सेनेच्या माफीनंतर, हवाईबंदी मागे!

0
171

दिल्ली दिनांक
सामनाकारांनी मैदानात उडी मारली. पुन्हा तेच धमकीतंत्र, पुन्हा तीच गुंडागर्दी. अखेर सेना खासदाराच्या हवाई प्रवासावरील बंदी उठली. कारण, त्यांनी विमान वाहतूक मंत्र्यांकडे लेखी विनंती केली व प्रत्यक्ष भेटीत बंदी उठविण्यासाठी गयावया केली. सामनाकार बाहेर येऊन धमकीची भाषा बोलत होते, तर सेनेचे एक खासदार, बंदी उठविण्यासाठी आर्जव, विनंती करीत होते. सरकारने दखल घेतली, ती या आर्जवाची.
••
शिवसेना खासदाराच्या माफीनाम्यानंतर त्या खासदाराच्या हवाई प्रवासावरील बंदी उठली. सेनेचे एक खासदार रवींद्र गायकवाड यांचे नाव लोकसभेत आणि बाहेरही गाजत होते. एखाद्या चांगल्या भाषणामुळे त्यांचे नाव गाजत नव्हते वा त्यांच्या एखाद्या चांगल्या कृत्यामुळे त्यांचे नाव होत नव्हते, तर एअर इंडियाच्या एका अधिकार्‍याला चप्पल मारल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत होते. आपण त्या अधिकार्‍याला २५ वेळा चप्पल मारली असाही त्यांचा दावा आहे. नंतर सामनाकारांनी मैदानात उडी मारली. पुन्हा तेच धमकीतंत्र, पुन्हा तीच गुंडागर्दी. अखेर सेना खासदाराच्या हवाई प्रवासावरील बंदी उठली. कारण, त्यांनी विमान वाहतूक मंत्र्यांकडे लेखी विनंती केली व प्रत्यक्ष भेटीत बंदी उठविण्यासाठी गयावया केली. सामनाकार बाहेर येऊन धमकीची भाषा बोलत होते तर सेनेचे एक खासदार, बंदी उठविण्यासाठी आर्जव, विनंती करीत होते. सरकारने दखल घेतली, ती या आर्जवाची.
नैराश्याचा परिणाम
केंद्रात व महाराष्ट्रात या दोन्ही ठिकाणी होणारी वसुली बंद झाल्यामुळे सेना नेत्यांना किती नैराश्य आले आहे याचा हा पुरावा आहे. त्या नैराश्याचा फटका एअर इंडियाच्या अधिकार्‍यास बसला. सेना नेत्यांचे हप्ते बंद झाले. त्यात या अधिकार्‍याचा काय दोष? एअर इंडिया तुमच्या बापाची नाही असे सेना खासदाराने त्या अधिकार्‍याजवळ म्हटल्याचे सांगितले जाते. एअर इंडिया जशी या अधिकार्‍याच्या मालकीची नाही, तशीच ती शिवसेनेच्या मालकीचीही नाही.
एअर इंडियाचे अभिनंदन
शिवसेनेचा सारा राग एअर इंडिया व अन्य विमान कंपन्यांच्या एका निर्णयावर आहे. या सर्व विमान कंपन्यांनी सेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर एकप्रकारे बंदी घातली होती. या निर्णयासाठी एअर इंडियाचे प्रमुख अश्‍विनी लोहानी यांचे अभिनंदन करण्यात आले पाहिजे.
भारत सरकारमध्ये जे काही चांगले अधिकारी आहेत, सचोटीचे अधिकारी आहेत, त्यात अश्‍विनी लोहानी यांचा क्रमांक फार वरचा आहे. लोहानी हे भारतीय रेल्वेचे अधिकारी. रेल्वेत त्यांना फार काम करू देण्यात आले नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणा आड येत होता. मध्यप्रदेशातील शिवराजसिंह सरकारने त्यांना मध्यप्रदेश पर्यटन मंहामंडळाचे प्रमुख नेमले आणि पाहता पहता लोहानी यांनी मध्यप्रदेशला देशाच्या पर्यटन नकाशावर आणले. नव्यानव्या कल्पना, योजना त्यांनी राबविल्या. तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्यावर लोहानी दिल्लीत परतले. केंद्रात सत्ताबदल झाला. रेल्वेत आपल्याला काम करण्याची संधी मिळेल असे त्यांना वाटले. पण, पुन्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. कंटाळून त्यांनी मध्यप्रदेशात परतण्याचा निर्णय घेतला. ते मध्यप्रदेशात आपल्या कामावर रुजू झाले आणि अचानक त्यांना दिल्लीचे बोलावणे आले. एअर इंडियाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. कोणताही वशीला नाही, शिफारस नाही. एअर इंडियात आल्यापासून लोहानी या आजारी महाराजावर उपचार करीत आहेत.
गुंडगिरी मोडली
सरकारी नोकरी करीत असतानाही देशासाठी काही तरी करण्याची इच्छा असणारा हा अधिकारी. एअर इंडिया सुधारण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यात अडचणी आहेत याची त्यांना कल्पना आहे. त्यातून मार्ग काढीत त्यांनी एअर इंडियाचे धावपट्टीवरून घसरलेले विमान पुन्हा धावपट्टीवर आणले आहे. सेना खासदाराने एअर इंडियाच्या एका अधिकार्‍यास मारहाण केल्यानंतर लोहानी यांनी सेना खासदाराच्या हवाई प्रवासावर बंदी घातली. हा एक मोठा निर्णय होता. सेना खासदाराने माफी मागितल्यानंतरच तो मागे घेण्यात आला. आता सामनाकार त्यांना ब्लॅकमेल करण्याची भाषा बोलत आहेत. आम्ही हे करू, आम्ही ते करू असे म्हणत ते लोहानी व अन्य हवाई कंपन्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई-पुणे येथून एकाही विमानाचे उड्डाण करू दिले जाणार नाही असे म्हणण्यापर्यंत सेना खासदारांची मजल गेली होती. पण, एका ठिकाणी सेना खासदारांचा अंदाज चुकला. लोहानी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सेना खासदाराने माफी मागितल्याशिवाय त्याला एअर इंडियाने प्रवास करू दिला जाणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आले आणि तशी माफी मागण्यात आल्यानंतरच त्याच्या हवाई प्रवासावरील बंदी उठविण्यात आली. लोहानी यांनी ही ठाम भूमिका घेतली. पैसे वगैरे देऊन ते एअर इंडियाचे प्रमुख झालेले नाहीत. आपल्या सचोटीवर त्यांना हे पद मिळाले आहे. आणि दुसरीकडे सेना आणि सचोटी यांचा काय संबंध?
दिल्लीतील निवडणुका
दिल्ली महानगरपलिकेच्या निवडणुका येत्या २३ तारखेला होत आहेत. शीला दीक्षित सरकारने दिल्ली मनपाचे त्रिभाजन करुन तीन मनपा तयार केल्या. या तिन्ही मनपा सध्या भाजपाकडे होत्या. मात्र, या मनपांचा कारभार समाधानकारक राहिला नाही. राजधानीला स्वच्छ ठेवण्याचे काम मनपाकडे होते. ते या मनपांना करता आले नाही. नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नव्हती. नव्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला, जो योग्य होता. यात काही चांगल्या नगरसेवकांवर अन्याय झाला. पण, हा एक योग्य निर्णय होता. कारण, काहींना उमेदवारी देणे व काहींना नाकारणे असा निर्णय करणे जड जाणार होते. त्यातून मग सर्वांनाच उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याने भाजपला ही निवडणूक जिंकण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. दिल्लीच्या राजकारणावर उत्तरप्रदेशचा मोठा प्रभाव पडत असतो. उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या सीमाही लागून आहेत. उत्तरप्रदेशच्या लाटेचा परिणाम दिल्लीतही दिसणार आहे. उत्तरप्रदेशच्या निकालांनी एकीकडे भाजपला संजीवनी मिळाली आहे. सध्या कॉंग्रेसमध्ये नैराश्य आहे, तर पंजाबच्या निकालांनी केजरीवाल यांनाही हताश निराश केले आहे. पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या पक्षाला बहुमत मिळाले असते तर दिल्ली निवडणूक भाजपला जड गेली असती. आज ती स्थिती दिसत नाही. ६-७ मतदारसंघात तांत्रिक कारणांनी भाजप उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. तरीही तिन्ही मनपा भाजपला मिळतील असे संकेत आहेत. मात्र, त्यानंतर भाजपला राजधानीला स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यावे लागेल व तेव्हा भाजपच्या कामगिरीचा कस लागेल.
एकच मनपा?
दिल्ली मनपाचे त्रिभाजन झाल्याने अनेक समस्या तयार झाल्या आहेत. मुंबईसाठी एक मनपा असताना, दिल्लीसाठी तीन मनपा, तीन महापौर ही तशी हास्यास्पद स्थिती आहे. जगात असे कुठेही झालेले नाही. केवळ भाजपाला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. नजीकच्या काळात पुन्हा एकच मनपा तयार होणे दिल्लीसाठी योग्य ठरणार आहे. यातून अनेक प्रशासकीय समस्या सुटतील व दिल्लीकरांना नागरी सोयी मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल.
– रवींद्र दाणी