‘आय क्लीन अमरावती’च्या वेडात निघाले वीर विद्यार्थी सात
गिरीश शेरेकर
अमरावती, ११ एप्रिल
लोक काहीबाही खातात अन् पच्चकन् थुंकतात… पान, खर्रा, गुटखा आणि काय काय… थुकंतात कुठेही, कधीही अन् केव्हाही. माणसांच्या शहरात जनावरेही राहतात पण त्यांच्या तुलनेत विविध ठिकाणी घाण करण्याची माणसांची क्षमता विलक्षण आहे. सार्वजनिक ठिकाणी तर भिंतींवर ही ‘थुंकचित्रे’ दिसतात. अमरावतीच्या सात वेड्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा कांचनकीडा चावला अन् त्यांनी सुरू केली थुंकचित्रे असलेल्या भिंतींना वारली पेंटिंगचा मुलामा देत सुशोभित करण्याची मोहीम!
अभियांत्रिकीच्या ध्येयवेड्या विद्यार्थांनी या मोहीमेला ‘आय क्लिन अमरावती’ असे नाव दिलेय्. त्यांचे हे काम पाहून प्रत्येक अमरावतीकरांच्या मनातला ‘आय’ जागा व्हावा… या पेंटिंगला त्यांनी महिला सबलीकरणाची थिम दिली आहे.
‘आय क्लीन अमरावती’ची मुहुर्तमेढ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेला असलेल्या आदित्य माथनकर याने रोवली आहे. त्याला वारली पेंटिंगची विशेष आवड असलेल्या त्याच्या वर्गातल्या शिवाली रोडे या विद्यार्थिनीची साथ मिळाली. काही तरी वेगळे करण्याच्या विचारात असलेला आदित्य आणि स्वच्छतेसह पेंटिंगची आवड जोपासणारी शिवाली यांनी ‘आय क्लीन अमरावती’च्या माध्यमातून शहरातल्या खराब झालेल्या सर्व भिंती सुशोभित करण्याचे मॉडेल तयार केले. ही संकल्पना त्यांनी आपल्याच वर्गातल्या समीक्षा नागपुरे, एश्‍वर्या पनपालिया, वैष्णवी म्हस्के, सुमित कडू, ज्ञानवंत नेहारे यांना सांगितली. त्यांना ही ती भावली. त्यांनी अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् वेडात दौडले हे स्वच्छतावीर मराठी तरुण सात!
त्यांनी कामाला सुरुवात करण्यासाठी शहरातल्या शिवटेकडीची निवड केली. पान व खर्र्‍याच्या पिचकार्‍या मारुन खराब केलेल्या भिंती रंगविल्या. विद्यार्थी हे कार्य जेव्हा करीत होते, तेव्हा टेकडीवर येणार्‍या अनेकांना त्याचे आश्‍चर्य वाटले. कशासाठी? कोणी सांगितले? असे अनेक प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले. या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा या विद्यार्थांनी दिली, तेव्हा प्रश्‍न विचारणारेही अंतर्मुख झाले. वारली पेंटिंगने सुशोभित झालेल्या या भिंती शिवटेकडीच्या सौंदर्यात आता भर घालत आहेत. शुभम खोपे, विक्की उल्हे व अश्‍विनी आष्टनकर हे त्यांच्याच वर्गातले आणखी तीन विद्यार्थी अभियानाशी आता जुळले आहेत. मनपा कार्यालय परिसरातील दर्शनी भागाची भिंत त्यांनी काही दिवसांपूर्वीच सुशोभित केली. रविवार, ९ एप्रिल रोजी या विद्यार्थांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याची भिंत वारली पेंटिंगने आकर्षक केली. भिंतीवर कथ्था रंग मारून पांढर्‍या रंगाने त्यावर वारली पेंटिंग केले जाते. अभियांत्रिकीचा अभ्यास सांभाळून या विद्यार्थांना शहरातल्या सर्वच खराब भिंती सुशोभित करायच्या असून, शहराच्या मध्यभागी असलेल्या सायन्सकोर मैदानाची सुरक्षा भिंत त्यांना आता खुणावत आहे. तसे नियोजन त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची अनेकांनी प्रशंसा केली असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांचेही त्यांना सहकार्य मिळत आहे.
फेसबुक पेज व ऑनलाईन मेंबरशिप
‘आय क्लीन अमरावती’ हा उपक्रम यशस्वी व्हावा आणि नागरिकांपर्यंत तो पोहोचून जागृती व्हावी, या उद्देशातून विद्यार्थांनी फेसबुक पेज तयार केले आहे. हजारो लाईक या पेजला आतापर्यंत मिळाले आहेत. हाती घेतलेले कार्य मोठे असल्यामुळे सहकार्‍यांची आवश्यकता लक्षात घेऊन ‘आय क्लीन अमरावती’साठी ऑनलाईन मेंबरशिप त्यांनी सुरू केली आहे. आतापर्यंत ३२ जणांनी ती स्वीकारली आहे. भविष्यात ‘आय क्लीन अमरावती’ चळवळ होईल, असा विश्‍वास त्यांना आहे.
मनी वसे ते साकारण्यासाठी पॉकेटमनी
हे सर्व करण्यासाठी पैसे लागतात आणि ते कुठून आले, असा प्रश्‍न साहजिकच सर्वांना पडला असेल. पण, ध्येयवेड्या या विद्यार्थांना त्याची चिंता कधीच नव्हती. कारण, काटकसरीतून आपल्या जवळच शिल्लक राहिलेले पैसे त्यांनी या कार्यासाठी गोळा केले आहे. त्यातूनच त्यांनी तीनही ठिकाणच्या भिंती सुशोभित केल्या आहेत. या कार्यासाठी राजकीय पक्ष व पुढार्‍यांची मदत घ्यायची नाही, हे त्यांनी सुरुवातीलाच ठरविले आहे. त्यामुळे मनी वसे ते साकार करण्यासाठी त्यांनी स्वत:चा पॉकेट‘मनी’च वापरला आहे.