आई एकच, तेरवीचे कार्यक्रम मात्र दोन!

0
97

हे मातृप्रेम की वैरत्वाची परिसीमा
विजय निचकवडे

भंडारा, ११ एप्रिल 
आई, सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. अशी आई देवाघरी गेल्यानंतर अग्निसंस्कारानंतरचे सर्व सोपस्कार करण्याची जबाबदारी मुलांचीच. दोन मुले असतील तरीही सोपस्कार एकाच घरात आटोपण्याची रीत आहे. पण दोन सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी असतील अन् आईच्या तेरवीचे सोपस्कार एका भिंतीआड दोन वेगवेगळ्या घरात होऊन जेवणाच्या पंगती उठत असतील तर याला प्रेम म्हणावे की शक्तिप्रदर्शन हा प्रश्‍नच पडतो. होय, असाच अनुभव भंडार्‍याच्या वाट्याला आलाय्. आता स्वर्गातून आपल्या दोन लेकरांची ही मातृभक्ती पाहून नक्कीच त्या मातेची अवस्था हसावे की रडावे, अशी झाली असावी.
आई, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कोणत्याही मुलाच्या मनात तिच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा हा असतोच. पण ते व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. मात्र काही प्रसंग असेही अनुभवाला येतात, जेव्हा त्या आईचीच अवस्था गोंधळल्यासारखी होते. कदाचित दोन दिवसांपूर्वी भंडारेकरांनी अनुभवलेला प्रसंगही असाच काहीसा असावा. आज माणूस मी आणि माझे एवढ्यातच स्वतःला गुरफटून घेतो. ज्यामुळे बरेचदा रक्ताचे नातेही दूर जाते. प्रसंगी तिर्‍हाईत व्यक्ती आपली वाटून रक्ताचे नातेही दुरावते. शेतीवाडी, संपत्तीसारख्या गोष्टी याला कारणीभूत ठरतात. अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी जसे आई, वडील असेपर्यंत सामोपचाराने घेतले जाते. मात्र ज्येष्ठांचा हात डोक्यावरून निघून जाताच, हेच सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. अशाच दोन भावांच्या वैरत्वाची शिकार एका मातेला मृत्यूनंतरही व्हावे लागले.
येथील एका कुटुंबात आई व ४ भाऊ होते. भावाभावांमध्ये वाद झाले. त्यापैकी तिघे जण एकीकडे, अन् एक भाऊ स्वतंत्र राहू लागला. २८ मार्च रोजी त्यांच्या आईचे निधन, तिघे भाऊ राहत असलेल्या घरी झाले. भावाभावांमध्ये वैर एवढे होते की, भावाच्या घरात आईचा मृतदेह असेपर्यंत दुसर्‍या भावाने जाण्याचे टाळले अन् अंत्ययात्रा रस्त्यावर निघाल्यानंतर खांदा दिला. पहिल्या दिवशीचा हा अंक आटोपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी आईचा तेरवीचा कार्यक्रम झाला, तोही चक्क दोन वेगवेगळ्या घरी. एकाच भिंतीआड दोन भावांची घरे. मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी ना, मग एकमेकांच्या घरी जाणार कसे? आई तर दोघांचीही, मग काय दोघांच्याही घरी झाला आईच्या तेरवीचा कार्यक्रम! पाहुणे मंडळी तीच. दोन भावांच्या मातृप्रेमात मात्र अनेक अभ्यागतांची तारांबळ उडाली. कधी, कोण, कुठे जातो, हेही तेवढ्याच गांभीर्याने पाहिले जात होते. आईवरील अपार श्रद्धा दाखविणारा हा प्रसंग अनेकांनी अनुभवला. रक्ताच्या नात्यातील वैर एवढ्या टोकाला जाऊ शकते, यापेक्षा दुसरे दुर्दैव रक्ताचे नाते जपण्याचा आव आणणार्‍यांसाठी असूच शकत नाही. जरी यातून भावाभावांचे मातृप्रेम एवढाच अर्थबोध घेतला तरी त्या मातेचे काय? जिने सर्व मुलांच्या गुण्यागोविंदाने नांदण्याचे स्वप्न बघितले होते.