यवतमाळ, १२ एप्रिल 
शेतकरी, शेतमजूर, विधवा, सैनिक आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी ‘सीएम टू पीएम’ अशी काढलेली आसूड यात्रा बुधवार, १२ एप्रिल रोजी यवतमाळात दाखल झाली. यावेळी जिल्हा परिषद बचत भवनात शेतकर्‍यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता.
या जनता दरबाराला आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी आसूड यात्रेचे महत्त्व पटवून सांगितले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही आसूड यात्रा काढण्यात येत असल्याचे आ. कडू यांनी यावेळी सांगितले.
ही यात्रा मंगळवार, ११ एप्रिल रोजी नागपूर येथून निघाली असून ती २१ एप्रिल रोजी गुजरात येथील वडनगर येथे संपणार आहे. या दरम्यान ही आसूड यात्रा वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, सुरत, अहमदाबाद अशी मार्गक्रमण करीत वडनगर येथे पोचणार आहे.
या आसूड यात्रेत प्रामुख्याने स्वामिनाथन आयोगाची शिफारस त्वरित लागू करा, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा,
शेतमालावरील निर्यातबंदी हटवा, शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या, अपंग आणि विधवा यांना ५ हजार रुपये प्रतीमाह मानधन द्या, या सोबतच माजी सैनिक आणि वृद्ध विधवा यांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी करा, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.(तभा वृत्तसेवा)
शेतकर्‍यांनीच ओढले यात्रेवर ‘आसूड’
यवतमाळात दाखल झालेल्या या आसूड यात्रेनिमित्त बुधवारी सकाळी १० वाजता शेतकर्‍यांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शेतकर्‍यांनी या यात्रकेडे आणि जनता दरबाराकडे पाठ फिरवून यात्रेवरच आसूड ओढल्याचे दिसून येत होते. या जनता दरबारात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचाच भरणा दिसून येत असल्याने या आसूड यात्रेच्या मूळ उद्देश आणि आधारालाच धक्का बसल्याचे दिसून आलेे.