कुलभूषण जाधव यांना फाशी

0
102

अग्रलेख

••भारताने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुलभूषण जाधव हा भारताचा पुत्र असून, त्याला वाट्‌टेल ती किंमत मोजून आम्ही परत आणणारच, असा निर्धार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत व्यक्त केला. पाकिस्तानने जर आणखी एक पाऊल पुढे टाकले, तर दोन्ही देशांतील संबंधात वितुष्ट येईल आणि त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील.
••
भारतीय नाविक दलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे, पाकिस्तानचे नापाक मनसुबे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. जाधव यांच्या शिक्षेचे पडसाद भारतात अतिशय तीव्रपणे उमटले असून, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला या भ्याड कृत्याबद्दल कठोर शब्दांत ठणकावले आहे. पाकिस्तानने कोणत्याही कायदा आणि न्यायाची बूज न राखता हा निर्णय अंमलात आणला, तर ही शिक्षा नसून कुलभूषण जाधव यांची अगदी आधीच ठरवून केलेली नियोजनबद्ध हत्या समजली जाईल, अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज यांनी नोंदविली आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यावर ‘रीसर्च ऍण्ड ऍनॅलिसिस विंग’ (रॉ)साठी पाकिस्तानविरोधात हेरगिरी करण्याचा आणि बलुचिस्तानात असंतोष माजविण्याचा प्रयत्न करण्याचा ठपका ठेवून ही कठोर शिक्षा दिली आहे. जाधव यांचा रॉसोबत काहीएक संबंध नसल्याचा खुलासाही भारत सरकार आणि स्वत: रॉने केलेला आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना बलुचिस्तानात ३ मार्च २०१६ रोजी पाकिस्तानच्या गुप्तवार्ता विभागाने मश्केल येथे अटक केल्याचे म्हटले आहे. पण, केवळ भारतानेच नव्हे, तर इराण आणि जर्मनीनेही हा दावा खोडून काढला आहे. इराणचे इस्लामाबादमधील राजदूत मेहदी हनारदोस्त यांनी गतवर्षीच पाकिस्तानचा आरोप खोडून काढताना म्हटले होते की, जाधव हा भारतीय एजण्ट आहे, ही बाब शंभर टक्के खोटी आहे. तर, जर्मनीचे पाकिस्तानमधील माजी राजदूत गुंटेर मुलाक यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे पक्की माहिती आहे की, जाधव यांचे इराणमध्येच चामन येथे तालिबान्यांनी अपहरण करून नंतर त्यांना पाकिस्तानला विकले होते. यावरून पाकिस्तान खोटे बोलत आहे, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. पण, पाकिस्तानने भारत, इराण आणि जर्मनीचाही दावा फेटाळून आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. अगदी गेल्या डिसेंबर महिन्यात जाधव यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधविषयक सल्लागार सरताज अजिझ यांनी पाकिस्तानी सिनेटसमोरच म्हटले होते. जाधव यांचे केवळ बयाण आमच्याकडे आहे. या शिवाय त्यांच्या बयाणाला पूरक असा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही, असेही अजिझ यांनी स्पष्ट केले होते. पण, पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कराने भारताचे काहीएक न ऐकता जाधव यांना फाशी देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे. या करारावर भारत आणि पाकिस्तानने स्वाक्षर्‍या केल्या आहेत व हा करार उभय देशांना मान्य असल्याची संमती दिली आहे. व्हिएन्ना करारानुसार उभय देशातील एखाद्या नागरिकाला अटक झाल्यास संबंधित देशाच्या राजनयिकाला त्याला तुरुंगात जाऊन भेट घेण्याची मुभा आहे. त्याच्यासोबत बोलणी करण्याची, त्याला सर्वतोपरी न्यायालयीन मदत देण्याचा आणि तुरुंगवासाविरोधात कोर्टात अपील करण्याचादेखील अधिकार व्हिएन्ना कराराने दिला आहे. पण, पाकिस्तानने आपण अशा कोणत्याही कराराचे पालन करणार नाही, अशी दर्पोक्ती केली आहे. जाधव यांच्या फाशीचा दिवस अजून ठरलेला नाही. तत्पूर्वी, भारताला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. जाधव हे, मुंबईतील पोलिस अधिकार्‍यांसाठी बांधलेल्या हिरानंदानी गार्डन येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील सुधीर जाधव हे मुंबईतूनच सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. भारतीय नाविक दलातून निवृत्ती पत्करल्यानंतर जाधव यांनी स्वत:ची एक फेरी कंपनी काढली होती. इराणमधील बंदर अब्बास येथून त्यांनी फेरीचा व्यवसाय सुरू केला होता. इराणमधील चाबहार बंदरापर्यंत त्यांच्या फेरी जायच्या. त्यांनी व्यवसायासाठी आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत नेली होती. घटनेच्या काही दिवस आधी ते मराठीतून आपल्या कुटुंबीयांशीही बोलले होते. त्यांना जेव्हा अटक झाली, तेव्हा त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट होता. त्यांना एका कॅमेर्‍यासमोर बसवून त्यांच्याकडून आपण रॉचे एजण्ट असल्याचे वदवून घेण्यात आले. पाकिस्तानने त्यांच्या कबुलीजबाबाची टेप जारी केली आहे, तिची फिल्म अतिशय निम्न दर्जाची आहे आणि ती १०२ ठिकाणी कापली गेल्याचा आरोप भारतातील सर्वच वृत्तवाहिन्यांनी केला आहे. आरोपीचा कबुलीजबाब हा न्यायालयात पुरावा मानता येत नाही. पण, पाकिस्तानने केवळ एवढ्या एका आधारावर आणि लष्करी कोर्टासमोर दिलेल्या बयाणावरून त्यांना गुप्तहेर ठरविले आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारताने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुलभूषण जाधव हा भारताचा पुत्र असून, त्याला वाट्‌टेल ती किंमत मोजून आम्ही परत आणणारच, असा निर्धार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत व्यक्त केला. पाकिस्तानने जर आणखी एक पाऊल पुढे टाकले, तर दोन्ही देशांतील संबंधात वितुष्ट येईल आणि त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशा स्पष्ट शब्दांत सुषमा स्वराज यांनी इशारा दिला. जाधव यांना भेटू देण्यात आले नाही, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, तरीही त्यांना फाशीची झाली आहे, जी निंदनीय आहे. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत, आम्ही जाधव यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. एखादा गुप्तहेर हा भारतीय पासपोर्ट घेऊन जाईल का? त्यांना भेटू दिले गेले नाही, नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताची आणि कायद्याची पायमल्ली करून पाकिस्तानने आपल्या आडमुठ्या धोरणाचा परिचय दिला आहे. आम्ही हे सहन करणार नाही. या मुद्यावर संपूर्ण विरोधी पक्ष एकवटल्याचे दिसले. कॉंग्रेसच्या रेणुका चौधरी म्हणाल्या, पाकिस्तानने ठिणगी टाकली आहे. पण, याचे गंभीर परिणाम त्यांना पुढे भोगावे लागतील. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची तीव्र शब्दांत निंदा करताना म्हटले की, जाधव यांना आधी पाकिस्तानात नेण्यात आले आणि तो भारतीय हेर असल्याचा तमाशा आता पाकिस्तान जगासमोर दाखवीत आहे. आमच्या बंधूला परत आणण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. कॉंग्रेसचे ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खडगे, राष्ट्रवादीचे माजीद मेमन आणि अन्य पक्षाच्या खासदारांनीही पाकिस्तानवर तीव्र शब्दांत टीका केली. भारताने आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन जाधव यांना मुक्त केले पाहिजे आणि पाकिस्तानच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा पर्दाफाश केला पाहिजे.