मुलायमसिंह यादव यांची ‘मन की बात’

0
128

दिल्लीचे वार्तापत्र
समाजवादी पार्टीचे एकेकाळचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची गत नख काढलेल्या वाघासारखी झाली आहे. त्यांचा राजकीय प्रभाव ओसरत चालला आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सपाचा दारुण पराभव झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांना काय झाले ते समजत नाही. सत्ता हातातून गेल्याने मुलायमसिंह यादव निराश झाले आहेत.
मैनपुरी येथे एका मेळाव्यात बोलताना मुलायमसिंह यादव यांच्या मनातील वेदना बाहेर आली. आता जितका अपमान झाला, तेवढा अपमान याआधी कधीच झाला नाही आणि हा अपमान बाहेरच्यांनी नाही तर घरच्याच लोकांनी केला, या शब्दात मुलायमसिंह यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीतील समाजवादी पार्टीच्या पराभवाचेही विश्‍लेषणही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एका वाक्याचा संदर्भ देत केले. मोदी यांच्या एका वाक्याने समाजवादी पार्टीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.
‘जो अपने बाप का नही हुआ, वो औरो का क्या होगा’, असे पंतप्रधान मोदी यांनी कन्नौज येथील आपल्या सभेत म्हटले होते. या वाक्याचा राज्यातील मतदारांवर परिणाम झाला आणि त्यांनी सपाला पराभूत केले, असे मुलायमसिंह यादव यांनी म्हटले. म्हणजे मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टाकली आहे. मुलायमसिंह यादव यांचे हे विधान अर्धसत्य आहे. समाजवादी पार्टीने राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात लढवल्या. त्यामुळे सपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी अखिलेश यादव यांची आहे, याबाबत शंका नाही. मात्र ती त्यांची एकट्याची नाही, तर समाजवादी पार्टीतील सर्व नेत्यांचा विशेषत: यादव घराण्यातील सर्वांचाच त्यात सहभाग आहे, ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येणार नाही. समाजवादी पार्टीच्या पराभवासाठी अखिलेश यादव यांच्यासोबत मुलायमसिंह यादवही तेवढेच जबाबदार आहे. त्यांना आपल्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुळात विधानसभा निवडणुकीच्या तीन-चार महिने आधीपासून समाजवादी पार्टीत काकापुतण्याची लढाई चालू झाली होती. अक्षरश: यादवी माजली होती.
या यादवीत पडद्यासमोरच्या आणि पडद्यामागच्या अनेक नेत्यांचाही समावेश होता. ही यादवी थांबविणे मुलायमसिंह यादव यांनी मनात आणले असते, तर त्यांना कठीण नव्हते. पण त्यांनी या अंतर्गत भांडणात धरसोडीची भूमिका घेतली. मुलगा अखिलेश यादव आणि आपला लहान भाऊ शिवपाल यादव यांचा कान पकडून त्यांना चूप बसवणे मुलायमसिंह यादव यांना कठीण नव्हते. पण त्यांनी एकाच वेळी दोघांचे कान पकडायला हवे होते. पण मुलायमसिंह यादव यांनी कधी अखिलेशचा कान पकडला, तर कधी शिवपाल यादव याचा. यामुळे यातून जो योग्य संदेश जायला हवा होता, तो गेला नाही. मुलायमसिंह यादव यांनी ज्या वेळी अखिलेश यादव यांचा कान पकडला, त्या वेळी आपण जिंकलो, असे शिवपाल यादव यांना वाटत होते आणि ज्या वेळी मुलायमसिंह यादव यांनी शिवपाल यादवचा कान पकडला, त्या वेळी आपण जिंकलो, असे अखिलेश यादव यांना वाटत होते. मुळात समाजवादी पार्टीतील या यादवीत नेमकी कोणाची बाजू घ्यायची याचा निर्णयच मुलायमसिंह यादव यांना घेता आला नाही. त्यामुळे ते कधी आपल्या मुलाची म्हणजे अखिलेश यादव यांची बाजू घ्यायचे, तर कधी आपल्या भावाची शिवपाल यादव यांची. या बाबतीत त्यांना नात्यांचे संतुलन साधता आले नाही.
मुलायमसिंह यादव यांनी या काळात ज्या परस्परविरोधी भूमिका घेतल्या, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचाही विश्‍वास उडाला. अखिलेश यादव यांनी कॉंग्रेससोबत केलेल्या आघाडीचा आदल्या दिवशी विरोध करायचा, दुसर्‍या आघाडीच्या बाजूने बोलायचे. अखिलेशवर कधी जोरदार टीका करायची, तर दुसर्‍याच दिवशी त्याचे कौतुकही करायचे. त्यामुळे मुलायमसिंह यादव नेमके कोणाच्या बाजूने आहे, अखिलेश यादव की शिवपाल यादव हे राज्यातील जनतेला आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही समजले नाही.
कधीकाळी आक्रमक नेते अशी प्रतिमा असलेल्या, अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी ‘परिंदा भी पर नही मार सकेंगा’ अशी गर्जना करणार्‍या आणि कारसेवकांवर गोळ्या चालवणार्‍या मुलायमसिंह यादव यांना मात्र आपल्याच घरच्या लोकांनी पक्षात उभी केलेली तटबंदी मोडता आली नाही. त्यामुळे आपणच स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या समाजवादी पार्टीची झालेली दुर्दशा पाहण्याची वेळ आयुष्याच्या संध्याकाळी मुलायमसिंह यादव यांच्यावर आली. हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूडच म्हटला पाहिजे.
कोणताच बाप आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवत नाही, मी बनवले, असे मुलायमसिंह यादव म्हणाले. यातून त्यांचा अहंकार आणि मीपणाची भावना प्रगट होते. मात्र मुलायमसिंह यादव यांचे हे विधानही बरोबर नाही. जम्मू-काश्मिरात शेख अब्दुल्लांनी आपल्या मुलाला फारुक अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री बनवले. फारुक अब्दुल्ला यांनी उमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री बनवले. बिहारात तर लालूप्रसाद यादव यांनी एका एका झटक्यात एका मुलाला उपमुख्यमंत्री तर दुसर्‍याला कॅबिनेट मंत्री बनवून टाकले. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांनी जगावेगळे काहीच केले नाही. प्रत्येक राजकारणी बाप जसा वागतो, तसेच मुलायमसिंह यादव वागले. मुलाला मुख्यमंत्री बनवल्यावर मात्र त्यांना बाप म्हणून आपले कर्तव्य बजावता आले नाही.
मुलाला मुख्यमंत्री बनवल्यावर मुलायमसिंह यादव यांनी त्याला वार्‍यावर सोडून दिले. मुख्यमंत्री म्हणून कसे वागायचे, निर्णय कसे घ्यायचे, प्रशासनावर पकड कशी बसवायची याचे धडे त्यांनी अखिलेश यादव यांना दिले नाही. अखिलेश यादव यांची एखादी चूक झाल्यावर बंद खोलीच्या आत त्यांना समजवण्याऐवजी त्यांची जाहीर खरडपट्टी काढण्यात मुलायमसिंह यादव यांना आनंद मिळत होता. त्यामुळे आपण आपल्या मुलाची नाही, तर मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा कमी करत आहोत, याचे भान त्यांना राहत नव्हते. त्यामुळे आज मुलायमसिंह यादव समाजवादी पार्टीच्या पराभवाची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर टाकून मोकळे होत असले तरी समाजवादी पार्टीच्या पराभवात शिवपाल यादव, साधना गुप्ता यादव, आजम खान, रामगोपाल यादव, अमरसिंह, या सवार्र्ंचे योगदान आहे.
शिवपाल यादव अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण ते स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षा कधीच कमी समजत नव्हते. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे पाय ओढण्याची आणि त्यांच्यावर मात करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आग्रा येथील रामबाग प्रकरणातील त्यांचा सहभागही कधी लपून राहिला नाही. आज पक्षाच्या पराभवाचे खापर आपल्या मुलावर फोडण्याऐवजी त्या वेळीच मुलायमसिंह यादव यांनी शिवपाल यादव यांना आवर घातला असता तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती.
आताही शिवपाल यादव नवा पक्ष काढण्याची आणि सून अपर्णा यादव भाजपात जाण्याची धमकी देत अखिलेश यादव यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुलायमसिंह यादव यांना एकप्रकारे धमकवतच आहे. मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीला आपल्या कौटुंबिक मालकीचा पक्ष करून टाकला. घराण्यातील सर्वांना वेगवेगळी पदं देत सत्तेची चटक लावली, त्याचीच किंमत आता त्यांना चुकवावी लागत आहे.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७