गायकवाड प्रकरणाचा बोध

0
122

अग्रलेख

••गायकवाड अट्‌टल गुन्हेगार किंवा दहशतवादी आहेत म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नव्हती. त्यांनी विमान कर्मचार्‍याला चपलेने बडविले म्हणून ही बंदी होती. हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे.
••
शिवसेनेचे ‘चप्पलमार’ खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी, विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची लेखी माफी मागितल्यानंतर आता हे प्रकरण निवळले आहे आणि गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी हटविण्यात आली आहे. २३ मार्च रोजी विमानात जो प्रकार घडला, तो घडायला नको होता, अशी भावना गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे इतरही तो प्रकार विसरतील अशी आशा करू या. पण प्रसंग तर घडला होताच. गायकवाड आता कितीही म्हणत असतील की, मी त्या विमान कर्मचार्‍याला फक्त ढकलले, पण त्यांनी त्याला चपलेने बदडले, हे सत्य काही झाकले जाणार नाही. बदडण्याची कबुली गायकवाड यांनीच दिल्याचे आपण सर्वांनी वाचले, पाहिले आहे. त्यामुळे या प्रकरणातून बोध काय घ्यायला हवा, याचा विचार झाला पाहिजे. आपल्या शास्त्रात लक्ष्मीची दोन अपत्ये सांगितली आहेत-बल आणि उन्माद. ही भाववाचक असली पाहिजे. लक्ष्मी आली की बल येतेच आणि उन्मादही येतो. आपल्या सर्वांना याचा अनुभव आहेच. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांची एक ओळख सिद्ध झाली आहे. अरेरावी, उद्धटपणा तसेच तर्कविसंगत व कर्कश बोलणे. प्राध्यापक गायकवाड त्याला अपवाद ठरले नाहीत, हे सर्वांसमोर आले आहे. गायकवाड म्हणतात की, मी शिक्षक असल्याने विनम्र आहे. परंतु, असले कुठलेही लक्षण त्यांच्या व्यक्तित्वातून आतापर्यंत तरी झळकले नाही. लोकसेवक म्हणून निवडून येणारे खासदार लवकरच लक्ष्मीपुत्र बनतात. त्यामुळे या लक्ष्मीसोबतच तिची दोन अपत्ये- बल व उन्माद- गायकवाड यांच्या वृत्तीत शिरली असतील, तर त्याचे नवल वाटायला नको. स्मार्ट फोनमुळे कुठल्याही घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ताबडतोब करता येते आणि ते वार्‍यासारखे व्हायरल होत असल्यामुळे, असे काही घडलेच नाही, असे म्हणण्याची सोय राहिलेली नाही. असे असताना, शिवसेनेने जी भूमिका घेतली, ती अनाकलनीय नसली, तरी दुर्दैवी आहे. आपल्या खासदाराकडून घडलेल्या कृत्याबाबत जाब विचारायचा सोडून, शिवसेना त्याला पाठीशी घालायला निघाली. यात त्यांना काही राजकारण खेळायचे असेल, तर त्यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे आणि राजकारण खेळणे किंवा करणे तसेच प्रतिस्पर्धी पक्षांवर कुरघोडी करणे वगैरे बाबी क्षम्य मानल्या जातील. परंतु, सर्वसामान्य जनतेत शिवसेनेबद्दल जो संदेश गेला, तो त्या पक्षाचे नुकसान करणारा आहे. आधीच शिवसेनेची विश्‍वासार्हता, जनसमर्थन वेगाने घटत आहे. ते सावरण्याच्या खटपटीत असलेल्या शिवसेनेने, गायकवाड प्रकरणी सामंजस्याची नमती भूमिका घेतली असती, तर या पक्षाचे काही वाईट झाले नसते. तो विवेक सेनानेतृत्वाने दाखविला नाही, असेच कुणी म्हणेल. शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत आक्रमक व तिखट भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. ती त्यांची शैली आहे. त्याबद्दल कुणाचाच आक्षेप असू नये. पण, राऊत यांच्यासारखा सव्यसाची संपादक तर्कदुष्ट विचार मांडू लागतो, तेव्हा मात्र अचंबित व्हायला होतं. गायकवाड यांना विमानाने प्रवास करू देण्यास विमान कंपन्यांनी नकार दिल्यामुळे राऊत भयंकर चिडले. विमानाने गुन्हेगार, चोर, दहशतवादी प्रवास करतात. त्यांना कुणी अडवत नाही. गायकवाड काय दहशतवादी किंवा चोर आहेत काय?- त्यांनी संतापाने विचारलेला प्रश्‍न हास्यास्पदच ठरला. गायकवाड यांना ते चोर, गुन्हेगार (आर्थिक) किंवा दहशतवादी आहेत म्हणून बंदी घालण्यात आलेली नव्हती. त्यांनी विमान कर्मचार्‍याला चपलेने बडविले म्हणून ही बंदी होती. विजय मल्ल्या किंवा इतरही जे कुणी गुन्हेगार विमानाने जाऊ शकले, कारण त्यांनी असला प्रकार विमान कर्मचार्‍यांच्या बाबतीत केला नव्हता, हे राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे होते. तुमच्या जवळ योग्य तिकीट व इतर आवश्यक कागदपत्रे आहेत, तेवढे विमान कंपन्यांना पुरेसे असते. ते तुमच्या इतिहासात डोकावून बघत नाहीत. ते काम गृह खात्याचे आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या खांद्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्याचा राऊत यांचा प्रयत्न अत्यंत हास्यास्पद ठरला. चप्पलमार प्रकरणानंतर गुरुवारी, प्रथमच गायकवाड लोकसभेत हजर झालेत. त्या दिवशी शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अनंत गीते यांचा आक्रमकपणा पाहून सर्वच जण थक्क झालेत. अनंत गीते शांत, संयमी व विवेकी नेते म्हणूनच आतापर्यंत सर्वांना परिचित होते. पण, गुरुवारी त्यांनी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासोबत जो व्यवहार केला, तो नवीनच होता. संतप्त होऊन कुणाच्या अंगावर धावून जाताना आतापर्यंत कुणी बघितले नव्हते. त्या दिवशी त्यांनी तसे केले. इतके संतप्त झालेले गीते नंतर मात्र भाजपा खासदार व इतर मंत्र्यांसोबत हास्यविनोद करताना दिसले. हा सर्व प्रकार राज्यसभेचे सदस्य असलेले संजय राऊत, गॅलरीत न्याहळीत होते. कदाचित आपण नेमून दिलेल्या भूमिका सर्व जण नीट वठवतात की नाही, हे बघण्यासाठी ते आले होते की काय, अशी शंका यावी. त्यामुळे संजय राऊत प्रत्यक्ष उपस्थित असल्याने, इच्छा नसताना हे सर्व करावे लागले. माझ्या मनात तसे काही करावे असे नव्हते, असा संदेश देण्यात अनंत गीते यशस्वी झाले, असे म्हणण्यास वाव आहे. गायकवाड प्रकरणी शिवसेनेचे इतर खासदार व मंत्री मवाळ भूमिका घेत आहेत म्हणून राऊत अस्वस्थ असले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार लोकसभेत हा सर्व धिंगाणा घालण्याचे नियोजन झाले असावे, अशीही शक्यता आहे. शिवसेनेच्या एका खासदाराने तर धमकीही दिली- गायकवाड यांच्यावरील बंदी उठली नाही, तर मुंबईहून दिल्लीला जाणार्‍या विमानांना उडू देणार नाही! त्यामुळे मुंबई व पुणे विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागली. मुंबईत शिवसेना काहीही करू शकते, हा आता इतिहास ठरू बघत आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे म्हणण्याच्या ऐवजी, बालेकिल्ला होता, अशी आजची स्थिती आहे. पण, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, या न्यायाने, शिवसेनेची मुंबईबाबतची अकड अजूनही तशीच कायम आहे. आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ, असली भाषा आता शक्तिहीनतेमुळे शिवसेना नेत्यांच्या तोंडी शोभत नाही. थोडक्यात काय, लोकप्रतिनिधी म्हणून काही विशेषाधिकार मिळत असतील, तर त्यांचा वापर लोककल्याणासाठीच झाला पाहिजे, याची खूणगाठ आता या नेत्यांनी बांधणे, योग्य राहील. पूर्वीचा काळ आता नाही. क्षुल्लक गोष्टींसाठी कुणी हा आपला विशेषाधिकार वापरत असेल, तर जनता त्यांना क्षमा करायची नाही. जनता लाखो डोळ्यांनी, घडणार्‍या प्रत्येक गोष्टी बघत असते आणि मनोमन त्याची नोंददेखील ठेवत असते. त्याला तरी घाबरून लोकप्रतिनिधींनी आपल्या आचरणात बदल घडवून आणला पाहिजे. अन्यथा त्याचे काय परिणाम होतात, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.