‘नकुशी’ झाली इटालियन दाम्पत्याला हवीशी!

ऑनलाईन दत्तक योजनेत चिमुकल्या शलाकाला मिळाले पालक

0
152

तभा अंँकर…

नितीन शिरसाट

बुलढाणा, ७ एप्रिल 
एक बोधकथा आहे. एका राजाला दोन मुली होत्या. त्यांना एकविदस बोलावून त्याने विचारले, ‘‘तुमचे भाग्य कुणाच्या हाती?’’ मोठीने बापाचा इगो सुखावणारे, त्याला अपेक्षितच उत्तर दिले, ‘‘तुमच्या हाती!’’ लहानी म्हणाली, ‘‘मी माझे भाग्य घेऊनच जन्माला आलेय…’’ रागावलेल्या राजाने लहानीला राजवाड्यातून हाकलेले… कथेचा शेवट- राजा युद्धात परागंदा झाला आणि लहानी एका राज्याची सम्राज्ञी! बुलडाण्याच्या ममत अनाथ शिशूगृहातील शलाका हा दुधाचे ओठही न सुकलेल्या चिमुकलीला बोलता येत नाही पण ती तिचे भाग्य घेऊनच जन्माला आली होती. तालेवार घरची मुले जंगजंग पछाडून परदेशात जातात; शलाकाला ऑनलाईन पसंती देत इटालीच्या दाम्पत्याने दत्तक घेतलेय्…
तिला या अनाथालयाच्या दारात सोडून जाताना तिच्या जन्मदात्रीचा पान्हा अगतिक का झाला नाही, असा सवाल आतावर अनेकांना पडला होता. ती दुर्दैवी माता अगतिक असावी किंवा निष्ठूर तरी… पण, शलाका असे नामाभिधान करण्यात आलेली ही कन्या आता परदेशात जाणार.
येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ममता शिशुगृह ही केंद्र शासन मान्यता प्राप्त संस्था १९९४ पासून कार्यरत आहे. अनाथ, निराधार, बेवारस अशा मुला मुलींचे संगोपन, पालनपोषण केंद्रीय दत्तक ग्रहण संस्था (कारा) यांच्या मार्गदर्शनानुसार अनाथ मुलांना ज्या कुटुंबात मुले, मुली नाहीत अशांना कायदेशीररित्या दत्तक देते. आतावर १११ अनाथांना संस्थेने मायेचे छत्र मिळवून दिले आहे. या ममता शिशुगृहात एक वर्षाची चिमुकली आईने बेवारस सोडून दिल्यानंतर दाखल झाले. तिचे नाव शलाका ठेवण्यात आले. ती अडीच वर्षाची झाल्यानंतर ऑनलाईन दत्तक योजनेद्वारे इटली येथील एरिको पिटारोलो, मोरया पिटारोलो या दाम्पत्यांनी तिला पसंत केले. हे दाम्पत्य इटली येथे कॉफी तयार करण्याची मशीन विकण्याचा व्यवसाय व्हेनिस नजिकच्या बेलुन्नो या एक हजार वस्तीच्या गावात करतात. या गावाचे वैशिष्ट्य, भारतीय वंशाच्या दहा मुला-मुलींना आतापर्यंत या गावात दत्तक घेण्यात आले आहे. शलाका ही त्यांची दुसरी दत्तक भारतीय कन्या. या पूर्वी या दाम्पत्यांनी पुणे येथील अनाथालयातील स्नेहाला दत्तक घेतले. आज ती सहाव्या वर्गात शिकत आहे. वर्णभेद न मानता भारतीय अन् त्यातही मुलीच का दत्तक घेता, असे विचारले असता ते इतकेच म्हणाले, माणूसकी आणि देव हा भाव या मुलांमध्ये आहे! दत्तक मुलींची माहिती देताना पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऍड. सुमित सरदार, अधीक्षक दीपक मनवर, तसेच मुंबई येथील एनजीयो ब्रेबॉन डिसिल्वा उपस्थित होते.