि उरी येथे हल्ला करून आपल्याला सुधारण्याची इच्छा नाही, हे दर्शवून दिले.
आम्ही त्या परंपरेचे पाईक आहोत ज्यात शिशुपालालाही ९९ वेळा संधी दिल्यानंतर शेवटी सुदर्शनचक्राने त्याचे शिर धडापासून वेगळे करावेच लागले. श्रीरामांनी सागराला विनयाने, नम्रतेने वाट करून देण्याची विनंती केली, तेव्हा त्याने हे लक्षात घेतले नाही. तेव्हा लक्ष्मणाने म्हटले ‘काटहि ते कदरी’ ले. काहींना शक्तीचीच भाषा समजते. पाकिस्तानचेही तसेच आहे. भारताविरुद्ध उघडउघड अर्थात आमनेसामने युद्ध जिंकण्याची पाकिस्तानची क्षमता राहिलेली नाही. त्यांची सेना युद्धाला घाबरते. १९४७ नंतर पाकिस्तानी लष्कराने उघडउघड कुठलेही युद्ध लढले नाही. १९४७-४८ मध्ये त्याने टोळीवाल्यांना (कबायली) समोर केले, १९६५ मध्ये रेंजर्सचा आधार घेतला, १९७१ मध्ये युद्ध केले ते एवढे कौशल्यशून्य होते की ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना शरण यावे लागले.
अमेरिकेच्या डॉलर्सची खैरात आणि अधिकार्‍यांच्या सरंजामशाहीवृत्तीमुळे पाकिस्तानी सैन्यात नियमशून्य, नीतिभ्रष्ट रानटी लोकांची गर्दी गोळा केली आणि तो देश थेट युद्धाऐवजी दहशतवाद्यांच्या खांद्यावरून भारतावर लपूनछपून वार करणे अधिक सुरक्षित समजतो. त्यातच पाकिस्तानकडून मिळणारी अणुहल्ल्याची धमकी फारच पोरकटपणाची आणि आपला पराभव कबूल करण्यासारखी आहे. भारताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात स्पष्ट केले आहे की, तो पाकिस्तानच्या अण्वस्त्रहल्ल्याच्या धमकीपुढे मान तुकवणार नाही आणि या धमकीची कुठलीही पर्वा न करता पाकिस्तानविरुद्ध दंडात्मक कारवाई करेलच. पाकिस्ताजवळ जर अण्वस्त्रांचे बटन असेल, तर भारताजवळही आहे आणि पाकिस्तानने कुठलेही वेडेवाकडे पाऊल जर उचलले, तर त्याला जबरदस्त उत्तर देण्यासाठी आमच्याजवळ त्याच्या कित्येकपट अधिक शक्ती आणि सामर्थ्य आहे.
सध्याच्या परिस्थितीत जगभरात पाकिस्तान एकटा पडला आहे. रशिया, चीन, अमेरिका, फ्रान्ससारखे देश, ज्यांचे परराष्ट्रधोरण परस्परविरोधी आहे, प्रथमच पाकिस्तानविरुद्ध एका सुरात बोलत आहेत. चीन, पाकिस्तानसमर्थक आणि त्याच्या अणुकार्यक्रमाला मदत करणारा आहे तसेच तो भारताविरुद्ध पाकिस्तानचा उपयोग करीत आहे, तरीही दहशवादासंदर्भातील जागतिक जनमानसाविरुद्ध स्वत:ला अलिप्त करू शकलेला नाही. जर भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत तो अलिप्त जरी राहिला, तरीही ते भारताच्या हिताचे ठरेल. परंतु, रशियाने नेहमीप्रमाणे भारताला साथ देऊन आपली अनेक वर्षे जुनी मैत्रीची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे निश्‍चितच पाकिस्तानच्या संदर्भात भारताचा सर्वाधिक विश्‍वसनीय व प्रभावी मित्र रशियाच राहिला आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासंदर्भातील विधेयक, तेथील संसदेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार टेड पो आणि डेमोक्रेट सदस्य डाना रोहराबेखर यांनी सादर केले आहे. हे दोन्ही सदस्य अमेरिकेतील सर्वाधिक प्रभावशाली आणि जनमानसावर परिणाम करणारे समजले जातात. भारताने या संधीचा फायदा उठवून पाकिस्तानला जागतिक समुदायापासून वेगळे करणे, त्याची कोंडी करणे आणि त्याचा उघडे पाडणे यासाठी विशेष अभियान हाती घ्यावे लागेल; तर दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदीही करावी लागेल.
आपल्याला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, सिंधू नदीचे ८० टक्क्यांहून अधिक पाणी आम्ही पाकिस्तानला देत आहोत. आशियात ५७ अशा नद्या आहेत ज्या दोन व त्याहून अधिक देशांतून वाहतात. केवळ भारत एकमेव असा देश आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाणार्‍या नद्यांच्या पाणीवाटपाबाबत शेजारच्या देशाशी करार केला आहे. चीनच्या सीमेला लागून १२ देश आहेत, जेथे चीनमधील नद्या जातात. मात्र, त्या देशाने कुठल्याही देशाशी- ज्यात भारताचाही समावेश आहे- जेथे ब्रह्मपुत्रा तिबेटमधून येते, कुठलाही पाणीवाटप करार केलेला नाही.
जर भारताने जम्मू-काश्मीर राज्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा उपयोग केला, तर पाकिस्तानात दुष्काळ पडेल. जम्मू-काश्मीर राज्याच्या विधानसभेने २००३ मध्ये एक प्रस्ताव पारित करून पाकिस्तानला अनावश्यक, कुठलेही कारण नसताना करण्यात येणारा पाणीपुरवठा रोखून राज्याची गरज पूर्ण करण्यासाठी सिंधू पाणी कराराची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी केली होती. २००३ मागे पडून आज २०१६ साल उजाडले, पण केंद्राने आपल्याच राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानला अनावश्यक पाणीपुरवठा अबाधितपणे सुरूच ठेवला आहे. द्वेष आणि तिरस्कारातूनच पाकिस्तानचा जन्म झाला आहे. मुहम्मद इक्बाल (ज्यांच्या नावाने भारताचे एक राज्य सरकार आजही साहित्यक्षेत्रातील पुरस्कार देते) आणि मुहम्मद अली जिना यांनी मुसलमानांचे स्वतंत्र राष्ट्र घोषित करून हिंदूंबरोबर राहण्यास नकार दिला आणि द्विराष्ट्रवादाच्या पोकळ, फसव्या आणि खोट्या सिद्धांतावर पाकिस्तानचा पाया रचला. तो पाकिस्तान आज सिंध, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान येथील बंडखोर सुरांमुळे चडफडत आहे. त्याचे अस्तित्व केवळ पंजाबी पाकिस्तान, त्याचे पंजाबी लष्कर आणि अमेरिका आणि चीनच्या मदतीमुळे कसेबसे टिकून आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न धसास लावून त्याच्या निर्वासित सरकारला मान्यता देण्यासंदर्भात भारत नक्कीच विचार करू शकतो. सिंध आणि पख्तूनिस्तानलाही पाकिस्तानपासून वेगळे करण्याच्या मोहिमेला वेग द्यायला हवा. आपल्या जन्मापासूनच पाकिस्तानने भारताला रक्तबंबाळ केले आहे. १९४७ चे मीरपूर हत्याकांड, दोनतृतीयांश काश्मीर जबरदस्तीने आणि दगाबाजीने हडप करणे, त्याचा एक भाग चीनला बक्षीस म्हणून देणे, भारताविरुद्ध चीनचा वेढा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ग्वादर बंदरापासून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग बनविण्याची योजना, गिलगिटमध्ये चिनी सैनिकांची उपस्थिती, भारतावर दहशतवादी हल्ल्यासाठी सर्व प्रकारची राजकीय मदत आणि शिबिरांची स्थापना, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद माजवून हिंदू काश्मिरींना शरणार्थी बनवून राज्यातून बाहेर घालवून देणे आणि जगातील सर्वात भयानक अशी हिंदूंची कत्तल घडवून आणणे, खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालणे, कारगिल युद्धानंतर सातत्याने दहशतवादी हल्ले करून ५० हजारांहून अधिक भारतीयांची हत्या… ही यादी खूप मोठी आहे.
आता विश्‍वसमुदायाचे समर्थक आणि १२५ कोटी भारतीयांची एकजूट व सर्वपक्षीय एकतेमुळे असे वातावरण तयार झाले आहे की, नरेंद्र मोदींना पंतप्रधानांऐवजी ‘योद्धा मोदी’ म्हणून स्थापित करण्यात येत आहे. दीनदयालजींच्या अनुयायांना दुष्टांचे निर्दालन करण्याचे लक्ष्य पूर्ण करावेच लागेल, असेच आता म्हणता येऊ शकते…

-तरुण विजय