केजरीवालांविरुद्ध अटक वॉरंट

0
64

मोदींवरील ट्विट भोवले
नवी दिल्ली, ११ एप्रिल 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बारावी उत्तीर्ण आहेत, अशा प्रकारचे ट्विट करणे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चांगलेच अंगलटी आले आहे. आसामातील न्यायालयाने आज मंगळवारी केजरीवाल यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे.
केजरीवाल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर शंका उपस्थित करीत, ते केवळ बारावी उत्तीर्ण असल्याचे ट्विट केले होते. भाजपा नेते सूर्य रोंगफार यांनी याप्रकरणी आसामात केजरीवालांविरुद्ध गुन्हा दाखल करताना मानहानीचा दावाही दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला.
याप्रकरणी आता ८ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गेल्या दोन सुनावणीत केजरीवाल गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी केला आहे. यापूर्वी, न्यायालयाने त्यांना १० एप्रिल आणि ३० मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने जारी केलेला अटक वॉरंट हजार रुपयांच्या जामिनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. (वृत्तसंस्था)