भारत आणि ‘इंडिया’तले अध्यात्म व विज्ञान!

0
110

अग्रलेख
जगात दोन नावे असलेला भारत हा अपवादात्मक देश आहे. आता भारताला ‘इंडिया’ असे संबोधन ब्रिटिशांनी पाडले. ‘नावात काय असते’ असे वाङ्‌मयीन प्रमाण सांगणार्‍या आणि त्या शेक्सपियरच्या श्रुती जोपासणार्‍या साहेबांनी, भारतात अनेक ठिकाणांची नावे बदलून टाकली. ‘व्हिक्टोरिया टर्मिनल्स’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स’ करता करता भरपूर घाम गाळावा लागला. काही ठिकाणी या नामबदलासाठी रक्तही सांडवावे लागले. आता ‘इंडिया’ नामाभिधानाचे गुलामीचे लांच्छन दूर करायचे म्हटले, तर त्यात बराच सव्यापसव्यय करावा लागणार आहे. आता ‘इंडिया’ हेच संबोधन उपयोगात आणावे, असा काही कायदा नाही. मात्र, भारतीय भाषा नसली की हमखास ‘इंडिया’ या नावाचा उल्लेख केला जातो. स्वामिनाथन् आणि नंतर शरद जोशी यांनी या दोन नावांचा वापर वर्गभेद विदित करण्यासाठी अत्यंत चपखलपणे करून घेतला. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ हा फरक तसा वैश्‍विक आहे, पण तो दाखविण्यासाठी भारत आणि ‘इंडिया’चा शाब्दिक ऊहापोह भारतात करण्यात आला. तो भावलाही. नेमकेपणाने काय सांगायचे, हे त्यातून ऐकणार्‍यांना कळले. त्या त्या वेळी अभावग्रस्त आणि समृद्धातील दरी दाखविण्यासाठी हा श्‍लेषार्थ साधण्यात आला. याचा अर्थ आता ‘इंडिया’चा स्वीकार आम्ही अभिजातपणे केला आहे, असा होत नाही. मात्र, परवा पंतप्रधानांच्या नागपूर दौर्‍याचे निमित्त करून राज्यसभा सदस्य, झी वाहिनीचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांनी ट्वीट केले. ‘इंडिया’चे विज्ञान आणि भारताचे अध्यात्म यांची सांगड घातली, तर हा जो काय देश आहे त्याची प्रगती वेगाने होऊ शकते, असा एकूण त्यांच्या या टिवटिवाचा रोख आहे. पंतप्रधानांनी जारी केलेल्या ‘न्यू इंडिया व्हिजन डॉक्युमेंट’वरची त्यांची ही प्रतिक्रिया आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने हा विकासदृष्टीचा पथ दाखविणारा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या संदर्भात डॉ. चंद्रा यांनी पंतप्रधानांच्या नागपूर दौर्‍याचे निमित्त साधून ही ‘टि’्वपणी केलेली आहे. चंद्रा यांच्या वक्तव्यातला ‘इंडिया’ हा विज्ञानवादी, प्रगत, तंत्रसमृद्ध, संकल्पनासमृद्ध असाच आहे आणि भारत हा केवळ आध्यात्मिक अंश आहे. यापलीकडे दुसरा अर्थ काढता येत नाही. म्हणजे वर्तमानात भारत म्हणून जे काय उरते ते केवळ आध्यात्मिक असे काही आहे.
या संदर्भात फार आधीपासून चर्चा होत राहिली आहे. आधुनिक बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या दृष्टिकोनातून भारत हा अत्यंत मागासलेला देश आहे. त्यांच्यादृष्टीने वेद आणि वेदपूर्वकाळात भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत असण्याचा तर दूरवर संबंध नव्हता. या बाबी नव्हत्याच. मध्यंतरी काशी विश्‍वविद्यालयातून भारतात समुद्रशास्त्र, उड्‌डयणशास्त्र, गणित, शल्यक्रिया, उपचार याबाबत कसे प्रयोग होत होते आणि त्याचा शोध लावला गेला, या संदर्भात एक शोधप्रबंध सादर करण्यात आला. त्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. आजच्या कथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी त्याचा उपहास केला. भारतात हे सारे होते तर मग आता का नाही? पृथ्वीत गुरुत्वाकर्षण शक्ती असते, हे सांगायला आम्हाला न्यूटनची का वाट बघावी लागली? गणितात शून्याचा शोध लावण्याच्या बाता मारणार्‍यांना आर्किमिडिजचे तत्त्व समजून घ्यायला आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यासाठी इतका वेळ का लागला? मुळात भारतीय शैक्षणिक पद्धतीची नीट मांडणी आणि विकास करण्यासाठी मेकॉलेची गरज का भासली, असे प्रश्‍न विचारण्यात आले. अगदी तर्काच्या पातळीवर हे प्रश्‍न योग्यच वाटतात. वर्तमानाचा विचार केला किंवा गेल्या ३००-४०० वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला, तर भारत कुठे होता? असा विचार केला तर बुद्धिवाद्यांचे आक्षेप खरे वाटू लागतात. मात्र काळ, काम आणि वेगाच्या त्रयराशिकात विकास, प्रगतीची शून्य ते परत शून्य अशी उसळी होत असते. कुठल्याही देशाच्या, संस्कृतीच्या बाबतदेखील हे होतच असते. ते टाळता येत नाही. भारतीय वेद हे आपौरुषेय आहेत, असे म्हणतात. याचा अर्थ ते माणसांनी लिहिलेले नाहीत, असा होत नाही. उलट, ते इतके ज्ञाननिष्ठ आहेत आणि त्यातही खुलेपणा आहे की, आधीची समीकरणे खोडून त्यात नवी भर घालण्याची मुभा नंतरच्या काळातील ऋषींना म्हणजेच अभ्यासकांना होती. त्यामुळे वेदांमध्ये भर पडत गेली. ऋषी म्हणजे अध्यात्माच्या वाटेवरचे प्रवासी होते, हा गैरसमज आहे. ते शाश्‍वत जीवनपद्धतीचा अंगीकार केलेले संशोधक होते. ‘आश्रम’ हा शब्द नाही, ती एक ज्ञाननिष्ठ संकल्पना आहे. भारतात ऋषींनी लावलेले सारेच शोध हे सर्वसामान्यांच्या भाषेतले नव्हते, हा आक्षेपाचा भाग असू शकतो. सर्वसामान्यांना ज्ञानार्जनाचा हक्कच नव्हता, तो देण्यातच आला नव्हता, म्हणून सारेच ज्ञान हे देवभाषेत (संस्कृतात) होते, असा आक्षेप घेतला जातो. मुळात ज्ञानींची भाषा ही सर्वसामान्यांना कळत नाही. आजही ते तसेच आहे. ज्ञानीच्या शोधाचा उपयोग सामान्यांचे जगणे सुकर करण्यासाठी करण्याचा विवेक काय तो ज्ञानींमध्ये असायला हवा आणि तो त्या काळात नव्हता, असे म्हणता येत नाही. तसे असते तर भारतीय जीवनप्रवाह ‘भारतीय संस्कृती’ म्हणून विकसितच झाला नसता.
विल ड्यूरंड हा अठराव्या शतकातला इतिहाससंशोधकदेखील, भारत वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असा प्रदेश आहे, असे म्हणतो. त्यामागे त्याचा काही वेगळा उद्देश असण्याचे कारण नाही. इतके मात्र नक्की की, भारतीय विज्ञान आणि ज्ञानशाखांतील प्रगतीच्या पाऊलखुणा इतिहास आणि संस्कृतीत विखुरल्या आहेत. ‘अमावास्येच्या दिसी बिंबा-बिंब भेटी येती’ असे ज्ञानेश्‍वर म्हणतात. अमावास्या कशी होते, हेच त्यातून सांगितले गेलेले असते. असे असंख्य दाखले देता येतील. भारतात विज्ञान आणि अध्यात्म हे कधीच वेगळे नव्हते. अध्यात्माचा संबंध देव, धर्म यांच्याशी कधीही नव्हता. अलौकिक शक्तीचा शोध घेत ती आत्मसात करण्याचे विज्ञान भारतात हजारो वर्षे नांदत आले आहे. वर्ग, जात, पंथ, वर्ण, धर्म अशी विभागणी भारतावर गुलामी लादणार्‍यांनी त्यांचे शासन सुकर व्हावे यासाठी कुटनीती म्हणून केली. हिंदू हा त्या काळात धर्म झाला. वास्तविक, ती अध्यात्म-विज्ञाननिष्ठ अशी संस्कृतीच होती. भारतीय ज्ञान स्थानिकांनाच परके वाटावे, अशी विभागणी भारतीयांमध्ये करण्यात आली. धर्मांध शासकांनी भारतीय जीवनपद्धतीत धर्माचे विष पेरले. भारतीयांचे ध्रुवीकरण साधले. त्या काळात भारतीय विज्ञान हे ‘हिंदुशास्त्र’ आहे म्हणून त्याच्याकडे हेत्वारोपाने पाहिले गेले. पुढे विज्ञाननिष्ठ असणे, बुद्धिवादी असण्याचे निकष हेच की, भारतीय जीवनपद्धतीला प्रच्छन्न नकार देणे, हा शिष्टाचार झाला. भारतीय संस्कृतीने चार्वाकासारख्या नास्तिकाचे ऋषिपदही मान्य केले. त्यालाही विज्ञाननिष्ठ अध्यात्माचे अधिष्ठान दिले. इतकी वर्षे चार्वाक टिकून आहे त्यामागचे कारण हा स्वीकारच आहे. तरीही आता भारताचे अध्यात्म आणि ‘इंडिया’चे विज्ञान अशी चतुर विभागणी आजचे ‘इंटलेक्च्युअल’ करू लागले असतील आणि तेही भारताचे पंतप्रधान दीक्षाभूमीला भेट देण्याच्या पृष्ठभूमीवर हे करण्यात येत असेल, तर त्यामागील कारण तपासून पाहिले पाहिजे. त्या काळात भारत आणि ‘इंडिया’ची अशी जोडणी करावी, अशी सूचना माध्यमसम्राटांना करावी वाटते. ‘इंडिया’चे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करण्याचा हा प्रकार आहे. ‘इंडिया’ संपवून इंग्रजांच्या आधीचा भारत सिद्ध करणे, हेच २०२२ चे उद्दिष्ट असायला हवे…!