काळ्या पैशांविरोधातील युद्ध एका दमात संपणार नाही : नायडू

0
57

नवी दिल्ली, १० एप्रिल 
देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या काळ्या पैशांविरोधातील युद्ध एका दमात संपणार नाही. त्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला अनेक निर्णय घ्यावे लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. कॉंग्रेसच्या काळात हजारो कोटींच्या घोटाळ्यातून काळा पैसा तयार झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नायडू म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने काळ्या पैशांविरोधात आर्थिक युद्ध छेडले आहे आणि हे युद्ध एका दमात वा एका दिवसात संपणार नाही. नोटाबंदीसारखे उचललेले पाऊल हे त्यापैकीच एक असून ते योग्य दिशेने जात आहे. काळा पैसा संपविण्यासाठी आणि तो तयार होऊ नये, यासाठी आणखी कडक, मात्र देशाच्या हिताने योग्य, असे निर्णय घेण्यात येतील.
आर के नगर पोटनिवडणुकीबाबत त्यांनी सांगितले, की ईव्हीएमबद्दल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने योग्य त्या उपाययोजना केल्या असून, योग्य त्या कार्यवाही केलेल्या आहेत. मागील विधानसभांच्या निवडणुकीदरम्यान काही राजकीय पक्षांनी मतदारांना पैशांचे वाटप केल्याच्या बाबी आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
बापूजींचे आयुष्य मानवतेसाठी धडा
महात्मा गांधी अर्थात बापूजी यांचे आयुष्य मानवतेसाठी एक प्रकारचा धडाच आहे, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. गांधीजींच्या सत्याग्रह या चळवळीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात ‘गांधीजी इन चम्पारण्य’,‘रोमेन रोनाल्ड अँड गांधी करस्पॉण्डन्स’ आणि ‘बायोग्राफ ी ऑफ गांधी ’ या तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन पार पडले.‘बायोग्राफ ी ऑफ गांधी ’ आणि ‘गांधीजी इन चम्पारण्य’ या पुस्तकाचे लेखक डी. जी. तेंडुलकर असून, ते अनुक्रमे सन १९५१ आणि सन १९५७ मध्ये प्रकाशित करण्यात आले. गांधीजींच्या या तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन करताना आपणांस आनंद होत असून, त्यांच्या देशाभिमानी विविध संकल्पनांनी आपल्याला प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या स्वच्छता भारत मोहिमेमुळे देशात मोठी जागृती झाली आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)