शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

0
81

– पाण्याअभावी झाडे वाळण्याच्या मार्गावर
भंडारा, ५ एप्रिल 
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागली आहेत. या वृक्षांना आता जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्यथा लावण्यात आलेली झाडे वाळून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार, हे मात्र निश्‍चित.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लागवड ही योजना अमलात आणली. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात राज्यात अभियान राबवून प्रत्येक गावात, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी जागृती करण्यात आली. एवढेच नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतीला निश्‍चित उद्दिष्ट देण्यात आले. तसेच त्याच्या पूर्तीसाठी व जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले गेले. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून झाडांना काटेरी कुंपण लावणे, पाणी टाकणे व देखभालीसाठी अनुदान स्वरूपात खर्च देण्यात आला. योजना अतिशय चांगली असताना सुरुवातीलाच या योजनेला तालुक्यात काही मोजक्या गावात प्रतिसाद मिळाला तर ७० ते ८० टक्के ही योजना कागदोपत्री राबविण्याचे दाखविण्यात आले. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत तालुक्यात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता माना खाली टाकल्याचे दिसून येत आहे. तथापि, काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे चांगली मोठी आहे. मोठी झालेली झाडे भर उन्हाळ्यात आतापर्यंत तग धरून आहे. परंतु आता मात्र या झाडांनाही पाण्याची गरज आहे.
अशा परिस्थितीत शासनाच्या संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा व झाडांना वाचवावे अन्यथा करोडो रुपये खर्च करून शतकोटी योजनेंतर्गत काही प्रमाणात जिवंत असणारी झाडेही दम तोडतील आणि शासनाचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाइंल, हे निश्‍चित. (तभा वृत्तसेवा)