ऍड. व्ही. आर. मनोहर यांना डी.लिट्, तर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डी.एम.एस्सी. पदवी
वर्धा, १२ एप्रिल 
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारोह गुरुवार, १३ रोेजी सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या समारोहात केंद्राचे आयुष विभागाचे मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल.
यावेळी विविध आयुर्विज्ञान शाखातील एकूण ६५१ विद्यार्थी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा प्राप्त करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. गोडे पुढे म्हणाले, विशेष म्हणजे यावर्षी या समारंभात सहा दशकांपासून समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. व्ही. आर. मनोहर यांना डॉक्टर ऑफ लेटर्सने तर कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस् या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच यावर्षी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ३४ व्यक्तींना आचार्य पदाचा सन्मान प्राप्त होणार आहे. या समारोहात वैद्यकीय शाखेतील ३०० व दंतविज्ञान शाखेतील १४९ (पीएच.डी., एमडी, एमएस, स्नातकोत्तर, स्नातक) आयुर्वेद शाखेतील ५९, परिचर्या शाखेेतील ११३ तर परावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकुण ६४२ विद्यार्थी कुलपतींकडून आरोग्यसेवेची दीक्षा घेतील. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना एकुण ७८ सुवर्ण पदकं व ३ रौप्य पदकांसह १३ चान्सलर अवार्ड आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यात वैद्यकीय शाखेतील करिश्मा माखिजा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली असून तिला १० सुवर्ण पदके व ५ पुरस्कार प्राप्त होतील.
यासोबतच डॉ. स्नेहील गोस्वामी यांना ४ सुवर्ण पदके, रोमा धांडे हिला ३ सुवर्ण व एक रोख पुरस्कार, अमृता बटवे हिला १ सुवर्ण व ३ रोख पुरस्कार तर मंजू मोहन हिला २ सुवर्ण व १ रौप्य पदक प्राप्त होणार आहेत. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, पॅरामेडिकल आणि परिचर्या शाखेतील एकुण १०६ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात येणार आहे. यात १९ विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या समारोहाला कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्र-कुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, आ. समीर मेघे, अशोक चांडक, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक देवपुजारी, परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. कुलकर्णी, भौतिकोपचार शाखेचे डॉ. सोहन सेलकर, व्यवस्थापन समितीचे राजीव यशराय उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. दिलीप गोडे यांनी दिली.
दीक्षांत समारोहापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सा करण्यासाठी व्यक्तीच्या शरीराचा अभ्यास करण्यासाठी डेडबॉडीचा वापर करावा लागत होता. परंतु, डेडबॉडी मिळणे कठीण झाले असल्याने त्यावर पर्याय म्हणून तज्ज्ञांनी ऍनाटॉमेज ही मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाची लहानात लहान माहिती देणारी मशीन तयार केली आहे. शरीर रचनेची माहिती देणारी देशातील दुसरी मशीन जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात लावण्यात आली असून त्याचे उद्घाटनही केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे, रजिस्टार डॉ. अंजनकर आणि जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती. (तभा वृत्तसेवा)