राज्यातील १८,९९३ गावे तंटामुक्तीची मानकरी

• आठ वर्षातील मोहिमेची कामगिरी • विदर्भातून गोंदिया, भंडार्‍याचा समावेश

0
110

हेमंत निखाडे

तिवसा, १० एप्रिल 
गावांमध्ये शांतता व सौहार्दमय वातावरण प्रस्थापित करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने सन २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सन २०१५ या वर्षापर्यंत एकूण १८,९९३ गावे तंटामुक्त झाली आहेत. तंटामुक्त मोहिमेने एकूण आठ वर्षात मोठ्या प्रमाणात तंटे निकाली काढण्याची कामगिरी केली आहे.
१५ ऑगष्ट २००७ पासून संपूर्ण राज्यात ही महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला संपूर्ण राज्यभरात व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मोहिमेत राज्यातील १८,९९३ गावे तर तंटामुक्त झालीच, सोबतच गोंदिया, भंडारा व लातूर हे ३ जिल्हे १०० टक्के तंटामुक्त होण्यात यशस्वी झाल्याची माहिती आहे. ज्यामुळे इतर जिल्ह्यांनी या तीन जिल्ह्यांची प्रेरणा घेऊन आपापले जिल्हेसुद्धा पूर्णपणे तंटामुक्त करणे गरजेचे आहे. यासाठी संबधित गृह विभागाने त्या त्या गावात भेट देऊन गावे तंटामुक्त करण्यात पुढाकार घेणेही गरजेचे झाले आहे.
सन २००७-०८ ते सन २०१४-१५ या आठ वर्षात राज्यभरातील १८,९९३ गावे तंटामुक्तीची मानकरी ठरली आहे. या मोहिमेला दरवर्षी उत्तम असा प्रतिसाद मिळत असून राज्य तंटामुक्त होणे आता दूर नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी ‘गाव करी ते राव न करी’हे आता उर्वरित गावांनी गाव तंटामुक्तीकरिता पुढाकार घेऊन दाखवून देणे गरजेचे आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेत सन २०१४-१५ पर्यंत राज्यात एकूण १८,८३९ गावे तंटामुक्त झाली होती. तर त्यानंतर सन २०१५-१६ मध्ये राज्यातील १५४ गावे तंटामुक्त झाल्याने आता तंटामुक्त गावांची संख्या ही १९ हजारापर्यंत पोहचली आहे, हे विशेष ! (तभा वृत्तसेवा)