मुस्लिम महिलांमधील अघोरी रुढी-परंपरा

0
217

तिसरा डोळा

एफजीएमचा स्त्रियांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, याची फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. तथापि, ज्या स्त्रियांचा सुंता झालेला आहे, त्या चिंता, उदासीनता आणि क्लेशकारक ताणाच्या चढउताराला बळी पडतात, हे सिद्ध झाले आहे. ज्या महिला या संस्कृतीतून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मनात लाजेची आणि विश्‍वासघात झाल्याची भावना विकसित होते, हेदेखील पाहण्यात आले आहे. आपण शारीरिकदृष्ट्या इतर महिलांप्रमाणे सुस्थितीत नाही, यामुळे चिडचिड होण्याचे प्रमाणही वाढीस लागते.

रूढी-परंपरा हे देशोदेशीचे वैशिष्ट्य असते. काळानुरूप त्या प्रथा-परंपरा बदलायलादेखील हव्यात आणि त्यात कालसुसंगत बदलदेखील करायला हवेत. हिंदूंनी नाही का त्यांच्यातील सतिप्रथा बंद केली, विधवाविवाहावरील बंदी उठविली, बालविवाह बंद केले आणि हुंडा पद्धतीलाही रामराम केला. त्याचप्रमाणे इतरांनीही नव्या परिप्रेक्ष्यात स्वतःच्या आचारविचारात बदल करायला हवेत. असो. जगभरातील मुस्लिम देशातील महिलांमध्ये एक भयानक, रानटी, क्रूर आणि मानवतेलाही काळिमा फासणारी एक प्रथा आजही चलनात असून, ती प्रथा आता अमेरिकेलाही कवेत घेऊ लागली आहे! मुस्लिमांमध्ये मुले वयात येण्यापूर्वी त्यांचा खतना करण्याची धार्मिक प्रथा आजही सुरू आहे. पुरुषांच्या लिंगावरची कातडी चाकूने अथवा धारदार शस्त्राने अवैद्यकीय पद्धतीने काढण्याचा सोपस्कार, आजकाल काही प्रमाणात वैद्यकीय मदतीने पार पाडला जातो. लिंग साफ राहावे हा त्यामागचा मूळ हेतू. आपल्याला माहिती नसेल, पण असाच प्रकार मुस्लिम महिलांबाबतही केला जातो. त्याला म्हणतात महिलांची सुंता अथवा खतना. याला इंग्रजीत नाव आहे- female genital mutilation (FGM).  संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार, ४ ते १४ वर्षे किंवा त्यापेक्षाही थोड्या अधिक वयाच्या जगभरातील ४४ मिलियन मुली आणि महिलांची सुंता झालेली आहे किंवा त्यांनी स्वतःहून धर्मातील रूढी-परंपरेनुसार ती करून घेतलेली आहे. या रूढीनुसार महिलांचे बाह्य जननेंद्रिय चाकू अथवा ब्लेडने कापले जाते, विद्रूप केले जाते किंवा शरीरातून काढून टाकले जाते. अनेकदा तर या मागास रूढी-परंपरेनुसार शिशू बालिकांचीदेखील सुंता केली जाते. यात अनेक मुलींचा आणि महिलांचा मृत्यू झालेला आहे. आजवर मुस्लिम देशांपर्यंतच मर्यादित असलेली ही प्रथा अमेरिकेतही वाढीस लागली असल्याचा ‘द सेंटर फॉर डिसिस कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शन (CDC)’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा अहवाल आहे. गेल्या काही दशकांपासून मध्यपूर्वेतील आणि ज्या देशांमध्ये ही अघोरी प्रथा पाळली जाते त्या मुस्लिम देशांमधील अनेक निर्वासितांनी अमेरिकेत आश्रय घेतला आणि या समाजातील महिलांची सुंता होऊ लागल्याने त्याचे प्रमाण अमेरिकेतही वाढीस लागले आहे. सीडीसीच्या मते, १९९७ पासून अमेरिकेतील या प्रथेत चार पटीने वाढ झाली असून, आणखी ५० हजारावर मुली आणि महिला या रानटी प्रथेला बळी पडण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी निश्‍चितच म्हणावी लागेल. अमेरिकेत या परंपराग्रस्त महिलांची एकूण आकडेवारी समोर आली नसली, तरी समाजसुधारकांपुढे यामुळे आव्हान उभे झाले नसते तरच नवल. आफ्रिकेतील छोट्या खेडेगावांमध्ये तर हा अघोरी प्रकार काचेच्या धारदार तुकड्याने केला जाई. वैद्यकीय सोयी-सुविधा नसल्याने अथवा त्याबाबत जनजागरणच न झाल्याने, जननेंद्रियाला चिरा देण्यासाठी उपयोगात येणारा हा काचेचा तुकडा निर्जंतुक करण्याची काळजी घेतली जाणे शक्यच नव्हते. काही प्रमाणात ख्रिश्‍चनांमध्येही ही प्रथा पाळली जाते. अल्जेरियामध्ये तर मुस्लिम मुलींपुढे लग्नापूर्वी कौमार्य सिद्ध करण्याचे आव्हान असते. त्याच कौमार्यसिद्धतेतून, महिलांचे पावित्र्य जपले जावे म्हणून, त्यांच्या मासिक पाळ्या असंतुलित होऊन त्यांच्या वयात येण्यास विलंब व्हावा म्हणून तसेच त्यांच्या लैंगिक गरजा कमी व्हाव्या, या हेतूने हा प्रकार रूढ झाला असण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांवर ही अघोरी पंरपरा लादल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. स्त्रियांचा सुंता अथवा खतना करण्याची ही प्रथा आफ्रिका, आशिया आणि मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात आढळते. युनिसेफच्या मते, २०१६ मध्ये इंडोनिशिया, इराकी कुर्दिस्तान, येमेन आदींसह ३० देशांमधील २०० मिलियन स्त्रियांना या रूढी-परंपरेचा फटका बसला आहे. या पंरपरेला बळी जाणार्‍या महिला दुसर्‍या कुणामुळे नव्हे, तर घरच्याच महिलांच्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत! आपल्या घरच्या लहान मुलीने खतना केलाच पाहिजे, असा आग्रह आई, आजी अथवा घरातील ज्येष्ठ महिलांकडून धरला जातो.
एफजीएमचा स्त्रियांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, याची फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. तथापि, ज्या स्त्रियांचा सुंता झालेला आहे, त्या चिंता, उदासीनता आणि क्लेशकारक ताणाच्या चढउताराला बळी पडतात, हे सिद्ध झाले आहे. ज्या महिला या संस्कृतीतून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मनात लाजेची आणि विश्‍वासघात झाल्याची भावना विकसित होते, हेदेखील पाहण्यात आले आहे. आपण शारीरिकदृष्ट्या इतर महिलांप्रमाणे सुस्थितीत नाही, यामुळे चिडचिड होण्याचे प्रमाणही वाढीस लागते. १२,६७१ महिलांचा समावेश असलेल्या वेगवेगळ्या १५ प्रकारच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या महिलांची सुंता झालेली आहे, त्यांच्यात लैंगिक इच्छा फारच कमी उत्पन्न होते.
१९७० पासून मुस्लिम महिलांनी या रानटी पंरपरेचा त्याग करावा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने सर्व आरोग्य संघटनांना अशा प्रकारच्या अघोरी प्रकारांपासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहन केले. तथापि, हे आवाहन हवेतच विरले असून, आजही जगात दररोज किमान चार ते पाच हजार स्त्रियांना या रूढीचा सामना करावा लागत आहे.
या रूढीचा नायनाट व्हावा, यासाठी आता मोठ्या प्रमाणावर पावले उचलली जाऊ लागली आहेत. अमेरिकेने तर त्यांच्या देशात आश्रय घेण्यासाठी आलेल्या मुस्लिम महिलांना शिक्षित करण्यास प्रारंभ केला आहे आणि ज्या महिला ऐकणार नाहीत, त्यांना ही प्रथा आम्ही खपवून घेणार नाही, असा दमही भरला आहे. पण, जोवर अत्याचार होणार्‍या महिला अथवा त्यांच्या घरातील कर्ते पुरुष स्वतःहून पुढे होऊन सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देत नाहीत, तोवर यावर अंकुश लागणे शक्य नाही, हेदेखील तेवढेच खरे!
१९९६ पासून अमेरिकेत फेडरल कायद्यांतर्गत अशा प्रथांवर बंदी घालण्यात येऊन, असे करणार्‍यांना ५ वर्षांची सजा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१३ मध्ये मुलींना बाहेरच्या देशात नेऊन, तेथे त्यांच्या जननेंद्रियांवर सुंतासदृष्य शस्त्रक्रिया करण्यावर बंदी घालणारा कायदादेखील करण्यात आला. २०१३ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया, मेरिलॅण्ड, मिनेस्टोवा, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, टेक्सास, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया येथील २५ हजारावर मुलींचे आयुष्य पणाला लागले असल्याचा अहवाल पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरोने दिला आणि अमेरिकेचे धाबे दणाणले. खरोखरीच इस्लाममध्ये या परंपरेचे महत्त्व आहे काय, याबाबत खुलासा करताना इंडोनेशिया येथील ‘मजलिस इलेमा, इंडोनेशिया’ या धार्मिक संस्थेच्या प्रमुखाने प्रत्येक मुस्लिम महिलेचा खतना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. २०१३ मध्ये इजिप्तमध्ये एका १३ वर्षीय मुलीची सुंता करण्यात आली आणि अतीव वेदनेपायी ती दगावली. या प्रकरणी एका डॉक्टरची सुटका झाली, पण नंतर या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर त्याला २ वर्षांची शिक्षा ठोठावली गेली.
इजिप्तमध्ये तर या प्रथेवर बंदी आहे. पण, ती झुगारून देत अनेक मुस्लिम महिला आणि मुली आजही शेकडोंच्या संख्येत सुंता करून घेत आहेत. इजिप्तच्या ८५ वर्षीय स्त्रीवादी लेखिका डॉ. नवाल सदावी या गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचा खतना करण्याच्या या कुप्रथेविरोधात लढा देत आहेत. लहान वयात त्यांच्यावरही हा वाईट प्रसंग गुदरलेला आहे. मोठ्या झाल्यानंतर लिहिलेल्या एका पुस्तकात त्यांनी मुस्लिमांमधील या रानटी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. प्रगत समाजासाठी ही प्रथा अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पुस्तकात त्यांनी या अघोरी प्रथेमुळे बेदौर शाकेर नावाच्या १२ वर्षांच्या मुलीच्या २००७ मध्ये झालेल्या मृत्यूचादेखील उल्लेख केलेला आहे- ‘कुविचारी लोकांच्या मनात आशेची पालवी फुटावी म्हणून तुझा मृत्यू झाला आहे का? तुझ्या सुंदर आयुष्यासाठी तुला किंमत चुकवावी लागली आहे का?’ असे प्रश्‍न उपस्थित करून, मुल्ला-मौलवी आणि डॉक्टरांनी, समजूतदार धर्मात लहान मुलांची जननेंद्रिये कापली जात नाहीत, असा सल्ला दिला आहे. डॉ. नवाल सदावी यांचा महिलांच्याच खतन्याला नव्हे, तर मुलांच्या खतन्यालाही विरोध आहे. मुस्लिम मुले आणि मुली दोघांनाही जिनायटल म्युटिलेशनपासून मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्या करतात.
एकीकडे महिलांच्या सुंतेला विरोध होत असताना, इजिप्तचे खासदार इल्हामी ऍगिना (Elhamy Agina) म्हणतात, आमच्या देशातील लैंगिकदृष्ट्या कमकुवत पुरुषांकडे पाहता, महिलांनी सुंता करून घेणे अतिशय आवश्यक आहे. आमच्या देशात या प्रथेवर २००८ सालापासून बंदी असली, तरी महिलांची सुंता झाल्याने त्यांची लैंगिक गरज कमी होते, ही वास्तविकता कोणी नाकारू शकत नाही. इजिप्तला महिलांच्या गरजा पूर्ण करू शकणारे सशक्त आणि धडधाकट पुरुष मिळाले तरच ही प्रथा थांबविली जाऊ शकते. इजिप्तमधील पुरुष लैंगिकतेत अतिशय कमकुवत आहेत, कारण ते आपले पौरुषत्व वाढावे म्हणून उत्तेजकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. कमकुवत माणसेच अशी औषधं घेऊ शकतात. आम्ही महिलांच्या सुंता पूर्णतः थांबवल्या, तर आम्हाला सशक्त पौरुषत्वाच्या तरण्याबांड पुरुषांची गरज भासेल आणि आज त्याचीच आमच्याकडे कमतरता आहे, याकडे खासदार महोदय लक्ष वेधतात. २०१५ च्या आकडेवारीनुसार, इजिप्तमधील १० पैकी ९ महिलांचा सुंता झालेला आहे. भारतातील मुस्लिम महिलांच्या अधिकारांसाठी लढणार्‍या अनेक संघटना आहेत. मुस्लिमांमधील तिहेरी तलाकसारखे कालबाह्य मुद्दे रद्द व्हावे, यासाठी भारतातच नव्हे, तर जगभरात प्रयत्न सुरू झाले आहेत. काही मुस्लिम संघटनादेखील यासाठी पुढे आल्या असून, त्यांनी येत्या दोन वर्षांत तिहेरी तलाक पूर्णतः बंद होईल, असा शब्द दिला आहे. या सर्व इतिहासाकडे बघता, मुस्लिम महिलांची सुंता वा खतन्यातून मुक्ती व्हावी, हीच एक इच्छा!
– चारुदत्त कहू/ ९९२२९४६७७४