हे उशिरा सुचलेले शहाणपण, की तात्पुरती राजकीय डागडुजी?

0
222

अग्रलेख
तलवारीच्या पातीशी स्पर्धा करू पाहणार्‍या धारदार अशा तीक्ष्ण शब्दांनी प्रहार करत भाजपाला अस्वस्थ करून सोडण्याचा त्यांनी उचललेला विडा, का कुणास ठाऊक पण, परवा पुरता जमीनदोस्त झाला. हे ‘परिवर्तन’ का, कसे, कशामुळे, कुणामुळे घडले माहीत नाही, पण ते घडले खरे! हो! ‘साहेबांना’ नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य झाले! विनासायास. कुठल्याही आडकाठीविना! अनपेक्षित आश्‍चर्याचा भाव चेहर्‍यावर आणून सारा देश आ वासून बघत राहिला अन् उद्धव साहेब, मोदींना भाऊ मानून मोकळे झाले.
राजकारणातली अपरिहार्यता माणसाला कधी कमालीची कठोर तर प्रसंगी तेवढीच मृदू बनवून जाते. काळानुरूप बदलत जाणार्‍या गरजेनुसार लोकांच्या वागण्याची पद्धतही मग बदलत जाते. कालचा संताप आजच्या स्मितहास्यात नकळत रूपांतरित होतो अन् आजची दाट मैत्री उद्या कडव्या शत्रुत्वात बदलणार नाही याची जराही शाश्‍वती देता येत नाही. आता हेच बघा ना, ज्यांच्यावर कालपर्यंत पातळी सोडून टीकेची झोड उठविली, ते मोदी आता उद्धव ठाकरेंना भावासारखे वाटू लागले आहेत! आहे ना कमाल? बरं इतकंच नाही, सध्याच्या सत्ताकाळात सोबतीने वावरताना प्रचंड मानसिक ओढाताण होत असलेल्या उद्धवांना लोकसभेची आगामी निवडणूकही विद्यमान पंतप्रधानांच्या नेतृत्वातच लढायची आहे. परवा राजधानीत या संदर्भातला ठराव त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या सहमतीने मंजूर झाला आहे. कालपर्यंतचे ते बाणेदार धोरण असे अचानक लेचेपेचे का व्हावे, परवापरवापर्यंतची लढण्याची ती बेदरकार भाषा क्षणात अशी ममत्वाची मऊशार झालर लेवून का सादर व्हावी, निवडणुकीच्या प्रचारयुद्धात ज्यांची गणती अफझलखानाच्या पंक्तीत केली, ते तमाम लोक त्यांना आता अचानक छत्रपतींच्या मावळ्यांसम ‘आपले’ का भासू लागले, असे कित्येक प्रश्‍न साहेबांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे निर्माण झाले आहेत. पण हीच तर राजकारणाची खरी गंमत आहे. नव्हे, तीच त्याची तर्‍हा आहे. इथे असेच वागायचे असते. कालचे सारे मागे टाकून पुढे जायचे असते. शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनीही तेच केले. नन्नाचा आपलाच पाढा विसरून सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक परवा दिल्लीत पार पडली. नरेंद्र मोदींपासून तर अमित शहांपर्यंत आणि रामविलास पासवानांपासून तर उद्धव ठाकरेंपर्यंत सारेच दिग्गज नेते त्यात उपस्थित होते. हे खरेच की, या बैठकीत सर्वाधिक अवघडलेपण उद्धव ठाकरे यांच्याच चेहर्‍यावर झळकत होते. टाळ्या मिळवण्याच्या नादात ज्यांना कायम शिव्याच हासडल्या, ते अमित शहा बाजूलाच बसले होते. ज्यांना थेट परकीय आक्रमकांच्या रांगेत बसविले, त्यांनीच आज सन्मानाने निमंत्रित केले होते. अगदी तीन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपासून तर नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत, प्रचाराचे सबळ राजकीय कारण हाताशी बाळगून ते बेताल बरळत राहिले होते, पण या बैठकीत याबाबत कुणीही एका शब्दानेही त्यांना विचारणा केली नाही. खडे बोल सुनावणे तर दूरच! नाही म्हटलं तरी, याची हुरहूर मनाला लागून राहणारच. ज्यांच्या संगतीने दिल्ली-मुंबईत सत्तेचा उपभोग घेतोय्, त्यांच्याच विरोधात रण पेटवण्यात ते कायम धन्यता मानीत राहिले होते. टीकेच्या हीन पातळीचीही त्यांनी कधी तमा बाळगली नाही. तोंडातून बाहेर पडणार्‍या शिवराळ भाषेचा स्तर जसजसा निम्न पातळी गाठू लागला, तसतशा त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. ज्यांना ज्यांना म्हणून लक्ष्य केले, ज्यांच्या ज्यांच्यावर कठोर शब्दांचे वार केले, ज्यांना ज्यांना मातीत गाडण्याची भाषा वापरली ती सारी मंडळी रालोआच्या या बैठकीत मांडीला मांडी लावून सभोवताल बसली होती. साहेबांच्या ‘त्या’ बोलण्याचा, वाट्टेल तसे बरळण्याचा, त्यांनी दिलेल्या शिव्याशापांचा, केलेल्या निराधार आरोपांचा मागमूसही या बैठकीत नव्हता. कटू अनुभव पोटात घेतले गेले होते. ‘असे बोलणे टाळले तर बरे होईल’ हा रामविलास पासवानांचा, सौम्य आणि तेवढ्याच सभ्य भाषेतला वडीलकीचा सल्ला म्हणजे एक अपवाद होता. बाकी, सारे काही विसरून सन्मानाची तीच वागणूक साहेबांना देण्यात आली होती. बहुधा त्याचाच परिणाम असावा… उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी भावासारखे भासू लागले…
खरं तर राजकारणाची अन् वागण्याची तर्‍हा तेव्हाच जराशी नियंत्रणात ठेवली असती, तर मोदी भावासारखे असल्याची बाब अशी जगासमोर तोंडदेखलेपणाने बोलून ‘दाखवण्याची’ गरजच पडली नसती. तीच वस्तुस्थिती राहिली असती. पण सत्तेच्या राजकारणात हे भान जपण्याचा सल्ला द्यायचा कुणी? अन् कुणाला? ज्यांनी साहेबांना योग्य सल्ला देणे अपेक्षित आहे नेमके तेच लोक, वार करण्यासाठी अधिकाधिक धारदार शब्दांचा शोध घेत राहिलेत. लक्ष्य बनविण्यासाठी वेगवेगळ्या चेहर्‍यांची निवड होत गेली. त्यांच्यावर करावयाच्या टीकेची दर्जाहीन पातळी गाठण्यातच त्यांना असुरी आनंद प्राप्त होत राहिला. वास्तवाचे भान विसरून आपल्याच विश्‍वात ते रमले. पण आता पुढची निवडणूक अवघ्या दोन वर्षांच्या टप्प्यात येऊन पोहोचली असल्याची वस्तुस्थिती, मोदींच्या करिश्म्याचे वास्तव, पुढची निवडणूक लढायची अन् ती जिंकायची तर रालोआचा पदर धरून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे धडधडीत सत्य ध्यानात आले आणि मग चेहर्‍यावर उसने हसू आणून बैठकीत उपस्थित राहावे लागले साहेबांना. ज्यांना चारचौघात शिवीगाळ केली, तेच सारे चेहरे समोर बघून अवघडणे स्वाभाविकच होते. मनातली खंत चेहर्‍यावर स्पष्टपणे उमटली नसती तरच नवल! खटकणारे आपले वागणे, आपली आक्षेपार्ह वागणूक… सारे काही विसरून भाजपा नेते शिवसेना नेत्यांना ‘योग्य’ तो सन्मानच देत असल्याचे चित्र कितीही नाही म्हटलं तरी उद्धव साहेबांना मनातून खजील व्हायला भाग पाडणारे होते. पंतप्रधानांसोबतच्या भाऊबंदकीचे त्यांना अवचित झालेले स्मरण, हा त्याचाच परिणाम असावा कदाचित!
सरकार चुकत असेल तर ती चूक नजरेस आणून देण्याचे कर्तव्य बजावण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर इथे कुणाचा आक्षेप नाही. असण्याचे कारणही नाही. प्रसंगी स्वत: सहभागी असलेल्या सरकारवर टीका करण्याची त्यांची भूमिकाही मान्य. पण त्याचाही स्तर जपण्याची काळजी घेतली गेली असती तर परवाच्या बैठकीत आले तसले अवघडलेपण उद्धव साहेबांच्या वाट्याला आले नसते. शेवटी शेतकर्‍यांसाठीची कर्जमाफी काय किंवा अन्य समस्या काय, त्या सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. ठाकरेंची शिवसेना त्याच सरकारचा एक भाग आहे. हे वास्तव विसरून भाजपावर हल्ला करण्याची त्यांची पद्धत कुणालाच भावली नाही. म्हणूनच अनाठायी ठरली. आगामी निवडणुकीची गरज म्हणूनही असेल कदाचित, पण खुद्द साहेबांनाही ती बाब जाणवली आहे. कालची टीका विसरून आज चाललेली सरकारची भलावण हा त्याचाच परिणाम आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे की, तात्पुरती राजकीय डागडुजी, हे स्पष्ट होईलच लवकर… पण अशा या परिस्थितीत भाजपा नेत्यांची वागणूक मात्र जणू सांगतेय् की,
गुनाह करके सजा से डरते है
जहर पिके दवा से डरते है
दुश्मनो के सितम का खौफ नही हमे
हम दोस्तो के खफा होने से डरते है