प्रासंगिकताच संपली!

0
119

अग्रलेख
देशातील दोनतृतीयांश लोकसंख्या ही तरुण आहे आणि या तरुणाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास आहे. ज्या विश्‍वासाने जनतेने मोदींना निवडून दिले, तो विश्‍वास मोदी यांनी अबाधित राखल्यानेच मतदारांनी उत्तरप्रदेशात भाजपाला जबरदस्त कौल दिला, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करून मोदींनी, आपण योग्य मार्गावर असल्याचेच संकेतही दिले आहेत. त्यामुळे ढोंगी पुरोगाम्यांनी आता स्वत:मध्ये सुधारणा कराव्यात, नाहीतर शंभर टक्के नाकारले जाण्यासाठी तयार राहावे!

उत्तरप्रदेशचे निकाल लागून आता एक महिना पूर्ण होईल. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी पदभार स्वीकारूनही १५ दिवस पूर्ण होतील. परंतु, कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह विरोधी पक्ष, भाजपाचा विजय पचवू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे स्वत:ला ‘पोल पंडित’ म्हणविणारेही भाजपाचा विजय पचवू शकलेले नाहीत. पराभवाच्या प्रचंड धक्क्यातून बाहेर पडायला अवधी जरूर लागतो, पण उत्तरप्रदेशात पराभवाने केलेली जखम बरी करण्यास या मंडळींना दीर्घ काळ लागेल, असेच दिसते आहे. भाजपाचा विजय झालाच कसा आणि आपण पराभूत झालो कसे, हेच कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधकांच्या लक्षात येईनासे झाले आहे. भाजपाच्या या विजयाचा अंदाज नसल्याने विरोधकांना अनपेक्षित धक्का बसला. भाजपाच्या विजयाचे प्रमाण आणि परिमाण समजण्यात ते चुकले, असे म्हणता येईल एवढे ते बावचळलेले आहेत. जनादेशाचे आकलन करण्यात ते कमी पडत आहेत आणि म्हणूनच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळे केल्याचे आरोप त्यांच्याकडून होत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पाहिले तर उत्तरप्रदेशातल्या मतदारांनी जो कौल दिला आहे, तो अभूतपूर्व आहे, ऐतिहासिकही आहे आणि देशात परिवर्तनाचा प्रारंभ करणारा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे हे सर्वात मोठे परिवर्तन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी पाश्‍चिमात्य धर्मनिरपेक्षता स्वीकारली होती, तिचे औचित्य आता संपुष्टात आले आहे. त्या कथित धर्मनिरपेक्षतेची प्रासंगिकताही संपली आहे. पण, स्वत:ला पुरोगामी म्हणविणारी कथित बुद्धिजीवी मंडळी, स्वत:ला उदारमतवादी म्हणविणारी खोटारडी मंडळी, डाव्या विचारसरणीची नेतेमंडळी ही बाब कधीच मान्य करणार नाही. कारण, वास्तवाला सामोरे जाण्याची किंवा सत्याचा सामना करण्याची त्यांच्यात हिंमत नाही आणि त्यांची कुवतही नाही. ११ मार्च २०१७ नंतर आता देशातल्या राजकारणाची दिशा बदलली आहे. आधी चालत होते तसे राजकारण यापुढे चालणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. वाममार्गी राजकारणाची दिशा आता दक्षिणमार्गी झाली आहे आणि तिची पाळेमुळे प्राचीन धार्मिक परंपरेशी जुडली आहेत, हेही सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. उत्तरप्रदेशातील जनतेने जरी भगवी वस्त्रे परिधान करणार्‍या योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले असले, तरी ते ‘सबका साथ सबका विकास’ या सूत्रानुसार कुठलाही धार्मिक भेदभाव न करता राज्यकारभार करणार आहेत, हे त्यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणी घाबरून जाण्याची, काळजी करण्याची वा अपप्रचार करण्याची अजीबात गरज नाही. ज्या विचारधारेला देशातील डावे बौद्धिक विचारवंत कणभरही जागा द्यायला तयार नव्हते आणि स्वातंत्र्यानंतरची तब्बल ६५ वर्षे ज्या विचारधारेची उपेक्षाच त्यांनी केली, ती विचारधारा मान्य करत याच देशातील मतदारांनी ती स्थापितही केली आहे. भारतातली जी मूळ परंपरा होती, तीच डाव्या विचारसरणीच्या लोकांनी नाकारण्याचा करंटेपणा एवढी वर्षे केला अन् असा करंटेपणा करूनही हे लोक स्वत:ला पुरोगामी, बुद्धिवादी अन् उदारमतदवादी समजत असतील, तर त्यांची कीवच केलेली बरी! जे जे म्हणून काही प्राचीन भारतीय परंपरेशी जुडलेले आहे, ते सगळे नाकारायचे अन् आपली पकड मजबूत करायची, असाच यांचा प्रयत्न राहिला आहे. या देशात अल्पसंख्यकांच्या अर्थात मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी आम्ही लढतो आहोत, हे दाखविताना या कथित बुद्धिजीवी मंडळींना एका गोष्टीचा सोयिस्कर विसर पडला आणि ती गोष्ट म्हणजे हिंदू परंपरेत हजारो वर्षांपासून अन्य धर्म आणि सभ्यतांचा सन्मान करण्याची प्रथा राहिली आहे. हिंदू कधीच कुणाच्या विरोधात राहिलेला नाही. या देशातल्या हिंदूंनी कधीच कुणाच्या प्रार्थना पद्धतीला, त्यांच्या उपासना पद्धतीला, त्यांच्या प्रार्थना स्थळ निर्मितीला विरोध केलेला नाही. विरोध केला आहे तो हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराला अन् अन्यायाला, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि असे असतानाही हिंदूंनाच अनेक बाबतीत डावलले गेले आहे. हिंदूंना डावलून अल्पसंख्य मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांच्या अधिकाराबाबत बोलणारे स्वत:ला धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी समजत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखविलेलीच बरी आणि हे काम उत्तरप्रदेशातील मतदारांनी केले आहे. ज्या कॉंग्रेसने, ज्या समाजवादी पार्टीने, ज्या बहुजन समाज पार्टीने केवळ आणि केवळ मुस्लिम तुष्टीकरणाचेच राजकारण केले अन् धर्मनिरपेक्ष म्हणवत स्वत:ची पाठ थोपटून घेतली, त्यांना मतदारांनी जागा दाखविली नसती तरच नवल. भारताला वेगळेपणाने धर्मनिरपेक्ष म्हणण्याची आवश्यकताच नाही. कारण, सर्व धर्म समान आहेत, ही हिंदूंची शिकवणच आहे. हिंदू हा मूळत: सहिष्णू आहे, त्याला सहिष्णुता वेगळ्याने शिकविण्याची गरज नाही. नेमकी ही बाब जगासमोर मांडायची सोडून तथाकथित उदारमतवादी मंडळी हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या संस्था-संघटनांनाच झोडपून काढण्यात धन्यता मानत आली आहेत. उत्तरप्रदेशमधील मतदारांनी या मंडळींना जोरदार चपराक हाणली आहे. हिंदुत्ववादी संघटना भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा अपप्रचार करीत अन्य धर्मीयांना घाबरवण्याचा आणि हजारो वर्षे जुन्या सहिष्णू हिंदू परंपरेला बदनाम करण्याचा घाणेरडा प्रयत्न, स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्‍या प्रतिगामी मंडळींनी केला. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याची मोठी कामगिरी उत्तरप्रदेशातील जनतेने केली आहे. आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याने ही मंडळी हतप्रभ झाल्यासारखी दिसत आहेत आणि बेंबीच्या देठापासून बोंबलत, इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत आहेत. योगी आदित्यनाथ त्यांना मुस्लिमविरोधी असल्याची भीती वाटत आहे आणि तसा अपप्रचार करण्याची एकही संधी सोडायला ते तयार नाहीत. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून तीन तलाकच्या मुद्यावर मोठ्या संख्येत मुस्लिम महिलांनी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली, ही बाबच या पुरोगाम्यांचे ढोंग उघड करणारी आहे.