आता काय राणेंच्या भरवशावर वाढणार आहे भाजपा?

0
246

चौफेर

‘असू अम्ही सुखाने पत्थर पायातील’ म्हणत कायम संघर्षरत राहिलेल्या, घरादारांवर तुळशीपत्र ठेवून, उपहासाचे वार अंगावर झेलून, उपेक्षा सहन करून त्यांनी खस्ता खाल्ल्या, त्याच्या परिणामस्वरूप सध्याचे पालटलेले दिवस बघायला मिळताहेत.
••
पुण्यातल्या एका जाहीर भाषणात शरद पवारांनी सांगितलेला हा प्रसंग… त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी पेरलेली बीजे अद्याप पुरती अंकुरलीही नव्हती. बारामतीत पवारांचा दरारा आजच्या एवढाच तेव्हाही कायम होता. वरपासून खालपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत, पवारांचा पराभव ही तर जणू कल्पनातीत बाब होती! इंदिराहत्येच्या पार्श्‍वभूमीवर देशभर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेतही पवार तरले, ही त्याचीच साक्ष! शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध अवाक्षरही मान्य नसलेल्या बारामतीकरांच्या दुनियेत, पराभव नजरेसमोर दिसत असतानाही निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध उमेदवारी सादर करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यावेळच्या प्रघातानुसार जनसंघ वा भाजपा उमेदवाराच्या प्रचाराची जोड असलेल्या मतदारांच्या नावाच्या चिठ्‌ठ्या घरोघरी नेऊन देणारे कार्यकर्ते टीकेचा विषय ठरायचे. तरीही, वाट्याला येणारा उपहास दुर्लक्षून इमानेइतबारे काम चालायचे त्यांचे. ही चिठ्ठी खुद्द पवारांच्या घरीही नेऊन दिली जायची. पवार म्हणाले, ‘‘विचारसरणीचा विरोध असला, तरी या कार्यकर्त्यांची चिकाटी कौतुकास्पदच!’’ खरेच आहे. मक्तेदारी असल्यागत ज्यांनी बारामतीत अविरत निवडणुकी जिंकल्या त्या पवारांच्या घरी, दिवा किंवा कमळाचे चित्र असलेली चिठ्ठी नेऊन देण्याची हिंमत करणार्‍या कार्यकर्त्यांना दाद तर दिलीच पाहिजे… केव्हा ते ठाऊक नाही, पण भविष्यात एक दिवस आम्ही नक्की विजयी होऊ, हा दुर्दम्य विश्‍वासच मनाला उभारी देत असावा त्यांच्या… त्या विश्‍वासातूनच पवारांच्या दारात उभे राहण्याची हिंमत आपसूकच एकवटली जात असावी कदाचित!
भारतीय जनसंघाच्या किंवा नंतरच्या भारतीय जनता पक्षाच्या आजच्या ताकदीचे, विस्तारलेल्या त्याच्या कार्य-स्वरूपाचे गमक, ‘त्या’ कार्यकर्त्यांनी त्या वेळी रचलेल्या भक्कम पायव्यात आहे. ‘असू अम्ही सुखाने पत्थर पायातील’ म्हणत कायम संघर्षरत राहिलेल्या, घरादारांवर तुळशीपत्र ठेवून, उपहासाचे वार अंगावर झेलून, उपेक्षा सहन करून त्यांनी खस्ता खाल्ल्या, त्याच्या परिणामस्वरूप सध्याचे पालटलेले दिवस बघायला मिळताहेत. इतकेच कशाला, अगदी आज सत्तेत असलेल्या भाजपा नेत्यांपैकी कित्येकांनी सुरुवातीच्या निवडणुकीतले पराभव अनुभवले आहेत. पचवले आहेत. लोकांच्या मनावर राज्य करणार्‍या कॉंग्रेसच्या, नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत प्रवाहाविरुद्ध खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे, निवडणूक लढणे आणि ती जिंकणे किती जिकिरीचे आहे, हे त्यांनाच ठाऊक! आज बदललेली परिस्थिती, प्रतिकूलतेतून अनुकूलतेत झालेले परिवर्तन हा, त्या शेकडो कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदान, साधना, तपश्‍चर्येचा परिणाम आहे. अटलजींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, रा. स्व. संघ परिवारातील हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू, त्यांनी वर्षानुवर्षे बघितलेल्या स्वप्नपूर्तीचा क्षण प्रत्यक्षात साकारल्याची साक्ष देणारे होते…
या सार्‍या बाबी आज अचानक आठवायला, नारायण राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशाची चर्चा कारणीभूत ठरली आहे. राणेच कशाला, कालपर्यंत पैलतीरावर बसून संघ-भाजपा कार्यकर्त्यांची खिल्ली उडविणार्‍या, त्यांच्या संघर्षाची टर उडविणार्‍या, यांना ठेच लागली की आनंदाने टाळ्या पिटणार्‍यांपैकी, ज्याला ज्याला म्हणून आज सत्तेत असलेल्या भाजपाच्या तंबूत ठाव मांडण्याची प्रबळ इच्छा होऊ लागली आहे, ती सारी मंडळी संघर्षाच्या त्या कहाणीवर साचलेली धूळ झटकायला कारणीभूत ठरते आहे. या परिवारातले कित्येक कार्यकर्ते असे आहेत, ज्यांनी कधीच निवडणूक लढविण्याची मनीषा बाळगली नाही. भविष्यात कधीतरी सत्तेची पदं पदरी पडतील म्हणून काम केले नाही. पण, म्हणून आता सत्तेच्या काळात ती मंडळी डावललीच गेली पाहिजे असं कुठे आहे? या उलट भाजपाबाहेरची, विशेषत: कॉंग्रेस-राष्ट्रवादीतली माणसं मात्र कायम सत्तेच्या हव्यासात रत राहिली आहेत. लाभ ठाऊक असल्याने सत्तेभोवती फिरत राहण्यातच त्यांना स्वारस्य असते. त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला असल्याची आणि आता कित्येक वर्षे तो पुन्हा सत्तेत येण्याची सुतराम शक्यता राहिली नसल्याची वस्तुस्थिती ध्यानात येताच यू-टर्न घेत त्यांच्या भूमिका बदलताहेत. कधीकाळी आपणच भाजपावर जातीयवादाचा आरोप केला होता, याचाही त्यांना आता सोयिस्कर विसर पडतो आहे. कुणाच्याही साह्याने का असेना, पण सत्तेच्या दालनात विराजमान होण्याची कुटनीती त्यांच्या डोक्यात शिजते आहे. अन्यथा, या सर्वांनाच आता भाजपाची कास धरावीशी वाटणे हा चमत्कारच नाही का? यात दुर्दैव एवढेच की, या सर्वांसाठीच भाजपाची दारे अलीकडे अगदी विनासायास खुली होताहेत. या आयारामांच्या साह्याने सत्ता काबीज करणे काहीसे सोपे होईल, असा कयास बांधून असेल कदाचित! पण, तरीही त्याचे समर्थन कसे करायचे?
सत्तेत राहण्याची सवय जडलेल्या नारायण राणेंना आता राज्यात कॉंग्रेस सत्तेत येणार नसल्याची खात्री पटल्यावर, भाजपात प्रवेश करण्याची गरज वाटणे यात नवल ते नाहीच! पण, कोकणात पक्षाचा कार्यविस्तार करण्यासाठी राणेंची गरज भाजपातल्या कुणाला भासणे मात्र पुरते नवलाईचे आहे!
कोकणात राणेंचा निर्विवाद दरारा आहे. ते सेनेत असले काय किंवा कॉंग्रेसमध्ये असले काय, अगदी उद्या ते भाजपात आले, तरी ही परिस्थिती बदलत नाही. वर्षानुवर्षांचे कार्य, जनसंपर्क आणि मुजोरीतून पदरी पडलेले ते यश आहेे. पण, ते यश त्यांचे व्यक्तिगत आहे. सत्ता आणि पैशातून आलेल्या गुर्मीचा दर्पही त्या यशाला लाभला आहे. विरोधकांना चिरडून टाकण्याच्या त्यांच्या शैलीचे बळी ठरलेल्यांमध्ये कणकवली, कुडाळ परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही. राणेंशी दोन हात करतच त्या कार्यकर्त्यांनी स्वत:चे आणि पक्षाचेही या परिसरातले अस्तित्व आजवर कायम राखले आहे. त्या कार्यकर्त्यांनी काय आता राणेंना डोक्यावर घेऊन नाचायचे? ज्यांच्याशी संघर्ष करून जिद्दीने उभा केला, टिकवला, वाढवला, तो पक्ष त्या राणेंच्याच चरणी अर्पण करायचा? यांचीच खिल्ली उडवत, धमक्या देत, प्रसंगी मारहाण करत कधी सेना, तर कधी कॉंग्रेस वाढवली, ते राणे कायम लाल दिव्याच्या गाडीतूनच फिरणार? तिथे असले तरीही आणि इथे असले तरीही? त्यांनी त्यांच्या सोयीने पक्ष बदलत राहायचा आणि बाकीच्यांनी काय फक्त तळी उचलून धरायची त्यांची?
त्यांचे सोडा. त्यांना फक्त सत्तेसाठी राजकारण करायचे आहे. आता भाजपात येतानाही त्यांना स्वत:सोबतच आपल्या मुलाचे राजकीय भविष्यही सुरक्षित करून घ्यायचे आहे. त्याचसाठी धडपड चालली आहे त्यांची. पण, भाजपा कार्यकर्त्यांचं काय? पक्ष टिकवण्यासाठी त्यांच्याशी कायम वैरत्व पत्करलेल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? कालपर्यंत ज्यांनी वार्‍यालाही उभं केलं नाही, त्या राणेंचाच जयजयकार करायचा? कार्यविस्ताराची ही कुठली तर्‍हा झाली? नाही झाला कोकणात वेगाने भाजपाचा विस्तार तर काय आकाश कोसळणार आहे? अशी कुणाच्या येण्याने वाढणारी अन् जाण्याने ओसरणारी ताकद काय कामाची?
काही वर्षांपूर्वी लोकसभेत भाजपाचे केवळ दोन सदस्य असताना, पक्षशिस्त राखण्यासाठी त्यांनाही निलंबित करण्याचा तो प्रसंग अजूनही आवर्जून सांगितला जातो. भल्या मोठ्या संसदेतील मोजक्या दोन सदस्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व आणि मोल तत्कालीन नेत्यांना ठाऊक नसेल, असे थोडीच आहे? तरीही त्या सदस्यांच्या निलंबनाचा कठोर निर्णय त्या वेळी घेण्यात आला होता. वेळ पाहून, स्वार्थ साधण्यासाठी भाजपाच्या दिशेने वळू पाहणारी राणेंसारख्या नेत्यांची गर्दी थोपवून धरण्याची भूमिका जराशी कठीण, कदाचित अव्यवहार्यही वाटेल, पण प्रगतिपथावरील भाजपाच्या वाटचालीत तीच महत्त्वाची आणि काळाची गरजही आहे…
 सुनील कुहीकर,९८८१७१७८३३