सायकलने अहमदाबादला पोहोचले धारणीचे ललित जोशी

0
126

धारणी, ८ एप्रिल
‘बेटी बचाव – स्वच्छ भारत’ अभियानावर येथून निघालेले सायकलयात्री ललित जोशी उर्फ लालाभाई ६२५ किलोमीटर अंतर कापून गुजरात राज्याच्या राजधानीत, अहमदाबाद येथे पोहोचले असता धारणी येथील मूळचे रहिवासी, मात्र आता अहमदाबादेत स्थायिक झालेले प्रभाशंकर पुरोहित यांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्याचे वृत्त आहे.
उतरत्या वयात उन्हाचा तडाखा सहन करीत ‘बेटी बचाव-स्वच्छ भारत’ अभियानाचा प्रचार करणार्‍या जोशींनी तेथे योगाचाही प्रचार केला. त्यांच्या या कामगिरीला गुजराती मीडियाने चांगलीच प्रसिद्धी दिल्याने अहमदाबादेत ते एकाएक सेलीब्रिटी झालेले आहेत. ४४ वर पारा असताना धारणी येथून सायकलवर एकटे निघालेले जोशी ६ दिवसांनी अहमदाबादमध्ये दाखल झाले. नागरिक, लोकप्रतिनिधी, युवक तथा महिलांसह स्थानिक मीडियाने जोशींचे जोशात स्वागत केले.
तेथील दूरचित्रवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. ६२५ किमीचा प्रवास सुखरूप केल्यावर आता राजस्थानमार्गे परत धारणीला परतण्याची त्यांची योजना आहे. दूरध्वनीवर धारणीकरांच्या शुभेच्छा स्वीकारतांना लालाभाई म्हणाले की, अनेक दुर्धर रोगाने ग्रस्त झाल्यावर मी योग सुरू केला, तेव्हा मला योग्य आरोग्य लाभले.
सायकल यात्रा करण्याची प्रेरणा आणि हिंमत योगामुळे प्राप्त झाली. गुरू खांडरे यांच्यासोबत लालाभाई धारणीत संस्कृत शिकवणी वर्ग चावलतात. (तभा वृत्तसेवा)