१४ महिन्यांपासून सिटीस्कॅन बंद

0
115

गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार • रुग्णांची हेळसांड, आर्थिक भूर्दंड
गोंदिया, ८ एप्रिल 
रुग्णांना मोठे आजार जडल्याचे लक्षात येताच त्याचे निदान लावण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ती १४ महिन्यांपासून बिघडल्याने आज बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांची चांगलीच हेळसांड होत असून अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयाच्या पायर्‍या चढाव्या लागत आहेत. यात रुग्णांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना मोफत व कमी पैशात आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनातर्फे अनेक आरोग्य विषयक योजना राबविल्या जातात. तर मोठे आजार उद्‌भवल्यास त्याचे निदान करता यावे यासाठी विविध प्रकारच्या औषध व अत्याधुनिक मशीन आजघडीला शासकीय रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा चांगलीच कोलमडली असून शासनाच्या अनेक योजनांपासून जिल्ह्यातील रुग्ण व सामान्य नागरिक वंचित राहत आहेत.
जिल्ह्याचे मोठे रुग्णालय म्हणून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख आहे. त्यासाठी तशी व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे. आजघडीला रुग्णालयात क्ष-किरण मशीन, दंत चिकित्सा मशीन, डोळे तपासणी मशीन, सिटीस्कॅन, सोनोग्राफी आदी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र अनेकदा या मशिनी बिघाडतात. कधी सिटीस्कॅन मशीन तर कधी क्ष-किरण मशीन बिघडणे नित्याचेच झाले आहे. अशात आता या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात विलीनीकरण करण्यात आले आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव लागताच रुग्णालयच आजारी पडल्याचे चित्र असून २६ जानेवारी २०१६ पासून ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल १४ महिन्यांपासून या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बिघडली असल्याने बंद आहे. परिणामी याचा फटका रुग्णांना सोसावा लागत आहे.
शासकीय रुग्णालयात सन २००८ पासून सिटीस्कॅन मशीनची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यानंतर ही मशीन अनेकदा बिघडली. शासकीय रुग्णालयात या मशीनवर तपासणीसाठी रुग्णाला ३०० रुपये मस्तिष्क तपासणी व शरीरातील इतर अवयवांची तपासणी करण्यासाठी ४०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यातच मागील २०१४-१५ या आर्थिक वर्षात १८२५ रुग्णांनी या मशीनचा लाभ घेतला तर एप्रिल २०१५ ते २६ जानेवारीपर्यंत २०६० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
संबंधित आकडेवारी पाहता वर्षाकाठी रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी ही मशीन बंद आहे. तर रुग्णसंख्येंची सरासरी पाहता महिन्याकाठी शेकडो रुग्णांना या मशीनची गरज भासते. अशात दर महिन्याला हजारो रुपये खाजगी डॉक्टरांच्या खिशात जात आहेत. त्यातच संबंधित विभागातील अधिकार्‍यांचा याकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे अनेक शंका-कुशंकाना पेव फुटत आहे.
शासकीय आरोग्य अधिकार्‍यांचेच खाजगी डॉक्टरांशी सोटेलोटे असल्याने मशीन बिघडल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. (तभा वृत्तसेवा)
रुग्णांना मोजावे लागतात दुप्पट पैसे
शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन मशीनवर तपासणी करण्यासाठी डोक्यासाठी ३०० रुपये तर शरीराच्या इतर भागासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागतात. मात्र येथील रुग्णालयातील मशीन बंद असल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात या तपासणीसाठी प्रत्येकी ८०० व इतर भागासाठी १ ते २ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाची ऐसीतैसी
मागच्या वर्षी ४ मे रोजी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या उद्‌घाटनाप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री जिल्ह्यात आले असता त्यावेळी त्यांना बंद सिटीस्कॅन मशीनविषयी माहिती देण्यात आली. मशीनमध्ये त्वरित सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते मात्र दुरुस्ती करण्याचे कंत्राट मुंबई येथील मे. सिमेंन्स कंपनीकडे देण्यात आले असून या कंपनीचे पूर्वीचेच ९ लाख ८८ हजार ३६९ रु.चे बिल थकित असल्याने कंपनीने मशीन सुधारवण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाची ऐसीतैसी झाल्याचे दिसत आहे.