प्रायव्हेट लिमिटेड पक्ष भाजपापुढे भुईसपाट

0
169

प्रासंगिक

नमोचा नोटबंदीचा निर्णय गरीब आणि मध्यमवर्गाला भावला आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा रॉबिन हुडसारखी तयार झाली. नमोच्या या सुप्त लाटेत कॉंग्रेस, स. पा. आणि बहुजन समाज यासारखे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष भुईसपाट झाले आणि भाजपासारखा (पब्लिक लिमिटेड कंपनी) हिंदी भाषिक प्रदेशात (बिहार सोडून) सत्तेवर आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींचे नेतृत्व जवळ जवळ झिरो ठरले आहे. पंजाबमध्ये जो काही कॉंग्रेसचा विजय झाला आहे, त्याचे श्रेय कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जाते आणि कॉंग्रेसच्या इतिहासात प्रथमच ‘दिल्ली हाय-कमांडने’ अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीला उघड संमती दिली होती. १२५ वर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रीय पक्षाची ही स्थिती का झाली, याचा विचार एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने केला पाहिजे. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी तुल्यबळ विरोधी पक्षाची नितांत गरज आहे.
खरं तर कॉंग्रेस पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचे सर्व समभाग (शेअर) एकाच कुटुंबाच्या हाती आहेत. निवडणुकीत अपयश आल्यास कुणालाच जबाबदार धरता येत नाही. नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठविल्यास त्याला रस्ता दाखविण्यात येतो. २००१ पासून कॉंग्रेस ही एखाद्या कंपनीसारखीच वागत आहे. आपला व्यवसाय चालविण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थशास्त्रज्ञ पुढे करून २००४ ते २०१४ पर्यंत राजकारण केलं, परंतु ते सर्व करत असताना आपल्या संपत्तीत कशी वाढ होईल याकडेच लक्ष दिलं आणि अजूनही भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येतच आहेत.
डॉ. मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम् यांच्या कार्यक्षमतेबाबत वाद नाही, परंतु ते खर्‍या अर्थाने लीडर किंवा नेते नाहीत. ते एखाद्या कंपनीच्या प्रशासकासारखे आहेत. त्यांना आपल्या कामाचा अहवाल जनतेला द्यावा लागत नाही. ते आपल्या कामाचा अहवाल कॉंग्रेस पक्षाच्या गांधी कुटुंबाला देतात. तीच परिस्थिती समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची आहे. आजच्या तारखेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपा पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा पक्ष आहेत. कम्युनिस्ट पक्षाची दाणादाण झाल्यामुळे या ठिकाणी भाजपाचा विचार करावा लागेल.
कर्तृत्ववान तरुणाई : सपाचे मुलायमसिंह यादव, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, लालूप्रसाद, शरद पवार, डॉ. फारुक अब्दुलासह हे सर्व राजकारणाच्या कौटुंबीकरणात गुंतलेले आणि अडकलेले आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे तरुणाईच्या आशा-आकांक्षा वाढलेल्या आहेत. राजकारण सोडून इतर क्षेत्रात ही तरुणाई स्वकर्तृत्वावर इतर क्षेत्रात पुढे येत आहे, परंतु राजकारणावर जाण्याचा मार्ग राजकारणाच्या कौटुंबिक कारणांमुळे जवळजवळ खुंटला आहे.
आजच्या तरुणाईला राजकारणासाठी भाजपा जवळचा वाटतो. कारण त्या नेत्यांची राजकीय पिलावळ निर्माण झालेली नाही. ती नगण्य आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर मोदी घराण्यातील दुसरा व्यक्ती दिसत नाही, परंतु कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सपा या पक्षांत भविष्यातील नेता कोण हे सरळसरळ दिसत आहे आणि यामुळेच हिंदू समाज कौटुंबिक पक्षापासून दूर पळ काढत आहे. पी. चिदंबरम् यांचे चिरंजीव कार्तिक चिदंबरम् यांनीच कॉंग्रेस पक्षाची गणना कौटुंबिक पक्ष म्हणून केली आहे. यदाकदाचित नरेंद्र मोदी कॉंग्रेस पक्षात असते, तर ते पंतप्रधान झाले असते काय? या प्रश्‍नाचे उत्तर नाही असेच मिळाले असते. कॉंग्रेस पक्षातही बुद्धिवान आणि कर्तृत्ववान लोक आहेत, परंतु त्यांनी आपली बुद्धिमत्ता दाखविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे राजकीय पंख छाटण्याचे काम केले जाते. त्यातूनच शरद पवार आणि ममता बॅनर्जींसारखे नेते बाहेर पडतात आणि आपापल्या सोयीनं राजकीय पक्षाची स्थापना करतात आणि कॉंग्रेसची संस्कृती रक्तात भिनल्याने कौटुंबिक राजकारण पुढे नेतात.
यशस्वी राजकीय बापाचे वंशज म्हणून एखाद्या मुलाची किंवा मुलीची चांगली राजकीय सुरुवात होऊ शकेल, परंतु पुढील राजकीय जीवनात ते यशस्वी होतीलच याची काही शाश्‍वती नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी आणि अखिलेश यादव. बापाच्या राजकीय पुण्याईमुळे २०१२ मध्ये अखिलेश मुख्यमंत्री झाले, पण कौटुंबिक कलहामुळे वडिलांचे राजकीय छत्र कमी होताच २०१७ च्या निवडणुकीत अखिलेश यांना अपयशाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय स्तरावर राजकीय स्पर्धेत राहुल गांधी साफ नापास झाले, तर नरेंद्र मोदी १०० टक्के गुण घेऊन पास झाले. राज्यस्तरावर अजित पवार यांचा पराभव मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
‘कर्तृत्व दाखवा नाही तर घरी बसा’ हा नवीन राजकीय फंडा २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. मतदारांना भपकेबाजी नको, काम दाखवा अन् मते घ्या. खरा कोण, खोटा कोण याची जाणीव मतदारांना चांगलीच आहे.
कॅडरबेस पार्टी : राष्ट्रीय स्तरावरील कौटुंबिक (प्रायव्हेट) कॉंग्रेस पक्ष आणि भाजपा (पब्लिक) यामध्ये गुणात्मक फरक आहे. भाजपा हा कॅडर-बेस पक्ष आहे, तर कॉंग्रेस हा कॅडर बेस पक्ष नाही. कॉंग्रेसचे सेवादल कार्यकर्ते फक्त नेता आल्यानंतर सलामी ठोकण्यासाठी असतात.
भाजपाचे बहुतेक कार्यकर्ते हे हिंदुत्ववादी आहेत. त्यांचा विचार कुणाला पटो न पटो, परंतु ते आपल्या विचारांशी प्रामाणिक आहेत. ते शिस्तब्ध आहेत. आरएसएसच्या विविध संघटना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या काळात नानाविध कार्यक्रम जनतेत जाऊन करत असतात. नेतेमंडळी असलीच पाहिजे असे नाही, परंतु कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती आवश्यक असते. अ.भा.वि.प. व विश्‍व हिंदू परिषदेचे कार्य बुद्धीला पटणारे नसेल, परंतु आवश्यक तेवढी जनता एकत्रित करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
देशात कॉंग्रेस कार्यकर्ता नावाची वस्तू शिल्लकच राहिलेली नाही. काही मोजके कार्यकर्ते सोडल्यास कॉंग्रेस कार्यकर्ते आता आपापल्या सोयीनं मतदान करतात, परंतु भाजपा आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आपल्या उमेदवारालाच मतदान करतात. पंजाबमध्ये जो कॉंग्रेसचा विजय झाला आहे, तो काही कॉंग्रेस विचारांचा विजय नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा विजय आहे. आजच्या तारखेत कॉंग्रेस ही विचारहीन कौटुंबिक संस्था म्हणून किंवा कंपनी झालेली आहे. एका कुटुंबाचा विचार म्हणजे देशाचा विचार होऊ शकत नाही.
भाजपाजवळ विचारांची परिपक्वता असल्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा व इतर नेतेमंडळी जोराने कामाला लागली आणि विजयश्री खेचून आणली. कॉंग्रेसकडून फक्त राहुल गांधीच मैदानात होते आणि शेवटच्या क्षणी शीला दीक्षित आणि राज बब्बर दिसेनासे झाले. भाजपात नेतृत्वाची दुसरी आणि तिसरी फळी तयार आहे, परंतु कॉंग्रेसमध्ये कौटुंबिक नेतृत्वाशिवाय इतर नेतृत्व तयार नाही, ही खरी लोकशाहीची शोकांतिका आहे. भाजपाला राष्ट्रीय स्तरावर आव्हान देणारा एकही नेता विरोधी पक्षात नाही ही वस्तुस्थिती आहे. आजच्या तारखेत कॉंग्रेस पक्षाजवळून दलित आणि मुस्लिम समाज दूर गेलेला आहे. भाजपाने शमशान आणि स्मशान या शब्दांचा वापर केल्यामुळे हिंदू समाज भाजपाकडे आकर्षित झाला आहे. जाहीर सभातून कॉंग्रेसचे नेते हिंदूंवर टीका करून मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करतात, असा हिंदू समाजातील बहुतेकांचा समज आहे.
कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडे आता एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे हिंदू समाजाच्या बाजूने धोरण राबविणे. अन्यथा कॉंग्रेस, समाजवादी आणि बहुजन समाज यासारखे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष २०१९ च्या निवडणुकीत शोधूनही सापडणार नाही.
ऍड. नरेंद्र वि. काळे,९४२१७५५५५०