आता गोदरीमुक्त गावांमध्येच विकासकामे

0
70

वाशीम, ७ एप्रिल
मंगरूळनाथ तालुका गोदरीमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असून, ग्रामपंचायती गोदरीमुक्त होईपर्यंत विकासकामे बंद ठेवण्यात येणार असल्याची भूमिका वाशीम जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी जाहीर केली आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित ग्रामसेवकांच्या आढावा सभेत जवादेंनी ही भूमिका मांडली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत मंगरूळनाथ तालुका गोदरीमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावनिहाय शौचालय बांधकामाचा आढावा घेतला. मंगरूळनाथ तालुक्यात ६ हजार शौचालय बांधण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १० हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्‍वास गटविकास अधिकारी जवादे यांनी बोलून दाखविला. तालुका गोदरीमुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, यासाठी ग्रामसेवकांनी तत्परता दाखविणे गरजेचे असल्याचे जवादे म्हणाले.
‘एमआरईजीएस’अंतर्गत इतर सर्व कामे तात्पुरती थांबविली जाणार असून, केवळ शौचालय बांधकामांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, गोदरीमुक्त गावांमध्ये ‘एमआरईजीएस’सह सर्व विकासकामे प्राधान्याने करणार असल्याचे जवादे यांनी सांगितले. विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना आधी गोदरीमुक्त होणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
गटविकास अधिकारी योगेश जवादे यांच्या या भूमिकेमुळे काम न करणार्‍या ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या कामात हलगर्जीपणा करणार्‍या व बैठकीला गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांविरुद्ध जवादेंनी सुरुवातीलाच तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीला विस्तार अधिकारी भिकाजी पद्मणे, आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे, स्वच्छ भारत मिशनचे राम शृंगारेे, प्रफुल्ल काळे, रवींद्र वाढणकर, देवा राठोड, तालुका समन्वयक अभय तायडे, अभियंता मुल्ला यांची उपस्थिती होती. (तभा वृत्तसेवा)