हंगामा है क्यों बरपां…

0
85

अग्रलेख
काळ कसा बदलत जातो बघा… काळाचा अल्लगच आपला प्रभाव राहतो. आता बघा, मुलंही वयात आली की ‘बसू’ लागली आहेत. या बसण्याचे संदर्भ मात्र बदलले आहेत. म्हणजे अगदी दहावी- बारावीतल्या मुलांनाही काही टेन्शन आले (खरेतर आजकाल मुलींपेक्षा मुलांचेच टेन्शन माय-बापांना अधिक असते), तर ते लगेच बसतात आणि मग त्यावर तोडगा काढतात. हे बसणे इतके अत्यावश्यक झाले आहे की, मग टेन्शन आले म्हणून बसायचे, तर बसायचे असते म्हणून कश्शाचेही टेन्शन घेऊ लागली आहेत मुलं. म्हणजे अगदी दहावी किंवा बारावीत क्लास लावायचा आहे तर तो कुठला लावायचा, याचा खूपच ताण येतो. मग नेमका कुठला क्लास लावायचा यासाठी कुठेतरी बसायचे ठरते आणि हलकासा मद्यार्क पोटात गेल्यावर मग कुठला क्लास लावायचा, हे ठरत असते. वयात येतानाच लागलेली ही ‘बसण्याची’ सवय मग वय निघून गेल्यावरही कायम राहते. या बसण्यातून नेमक्या समस्या सुटतात का, हे नेमकेपणाने सांगता येत नाही, पळवाटा मात्र शोधल्या जातात. गद्य, पद्य आणि मद्य हे रसिकतेचे लक्षण झालेले आहे. काही काळाने गद्य आणि पद्य गोठते. भाषा अवगुंठते. (उगाच आपला इम्प्रेशन मारण्यासाठी मराठीतला कठीण शब्द) मात्र, मद्य हे नेहमीच प्रवाही राहिलेले आहे. त्याचा झरा काही आटला नाही. अगदी पौराणिक काळापासून तो आहे तसाच आहे. एक मात्र नक्की की, रसाळ मद्य घोटाघोटाने पोटात गेल्यावर भाषा अडखळते. ‘लहानपण दगा देवा,’ असे म्हणतात. माणसं मात्र पोटातली जेव्हा ओठात येते तेव्हा बोल बोबडे होतात. वागणेही अगदी लहान मुलांसारखे होते. हा ‘मद्यप्रभाव’ गेल्या अनेक पिढ्या कायम आहे. त्याचा प्रभाव जितका कायम आहे, तितकाच त्याला विरोधही कायम आहे. इतक्या प्रखर विरोधाला न जुमानता आणि त्या विरोधावर अगदी ‘ब्र’ही न म्हणता (आता पोटात असल्यावर ‘ब्र’सारखा कठीण शब्द म्हणताच येत नाही), मद्याची सत्ता मात्र कायम आहे.
दारूला असलेला हा विरोध आंधळाच आहे. म्हणजे ‘वाजलं-गाजलं हल्याच्या भोवती,’ अशी एक म्हण आहे, तसेच दारूचेही आहे. संसाराची धूळधाण झाली, अपघात झाले, घातपात झाले, गुन्हेगारी वाढली, आळस वाढला; एवढेच काय, तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या, तरीही दारूलाच दोष दिला जातो. म्हणजे कसलीही शहानिशा न करता एकदम दारूलाच दोष देणे खरेच योग्य आहे का? संस्कारात बसते का हे तुमच्या? बरे, दोष द्यायचा, त्यावर चर्चा करायची आणि बसायचेही? बसताना मात्र आपण कसे ‘लिमिट’मध्येच असतो, हेही आवर्जून सांगायचे…
आजकाल दारूबंदीची मागणीही वाढली आहे. अमका जिल्हा दारूमुक्त करा, तमक्या भागात दारूबंदी करा, यासाठी आंदोलने केली जातात. देशात अनेक राज्यांत दारूबंदी आहे. बाजूची राज्ये मग त्यांना मदत करतात. ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे त्या जिल्ह्याच्या सीमाभागात दारूची दुकाने परिसीमा गाठतात. बंदी म्हणजे संधीच वाटते शौकिनांना. तरीही दारूवर हल्ले काही थांबलेले नाहीत. आताही बघा ना, काही कारण नसताना हायवेवर ५०० मीटरच्या आत दारूविक्रीची दुकाने, बार वगैरे नसावेत, असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे, वाहनचालक मस्त ढोसतात आणि नशेत गाडी चालविल्याने अपघात होतात, माणसे मरतात, असा एक आक्षेप होता. आता या संदर्भात नेमकी याचिका कुणी दाखल केली आणि त्यावर न्यायालयाने दिलेला हा निर्णय आता कसा अंमलात आणायचा, असे अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. या निर्णयाने हल्लकल्लोळ उसळला आहे. अनेकांची म्हणण्यापेक्षा बहुतांश लोकांची अडचण झालेली आहे. आता ५०० मीटरची ही न्यायालयीन लक्ष्मणरेषा थोडी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ती मर्यादा २२० मीटर करण्यात आली. इतके बाजूला जाऊन प्यायले आणि मग पुन्हा वाहने रस्त्यावर आणली, तर तोवर मद्यप्रभाव कमी झालेला असतो का? बरे, ५०० असो की २२० मीटर, पिणारे पिण्यावरच आले असतील, तर ते मीटर्सच काय, किलोमीटर्सचे अंतर पार करतील! त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल. आजूबाजूला, असली मन आणि शरीरही हलके करणारी दुकाने नसतील तर रस्तेही थकतील. बरे, आजवर महामार्गांवर जितके अपघात झाले ते काय केवळ आणि केवळ दारूमुळेच झाले का? नेमके दारूमुळे किती अपघात झाले आणि त्यात किती लोक मेलेत, याची काही आकडेवारी कुणाकडे आहे का? बरे, ज्यांना प्यायचीच आहे, ते बेटे काही केले तरी कसे थांबणार? ते प्रवासाला निघायच्या आधीच गाडीत आणि पोटात ‘पेट्रोल’ टाकूनच निघतील. साठाही करून ठेवता येईल. कारण, पिऊन गाडी चालविण्यावर निर्बंध नाहीत. महामार्गाच्या अमुक अंतरात दुकाने नकोत, असा नियम आहे. आता मग टोल नाक्यांवर पिलेल्यांची तपासणी करण्याची यंत्रणाही राबवावी लागेल… अशा खूप अडचणी आहेत. कित्ती कित्ती लोकांचा रोजगारही त्यामुळे बुडेल. बारमधील वेटर्सपासून वेफर्स तयार करणार्‍यांपर्यंत अनेकांच्या कमाईवर संक्रांत येईल. राज्यकर्त्यांना या सार्‍याचाच विचार करावा लागतो. या व्यवसायातून महसूलही बर्‍यापैकी मिळतो. तो विकास कामांसाठी खर्च केला जातो. आता ही दुकाने बंद करून काय विकास थांबवायचा का?
हे सारे सवाल आहेतच, पण काही जगण्याला काव्यभाव आहे की नाही? म्हणजे असायलाच नको का? पिल्यानंतर माणसं सब्‌कॉन्शसली कॉन्शस होतात. सावध होतात. रसिकता अशी पाझरू लागते. ज्यांनी महामार्गांवर चारचाकी वाहनाने प्रवास केलेला आहे त्यांना कळेल की दिवसभराचे आपले ठीक असते, सांजेला अस्वस्थ वाटते. सांजेला एक छान असे झिरझिरीत वातावरण तयार होते.
‘शाम और दिलनशीन हो जाती हैं|
फुलों की तरह जमीन हो जाती हैं|
तू अगर साथ चले सखी तो
चाल अपने आप हसीन हो जाती हैं…!’
असे वातावरण असते. एखाद्या ढाब्यावर, बारमध्ये बसले की शीण निघून जातो. प्रवास कसा सुखकर होतो. बरे, पावसाळा, हिवाळा या ऋतूत तर दिवसही आपला गुलजार झालेला असतो. अशा वेळी जऽऽरा मदिर मदिर वाटू लागले तर त्यात गैर ते काय? बरे, प्यायचीच नाही, असा काही आदेश नाही. प्रवासाला निघताना ‘सुरक्षित’ ठिकाणी बसून निघता येते. बसण्याची अडचण कायद्याला नाही अन् समाजालाही. मग ज्यांना बसायचे आहे, अगदी वयात आल्यापासून मदिरेशी जुळलेले हे भावबंध असे अचानक बाकायदा तोडून टाकायचे म्हणजे काय? प्यायची नसेल सरसकट तर तसा कायदा करा. देशातूनच बंद करा. हे काय? प्या, पण अशी अशी प्या. त्यात अल्कोहोल इतकेच असावे, अमक्या ब्रॅण्डची प्या, सुरक्षित प्या, अमक्या ठिकाणी नका पिऊ, पिताना बालांचे डान्स नका पाहू, प्यायची असेल तर परमिट घेऊन प्या, जवळ बाळगायची असेल, तर इतकीच बाळगा. रेल्वेत नेऊ नका, गाडीच्या डिकीत ठेवू नका, महामार्गावर दुकाने नकोत, असलीच तर इतक्या मीटरच्या आत नकोत… अरे! पिऊ द्यायची असेल तर मुक्तकंठाने (अगदी अचूक शब्द) पिऊ द्या… उर्दूचे तालेवार शायर इकबाल यांनी हेच म्हटले आहे- ‘वाईज शराब पिने दे, मस्‌जिदमे बैठकर
वर्ना ऐसी जगह बता, जहॉं खुदा ना हो…’
एकुणात, ‘हंगामा है क्यों बरपां, थोडीसी तो पिली हैं…’