राज्याच्या प्रकल्पांची पाण्याची पातळी वाढली

0
93

– राज्यात ३७ टक्के जलसाठा कोकण आघाडीवर
– नागपूर विभागाला चिंता
विजय निचकवडे
भंडारा, ५ एप्रिल
पाण्याशिवाय जीवन जगणे कठीणच, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणून संबोधले जाते. पाण्याचा वायफळ वापर टाळला जावा आणि पाणी वापराबद्दल लोकांमध्ये जागृती यावी, यासाठी शासन स्तरावरून विविध अभियानही राबविले जातात. अशा अभियानाची खर्‍या अर्थाने महाराष्ट्राला आणि विशेष करून विदर्भातील काही जिल्ह्यांना आवश्यकता असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आज राज्यात मोठे आणि लघु प्रकल्प मिळून मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक असला तरी भरपूर असा जलसाठा नाही. ३७.४९ टक्के जलसाठा आज राज्यातील प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे. जलसाठ्याच्या बाबतीत कोकण विभाग आघाडीवर असून नागपूर विभाग माघारल्याने पूर्व विदर्भातील लोकांसाठी ही धोक्याची घंटी आहे.
पाण्याचा जपून वापर करा, हे गेल्या कित्येक वर्षांपासून सांगितले जात आहे. याचा परिणाम लोकांवर कितपत होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुबलक पाणी उपलब्ध असले तर कोणतीही तमा न बाळगता आम्हाला पाण्याचा वापर करण्याची सवयच पडली आहे. मग पाणी साठ्याची कमतरता जाणवू लागल्यास अवघड होऊन बसते.
मागील वर्षीचा अनुभव ताजा आहे. मराठवाड्यात विशेष करून लातूर भागात रेल्वेच्या मदतीने पाणी पुरवठा करण्याची वेळ शासनावर आली होती. मागील वर्षी मराठवाड्यात केवळ १.२२ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी चित्र बरेच समाधानकारक आहे. मात्र ही आकडेवारी पाहून पाण्याचा नियोजनशून्य वापर करणेही घातक ठरू शकते.
आज महाराष्ट्रातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण ३२५७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ४७,८५७ द.ल.घ.मी. एवढा जलसाठा असून याची टक्केवारी ३७.४९ एवढी आहे. मागील वर्षी ही टक्केवारी १७.०४ एवढी होती.
अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे आणि मराठवाडा अशा सहा विभागांचा विचार करता सर्व विभागात मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यातही कोकण विभाग राज्यात आघाडीवर असून मागील वर्षी ३९.८८ टक्के असलेला जलसाठी ६०.१७ टक्के झाला आहे. त्या खालोखाल मराठवाड्यात ३९.९९ टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागात ३८.३०, नाशिक ३६.३७, पुणे ३४.९७ एवढा जलसाठा आहे. नागपूर विभाग सर्व विभागामध्ये माघारला असून २३.६८ टक्के पाणी नागपूर विभागात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याची जबाबदारी विशेषकरून पूर्व विदर्भातील जिल्ह्यावर येऊन पडली आहे. शेती व्यवसायाच्या दृष्टीने या जिल्ह्यात पाण्याचा वापर अधिक होत असल्याने पाण्याची काटकसर हा विषय महत्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्पामधील जलसाठ्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम या माध्यमातून अनुभवता येऊ शकतो.
मराठवाड्यासारख्या भागात यामुळे पाण्यासाठी होणारी लोकांची होरपळ काही प्रमाणात कमी होऊ शकेल, यात शंका नाही. परंतु दुसरीकडे पूर्व विदर्भातील लोकांची जबाबदारी वाढली आहे.