गुजरात, हिमाचलच्या निवडणुकीत ईव्हीएम व मतपत्रिकाही वापरा

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

0
41

नवी दिल्ली, १० एप्रिल
गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील विधानसभेच्या अर्ध्या निवडणुका मतपत्रिकांच्या तसेच अर्ध्या निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात याव्या, अशी मागणी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाकडे केली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात जदयु, सपा, बसपा, द्रमूक, तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. लोकांचा ईव्हीएमवरुन विश्‍वास उडाला असल्याचा दावा करत निवडणुकीत पुन्हा मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विरोधी पक्ष गेल्या दिवसांपासून ईव्हीएममध्ये छेडखानी करण्यात येत असल्याचा आरोप करत आहे. विशेष म्हणजे ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची छेडखानी शक्य नसल्याचे निवडणूक आयोगातर्फे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र हा मुद्दा सोडण्याची विरोधकांची तयारी नाही. निवडणूक आयोगाकडे जात या मुद्यावरून आणखी काही दिवस वातावरण तापवण्याची विरोधकांची व्यूहरचना दिसते आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेतली. व्हीव्हीपीएटीचा वापर निवडणुकीत करण्याचीही विरोधकांची मागणी आहे.
देशात निष्पक्ष आणि तटस्थ वातावरणात निवडणुका होतात, याची देशवासीयांना खात्री पटवण्यासाठी अशी मागणी विरोधकांतर्फे केली जात आहे. यावर्षीच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीत ईव्हीएम आणि मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी आयोगाकडे केली. या भेटीची माहिती नंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि द्रमुकचे टी. सिवा यांनी पत्रकारांना दिली. विशेष म्हणजे ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय आज सकाळी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. (तभा वृत्तसेवा)