किरवंतांचे करिअर

0
61

प्रासंगिक
भारतीय राजकारणात शेतकर्‍यांचे स्थान काय, असा जर कोणी प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर बुडत्याला काडीचा आधार, असेच येईल. सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना वापरून घेतले. काळ स्वातंत्र्यापूर्वीचा असो की स्वातंत्र्यानंतरचा, शेतकर्‍याचे मरण अटळ आहे हेच सत्य ठरते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे व कोरडवाहू शेेतीच्या पारंपरिक व्यवस्थेमुळे अन्न उत्पादन गरजेपेक्षा कमी होत होते. शेतीत ओलिताच्या सोयीअभावी दुष्काळामुळे कृषी उत्पादन कमी होत होते. त्यामुळे अन्नाला जास्त महत्त्व दिले जात होते. त्यामुळे साहजिकच अन्न उत्पादन करणार्‍या शेती व्यवसायाला प्रतिष्ठा होती. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही त्यामुळे शेतकर्‍यांना जगाचा पोशिंदा म्हणूनही मान होता.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीला प्राधान्य दिले. पाण्यासाठी नद्यांवर मोठमोठी धरणे बांधली. त्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याचा परिणाम म्हणून शेतीतील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मुबलक अन्नधान्य उपलब्ध झाल्यामुळे जनतेचा कल बदलला. वाढलेल्या उत्पादनामुळे जनतेच्या गरजांची प्राथमिकता बदलली. अन्नाची प्राथमिकता बदलून ती तिसर्‍या स्थानावर गेली. पूर्वी वस्त्र व्यवसाय कापूस व रेशीम धाग्यावर अवलंबून होता. त्याची जागा कृत्रिम धाग्याने घेतली. त्यामुळे शेती व्यवसायाला हा फार मोठा धक्काच होता. त्यामुळे शेतीचे, त्या व्यवसायाचे अर्थकारणच बिघडून गेले. उद्योगधंद्यांना अमर्यादित वित्तपुरवठा, करात सवलती अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित केले. सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारच्या धोरणांना पाठिंबा दिला. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या किंमत आकारणीवर कुठलेही बंधन नाही. त्यामुळे उद्योगांना समाजाला लुटण्यास संधी देण्याचे काम सर्वच सरकारांनी केले.
मात्र शेती उत्पादनासाठी अनेक बंधने घालण्यात आली. निर्यात बंदी, जीवनावश्यक वस्तूंच्या संग्रहावर नियंत्रण, शेतीच्या उत्पादनाच्या किमती एका मर्यादेपलीकडे गेल्यास आयात करून त्या कमी करण्याचा सपाटा लावला.
शेती व्यवसाय डबघाईस आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कुटुंबच्या कुुटुंबं स्वत:ला संपविण्यास तयार झाली. त्यांना आपला सन्मानाने जगण्याचा मार्ग सापडेना. पण मग एक व्यक्ती उदयास आली. त्यांनी शेतकर्‍यांच्या दारिद्र्याचे कारण जगासमोर मांडले. ती व्यक्ती म्हणजे कै. शरद जोशी. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक तरुण मंडळी एकत्र आली. त्या विचारांचा शेतकर्‍यांमध्ये प्रसार करून त्यांच्यात विश्‍वास निर्माण केला. शेतकरी स्वत: आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरला. शेतकर्‍यांच्या या उग्ररूपामुळे काही काळ राजकारणीसुद्धा शेतकर्‍यांसमोर झुकले.
आज शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवरून राजकीय पक्ष राज्यात गोंधळ घालताना आपण पाहात आहोत. निवडणुका आल्या की, शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा नारा देण्यात येतो. पण शेतकर्‍यांवर वारंवार कर्ज का होते, हा प्रश्‍न सोडविण्याची तयारी ना सत्तारूढ पक्षाची आहे, ना विरोधी पक्षाची. कर्जमुक्तीचे हत्यार म्हणून वापरण्याचे तंत्र सर्वच राजकीय पक्षांनी वापरले.
राजकीय पक्षांच्या या खेळीपासून शेतकर्‍यांना सावध करण्याचा प्रयत्न शेतकरी नेते म्हणवून घेणार्‍यांना जमले नाही. उलट त्यांनी टाकलेल्या सत्तेच्या जाळ्यात स्वत:च अडकले. जे जाळ्याच्या बाहेर राहिले त्यांना जनाधार नाही. अशांना आता शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे भांडवल करून आपण शेतकर्‍यांसाठी काही तरी करीत आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे. ३० वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासह आत्महत्या करणार्‍या साहेबराव करपे पाटलांची अचानक काहींना आठवण झाली. आत्महत्या करणे ही नक्कीच वेदनादायक गोष्ट आहे. पण तिचे भांडवल करून स्वत:ला प्रस्थापित करणे हे त्याहीपेक्षा दु:खद आहे. हे नेते किरवंतांची भूमिका करीत आहेत. शेतकर्‍यांच्या मरणावर आपले अस्तित्व दाखविण्याचा खटाटोप करण्याची पाळी यावी हे शरणागती पत्करण्याचे लक्षण आहे.
कोण्या एका शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांचा कोणी वाली नाही, असे उद्गार काढले. त्यांनी स्वत: राम बनण्याची धडपड करण्याऐवजी संघटनेत सुग्रीव बनून राहिले असते तर शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली नसती. स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून संघटनेची मशाल तेवत ठेवण्यास मदत केली असती तर शेतकर्‍यांना वापरून घेण्याची कोणाची हिंमत झाली नसती.
– जयंत बापट
९४२१७७५६१६