कळपाची सुरक्षा लांडग्यांच्या हाती…!

0
106

अग्रलेख

••हिंसक, हुकूमशाही विचारांमध्ये रंगलेले हे लोक आता लोकशाही, दलित, गरिबांच्या भल्यासाठी संघर्ष करण्यासाठी जनतेला आवाहन करीत आहेत. अशांना साथ देणे म्हणजे मेंढ्यांच्या कळपाची सुरक्षा लांडग्यांच्या हाती देण्यासारखेच आहे!
••
हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष सत्तेत आले की, अनेकांना काही साक्षात्कार होत असतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सलग पंधरा वर्षे सरकार असताना, हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या; मात्र देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येताच नाना पाटेकरादी नटांना लगेचच आत्महत्या दिसू लागल्या. केंद्रात आणि देशातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपाचे सरकार येताच, काही मंडळींना या देशातील गरिबांची, दलितांची एकदमच काळजी वाटू लागली आहे. देश विभाजित होण्याची भीती छळू लागली. लोकशाही, समता व न्याय धोक्यात आल्याचे वाटू लागले. या मंडळींमध्ये दलित समाजातील पिसे झडलेले काही पक्षिराज आहेत, तसेच कम्युनिस्ट विचारसरणीचे झेंडाधारीदेखील आहेत. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली असल्यामुळे या मंडळींपैकी प्रत्येक जण आवर्जून नागपूरला येतो आणि गरळ ओकून जातो. झील धरायला नागपुरातील काही टोणगे तयारच असतात! नुकताच, अफजल गुरूच्या फाशीमुळे व्यथित झालेला कन्हैयाकुमार नागपुरात येऊन गेला. नुकतीच मिसरूड फुटलेल्या कन्हैयाकुमारच्या कथित संघर्षाची कथा असलेल्या ‘बिहार ते तिहार’ या पुस्तकाच्या नागपुरातील प्रकाशनासाठी शहरातील ढुढ्ढाचार्य उपस्थित होते. त्यानिमित्त या लोकांनी भारताचे संविधान, लोकशाही, समता, न्याय, सामाजिक एकता याबाबत जे सुस्कारे सोडले, त्याला ‘एक सवंग बौद्धिक करमणूक’ यापरते कुठलेच मूल्य नाही, हे लक्षात येईल. ही जी सर्व मंडळी आहे, त्यांच्यालेखी दलित, शोषित, पीडित, गरीब जनता फार महत्त्वाची आहे. या लोकांवरच त्यांचे पोट आहे, अस्तित्वही आहे. त्यामुळे या देशात दलित, शोषित, पीडित, गरीब जनता मोठ्या प्रमाणात असणे, त्यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. या समाजाच्या लोकांसाठी संघर्ष करीत असल्याचे दाखवून, या मंडळींच्या पिढ्यांनी सुखेनैव संसार केला आणि करीत आहेत. एवंगुणविशिष्ट समाज या मंडळींच्या तोंडातला घास आहे. तो घास हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारांमुळे हिसकला जात आहे. त्यामुळेच ही सर्व मंडळी संतापली आहेत. शेवटी प्रश्‍न पापी पोटाचा आहे ना! भाजपाच्या ठिकठिकाणच्या सरकारांनी दलितांचे दलितपण, गरिबांची गरिबी नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. त्यात त्यांना यशही मिळत आहे आणि त्यामुळे या समाजाचा कधी नव्हे इतका पाठिंबाही मिळत आहे. याचे खरे तर सर्वांनीच स्वागत करायला हवे. गरिबीविरुद्धच्या लढाईत सर्वांनी सक्रिय व्हायला हवे. पण, तसे होणारही नाही. कारण मुळात यांना दलित वा गरिबांचे प्रश्‍न सोडवायचेच नाहीत. त्यांना त्यांच्या क्रांतीसाठी इंधन म्हणून दलित व गरीब हवे आहेत. रशियातील बोल्शेव्हिक क्रांतीचा जनक लेनिन यांना एकाने विचारले होते की, तुम्ही समाजातील शेतकरी व कामगार यांनाच हाताशी का धरले? त्यावर लेनिन म्हणाले होते की, त्या काळी चटकन पेट घेणारे हेच इंधन उपलब्ध होते! हीच धारणा भारतातल्या या मंडळींची आहे. गरिबांची गरिबी नष्ट करणे, त्यांना न्याय देणे, समाजात समता प्रस्थापित करणे हेच जर यांचे ध्येय असते, तर बंगालमध्ये सलग २५ वर्षे सत्ता भोगताना त्यांना हे साध्य का झाले नाही? २५ वर्षे कम्युनिस्ट विचारसरणीच्या वरवंट्याखाली बंगाली जनता भरडून निघत राहिली. शेवटी कंटाळून त्यांना, ममता बॅनर्जीसारख्या उथळ नेत्याच्या हाती सत्ता सोपवावी लागली. मग आता ही मंडळी कसला संघर्ष करीत आहेत? मोदींचे सरकार आल्यामुळे या समाजात विघटन होत आहे. हुकूमशाहीचे आगमन होत आहे. धर्मांधतेचे वातावरण निर्माण होत आहे, असे विचार, कथित प्रतिगामी समाजाच्या आदरातिथ्याचा, सन्मानाचा पुरपूर उपभोग घेेणारे निळे कवी यशवंत मनोहर यांनी यावेळी मांडले. या कवीने आयुष्यभर विषारी फूत्कारच सोडले आहेत. आता आयुष्याच्या उत्तरकाळात, आपल्या फूत्कारांनी किती सामाजिक परिवर्तन झाले, याचा ताळेबंद त्यांनी मांडायला हवा. इतका द्वेषी मनुष्य कवी कसा काय असू शकतो, असा अनेकांना प्रश्‍न पडला आहे. उर्वरित समाजाची सतत भीती दाखवीत दलित समाजाला सतत भ्रमित ठेवण्याचेच एकमेव पुण्यकर्म असलेच तर यांच्या खाती असावे. पण, आता या समाजाला वस्तुस्थिती लक्षात आली आहे आणि या समाजाने या असल्या नेत्यांच्या मागे जाण्याचे नाकारले आहे. आपले खाद्यच आपल्यापासून दुरावले गेल्याची वेदना, मनोहरांच्या आचार-विचारांतून सतत प्रकट होत असते. लोकांनी काय करावे, नेत्यांनी काय करावे, हेच फक्त ते सांगत सुटतात. आता ते शरद पवारांवर घसरले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार व लालू यादव यांनी संभाव्य संकटाचा (म्हणजे भाजपाचा) चेहरा वाचला आणि या दोघांना क्रांतीची निकड भासू लागली व ते दोघे एकत्र आलेत. म्हणून भाजपाचा पराभव झाला. या घटनेचे मनोहरांना फारच समाधान आहे. तसले काही महाराष्ट्रात करण्याचे शरद पवारांना का सुचत नाही, असा त्यांचा तळमळीचा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांनी देऊन टाकले. ते म्हणाले, कदाचित परंपरेने दिलेले जातीय अहंकार त्यांच्या आडवे येत असतील. अचाट श्रीमंती आणि दीर्घकाळ सत्ता त्यांनी भोगली आहे. आता देशातील पीडित, वंचितांना पुढे करा आणि तुम्ही (म्हणजे पवारांनी) किंगमेकर व्हा, असा सल्ला दिला आहे. पण, आतापर्यंत पवारसारख्यांनी असे करूनच तर एवढी अचाट श्रीमंती व दीर्घकाळ सत्ता भोगली आहे! शरद पवारांमध्ये परंपरेने दिलेले जातीय अहंकार पुरेपूर भिनले आहेत, तर मग मनोहरांना अभिप्रेत क्रांतीचे नेतृत्व करण्याची विनंती पवारांना का म्हणून? आज नितीशकुमार लालू यादवांसोबत आहेत म्हणून त्यांचे गुणगान सुरू आहे. परंतु, भविष्यात नितीशकुमार लालूंची साथ सोडून भाजपाच्या सहकार्याने सत्ता सांभाळू लागले, तर मग मनोहरांची काय प्रतिक्रिया असेल? मुळातच, या लोकांची वैचारिक आधारभूमी इतकी ठिसूळ व भुसभुशीत आहे की, त्यावर उभारलेली कुठलीही इमारत कोसळणारच. त्यासाठी दुसर्‍या कुणाला दोष देण्याची गरज नाही. आपल्या विचारसरणीशिवाय दुसरी विचारसरणी सत्तेवर आली की, लगेचच देशात अराजकता निर्माण झाली, संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही आली नाही, देश विभाजित होत आहे, लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत, मानवाधिकारांचे हनन होत आहे, असे समजणे व ठिकठिकाणी आरोळ्या ठोकणे, हीच मुळात हुकूमशाही वृत्ती आहे. केरळात कम्युनिस्टांना तर दुसर्‍या विचाराचा मनुष्य जिवंत असलेलाही चालत नाही. २५ वर्षांच्या राजवटीत कम्युनिस्ट पक्षाने बंगालमध्ये ५० हजार कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. जगात जिथे जिथे कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले त्यांनी केवळ हत्या नाहीत, तर नरसंहार केले आहेत. अशा हिंसक, हुकूमशाही विचारांमध्ये रंगलेले हे लोक आता लोकशाही, दलित, गरिबांच्या भल्यासाठी संघर्ष करण्यासाठी जनतेला आवाहन करीत आहेत. अशांना साथ देणे म्हणजे मेंढ्यांच्या कळपाची सुरक्षा लांडग्यांच्या हाती देण्यासारखेच आहे!, हे लोकांच्या लक्षात येऊन चुकले आहे. पप