गोहत्याबंदीचा मथितार्थ

0
127

अग्रलेख 
••
खरे तर सरसंघचालकांच्या वक्तव्यात नव्याने कुठल्याही तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आलेली नव्हती. गायींबद्दल जेवढा आदर या देशातील हिंदूंना आहे, स्वयंसेवकांना आहे तितकाच तो अहिंदूंनादेखील असावा, एवढीच त्यांची अपेक्षा होती.
••
कोणत्या गोष्टीचा बागुलबुवा करायचा, हे भारतातील विरोधी पक्षांना चांगलेच ठाऊक झाले आहे. कुठल्या गोष्टींमध्ये पराचा कावळा केल्याने प्रसिद्धी मिळते, याचीदेखील त्यांना माहिती झालेली आहे. माध्यमांच्या खाद्यान्नाबाबतही त्यांचा बर्‍यापैकी अभ्यास झालेला आहे. कोणते मुद्दे सेलेबल आहेत आणि कुठले डस्टबिनमध्ये टाकायचे म्हणजे शोकेसच्या रॅकमध्येदेखीलदेखील ठेवायचे नाहीत, याचा त्यांचा मार्केट सर्वेदेखील झालेला आहे. सार्‍यांचे त्यांनी स्वॉट ऍनॅलिसिसच करून टाकलेले आहे. राजकारणात व्यावसायिकता आल्याने म्हणा किंवा त्याचे बाजारीकरण झाल्याने सारे इव्हेंटफूल झाले आहे. नुकतीच नाही का महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी एसी बसमधून कर्जमुक्तीसाठी, पांढरेशुभ्र कपडे घालून ‘दणदणीत’ संघर्षयात्रा काढली. इस्त्रीच्या कपड्यांना धूळ लागणार नाही, तप्त उन्हाच्या झळा लागणार नाहीत यासाठी सारी दमछाक दिसत होती. ज्यांच्यासाठी मागण्यांचा फुलोर इव्हेंट मॅनेजरने तयार केला होता, तो मळकटलेल्या कपड्यातील शेतकरी अभावानेच यात्रेत दिसत होता. या इव्हेंटमुळे कर्जमुक्ती होणार की नाही हे माहीत नाही, पण शेतकर्‍यांच्या असलेल्या मतांच्या ऋणातून नेत्यांची मात्र मुक्ती झाली. असो. कुठले मुद्दे उचलायचे आणि कुठले नाही, हे आता नेते नाही तर माध्यमांवरील मुद्यांच्या टीआरपीवरून ठरू लागले आहे. अशात कामगार, मजूर, कष्टकरी, पांढरपेशा वर्ग, दलित, पीडित यांच्या मागण्यांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही. कारण हे मुद्दे ना प्रसिद्धी देत, ना या मुद्यांमध्ये फंड रेझिंगची क्षमता आहे. या नकारात्मक वातावरणातही काही जण नॉन इश्जूज् उचलताहेत न थकता, पण त्यांचे बोलविते धनी दुसरेच कुणीतरी आहेत! त्यांच्याकडे केवळ हे मुद्दे उपस्थित करून दोन समाजांमध्ये दरी कशी निर्माण होईल, हे पाहण्याचीच जबाबदारी इव्हेंट ऑर्गनायझरने दिली आहे. तेही ती जबाबदारी ‘दाम वैसा काम’ या उक्तीप्रमाणे इमानेइतबारे निभावताहेत. या अशा सार्‍या वातावरणात योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी रुजू झाले. सत्ता हाती येताच त्यांनी पहिले कोणते काम केले, तर राज्यातील अवैध कत्तलखान्यांवर बंदी घातली. ही बंदी घालताच राजकीय इव्हेंट मॅनेजर्सना (खरे तर यांना इमेज डॅमेजर्स म्हणायला हवे. कारण प्रशांत किशोर- ज्यांच्याकडे कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी दिली होती, त्यांनी पक्ष शिखरावर नेण्याऐवजी रसातळाला नेला.) या मुद्यात जबरदस्त टीआरपीची लक्षणे दिसू लागली. झाले सुरू आरोप-प्रत्यारोप. पण, नंतर असे लक्षात आले की, तत्कालीन अखिलेश यादव यांच्या सरकारनेच हे कत्तलखाने बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या कत्तलखान्यात वरवर सामसूम आणि आतमध्ये सारा धिंगाणा सुरू होता. रोज शेकडो गोवंशाची यांत्रिक पद्धतीने अवैध रीत्या कत्तल केली जात होती. जनावरांच्या ठोक खरेदीसाठी ठिकठिकाणी दलाल (गावगुंड?) नेमले जात होते आणि भाकड जनावरांच्या नावाखाली धडधाकट आणि आजारी जनावरेही निर्दयीपणे कापली जात होती. योगी आदित्यनाथ यांना या सार्‍यांची माहिती नव्हती असे नव्हतेच. पण, हाती सत्ताच नसल्याने सारा सावळागोंधळ माहिती असूनही त्यांना हातावर हात धरून बसण्याशिवाय काही करता येत नव्हते. पण, सत्ता येताच ते बोलत बसले नाहीत, त्यांनी करूनच दाखविले! हा हा म्हणता मुस्लिम समाजात जे अल्पसंख्यक कत्तल‘खाना’वादी आहेत, त्यांची नाराजी ओढवली गेली. त्याला विरोधकांनी खतपाणी घालण्याचे काम केले आणि या सार्‍यात योगींचे नायकपण घालवून त्यांना खलनायक ठरवले जाऊ लागले. काहींनी तर आणखी पुढे जाऊन, आधीच ठरलेल्या प्रायोजित नाट्यानुसार काही खाटकांना देशाच्या विविध भागात मारहाण करण्याचे कंत्राट दिले. कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे दिसताच या मंडळींनी ट्रकचालकांना, ही गुरे वाहून नेणार्‍यांना आणि गुरांसोबत असणार्‍यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. राजस्थानात एका ठिकाणी कथित गोरक्षकांच्या मारहाणीत एका जणाचा मृत्यूदेखील झाला. त्याच काहींनी, अशाच एका प्रकरणात, गावकर्‍यांनी केलेल्या अखलाखच्या हत्येचा मुद्दा उचलून धरला. दूरचित्रवाणीवरील बातम्या बघून, तर असे वाटायला लागले की, सार्‍या देशात कत्तलखान्यांकडे गुरे वाहून नेणार्‍यांवर संघपरिवारातील संस्थांच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्यांनाच प्रारंभ केलेला आहे. यातून पुन्हा एकदा संघपरिवारावर दोषारोपण सुरू झाले. फॅसिस्ट, हिंदुत्ववादी, अहिंसेचे मारक, गांधींचे मारेकरी… अशा सार्‍या विशेषणांची उजळणी होऊ लागली. पण, गोरक्षेमागचा मूळ उद्देश कुणी ध्यानातच घेतला नाही. भारतीय संस्कृतीत गोपूजनाला अग्रक्रम दिला जातो, हे सांगण्याची गरज नाही. पण, येथे फक्त गायच नव्हे, तर इतरही पशू-पक्ष्यांची पूजा, उपासना केली जाते. भगवान दत्तात्रेयांसोबत गाय आणि श्‍वानाचे छायाचित्र काय दर्शविते? नंदीबैल हे तर शंकराचे वाहनच होते आणि शंकराच्या गळ्यात फणाधारी नागदेखील असतो. हिंदूंची आद्यदेवता श्रीगणपती याचे वाहन मूषक, कार्तिकेयाचे वाहन मोर आणि देवीचे वाहन वाघ… अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. हे सारेच प्राणी नाही, तर या देशातील संस्कृती, किडे-मुंग्यादेखील मारू नका, असे सांगणारी आहे. येथील जैन, बुद्ध तत्त्वज्ञान तर केवळ शांतीचाच संदेश देणारे आहे. वृक्षवल्लींचीदेखील येथे पूजा होते. त्यामुळे या सार्‍यांचा रक्षणकर्ता असलेल्या मानवाचीच हत्या करण्याचे, त्यांना दुःखात टाकण्याचे, त्यांना संपविण्याचे पाप येथील संस्कृती करणार नाही. योगींच्या निर्णयाची री ओढत, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी गोहत्या करणार्‍याला फासावर लटकवण्याचा निर्णय घेतला, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोरक्षणाच्या व्रताचा पुनरुच्चार केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी एक पाऊल पुढे टाकले. आधीच अस्तित्वात असलेला कायदा त्यांनी अधिक कडक केला. नैतिक आणि आध्यात्मिक अध:पतनापासून जगाचे रक्षण करायचे असेल, तर गोरक्षणाला पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी गोहत्येच्या गुन्ह्याची शिक्षा वाढवून जन्मठेपेत बदलण्याचे विधेयक मंजूर केले. महाराष्ट्राने तर यापूर्वीच गोवंशहत्याबंदीचा कायदा मंजूर केलेला आहे. या सार्‍या पार्श्‍वभीवर उठलेला गदारोळ शांत करण्यास अखेर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनाच पुढाकार घ्यावा लागला. गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात करून टाकली. त्यासोबतच गोसंरक्षणासाठी केलेले कोणतेही हिंसक कृत्य गोसंरक्षणाच्या भूमिकेची बदनामी करणारे ठरेल, असे सांगून त्यांनी कथित गोरक्षकांना इशारादेखील दिला. गाईचे रक्षण करताना हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला जाऊ नये, अशी सूचनादेखील त्यांनी केली. खरे तर सरसंघचालकांच्या वक्तव्यात नव्याने कुठल्याही तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आलेली नव्हती. गायींबद्दल जेवढा आदर या देशातील हिंदूंना आहे, स्वयंसेवकांना आहे तितकाच तो अहिंदूंनादेखील असावा, एवढीच त्यांची अपेक्षा होती. या देशातील लोकांना एकत्र, गुण्यागोविंदाने राहायचे असेल, तर गोरक्षेचा धर्म प्रत्येकाने मनापासून स्वीकारावा, एवढाच त्यांच्या वक्तव्याचा मथितार्थ होता…