लंडन आणि एक परदेशी पत्रकार

0
146

विश्‍वसंचार
पाश्‍चिमात्य देशात वीक-एण्ड गर्दीत नोकरदार लोकांपेक्षा कॉलेज आणि शालेय वयाचे विद्यार्थी फार मोठ्या संख्येने आढळत आहेत. इतक्या लहान वयापासूनच हे विद्यार्थी दारूची पिंपच्या पिंप फस्त करतात आणि मग जबरदस्त मारामार्‍या करतात. हे प्रमाण आता इतकं वाढलं आहे की, शुक्रवार रात्र ते रविवार रात्र या कालावधीत लंडन शहरभरातल्या एखाद्या तरी अड्ड्यावर तुफान हाणामारी झाली नाही, असा आठवडा सहसा मावळत नाही.

लंडन हे एक अवाढव्य शहर आहे. ब्रिटन या भूतकाळातल्या जागतिक महासत्तेची ती साम्राज्यधानी होती. इरफान हुसैन या पाकिस्तानी पत्रकाराला लंडनचे जे संमिश्र अनुभव आले, ते त्याने ‘डॉन’ या वृत्तपत्रात मांडले आहेत.
डॉन या शब्दाला सध्याच्या प्रचलित भाषेत वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. डॉन म्हणजे माफिया टोळीचा प्रमुख; सर्व प्रकारचे बेकायदेशीर धंदे करणार्‍या टोळीचा म्होरक्या, असा अर्थ आता त्या शब्दाला आलेला आहे आणि असे डॉन लोक व पाकिस्तान याचा फारच निकटचा संबंध असतो, असा एकंदर अनुभव आहे.
पण कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या ‘डॉन’चा अर्थ आहे उष:काल. पाकिस्तान निर्माण झाल्या झाल्या लगेचच हे इंग्रजी वृत्तपत्र कराचीहून निघू लागलं. त्याच्या प्रकाशन संस्थेचे प्रमुख खुद्द महंमदअली जीनाच होते. कोणतीही पाकिस्तानी संस्था भारताचा आणि हिंदूंचा द्वेष केल्याशिवाय जगूच शकत नाही. कारण हिंदुद्वेष हाच मुळी त्या द्वेषाचा जीवनाधार आहे. पण तेवढा भाग सोडला तर ‘डॉन’ हे पाकिस्तानातलं एक दर्जेदार वृत्तपत्र आहे, यात शंका नाही.
तर या डॉनचा एक पत्रकार इरफान हुसैन हा अलीकडेच लंडनला भेट देऊन आला. पश्‍चिम लंडनमधल्या नाईटस्‌ब्रिज ते केन्सिंग्टन या बस प्रवासात त्याचं पाकीट मारण्यात आलं. केन्सिंग्टन हाय स्ट्रीट या बस थांब्यावर उतरल्यावर त्याच्या ते लक्षात आलं. पाकिटात पैसे फारसे नव्हते, पण लंडनमधल्या आणि पाकिस्तानातल्या बँकांची क्रेडिट काडर्‌‌स होती. त्यामुळे पहिल्यांदा तो आपल्या मुक्कामावर धावला आणि भराभरा दूरध्वनी करून त्याने ती क्रेडिट कार्ड्स ‘लॉक’ करण्याची व्यवस्था केली.
पाकिस्तानातल्या नेहमीच्या अनुभवांनुसार घटनाक्रम त्याच्या दृष्टीने इथेच संपला होता. पाकिस्तानात सर्वत्र सतत इतका हिंसाचार चाललेला असतो की, पाकिटमारी वगैरे प्रकारांकडे लक्ष द्यायला पोलिसांना आणि नागरिकांनाही वेळ नसतो. तो अनुभव जमेस धरून इरफानने पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण लंडनमधल्या त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सल्ला दिला की, पोलिसांत तक्रार दाखल करणं उत्तम. म्हणजे त्यामुळे पाकीट परत मिळेल असं नव्हे; पण पोलिस सतर्क होतील.
तेव्हा मग इरफानने केन्सिंग्टन पोलिस ठाण्याला दूरध्वनी केला. त्याचा संपर्क क्रमांक घेण्यात आला आणि साधारण तासाभराने एका पोलिस इन्स्पेक्टरने त्याच्याशी संपर्क साधून, घटना कशी घडली, याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. इरफानला धक्काच बसला. पोलिस स्वत:हून आपल्याशी संपर्क साधतायत आणि चक्क मऊ आवाजात, सभ्य भाषेत आपल्याशी बोलतायत, हा अनुभव त्याला सर्वस्वी अनोखा होता. पण खरे अनोखे अनुभव आणखीन पुढेच होते.
त्या इन्स्पेक्टरशी बोलताना इरफानला आठवण झाली की, बस प्रवासात तीन तरुण पोरं बरीचशी आपल्याला लगटून उभी होती नि ती आपसात कुठल्या तरी पूर्व युरोपीय भाषेत बोलत होती. यानंतर दोन दिवसांनी इरफानला केन्सिंग्टन पोलिस ठाण्याचं रीतसर पत्र आल की, तुमची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे; तपास चालू आहे आणि पाकीट मिळाल्यास तुमच्याशी पुन्हा संपर्क साधण्यात येईल. शिवाय त्यात अशीही सूचना करण्यात आली होती की, पाकीट मारण्यात आल्यामुळे तुम्हाला मानसिक धक्का बसला असेल. तेव्हा तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या परिसरातल्या अमुक समुपदेशन केंद्रात जा. तिथले कार्यकर्ते तुम्हाला त्या धक्क्यातून बाहेर पडण्यास मदत करतील. ही समुपदेशन सेवा मोफत आहे.
इरफानला आनंद आणि आश्‍चर्य या दोन्हीमुळे खूप हसू आल. पाकीट मारलं गेल्यामुळे मानसिक धक्का? अहो, सरसहा माणसं मारली जात असलेली पाहून ज्यांची मनं निबर झाल्येयत, त्यांच्या मनाला पाकीट मारण्याचा कसला आलाय धक्का! पण लंडनमधल्या नागरिकांच्या नाजूक मनांना असादेखील धक्का बसू शकतो तर! आणि त्यांना त्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी चक्क समुपदेशन केंद्र अस्तित्वात आहे. काही स्वयंसेवी कार्यकर्ते या कामासाठी आपला वेळ, आपली सेवा मोफत देत आहेत. सगळीच गंमत!
पुढचा धक्का म्हणजे आणखी दोन दिवसांनी इरफानला जवळच्या समुपदेशन केंद्राचं पत्र आलं की, तुमचं पाकीट मारलं गेल्याचं आम्हाला केन्सिंग्टन पोलिस ठाण्याकडून कळलं आहे. आमचं केंद्र अमुक वेळात उघडं असतं. केव्हाही या. तुमचं काऊन्सेलिंग करण्यास आम्ही उपलब्ध आहोत.
इरफान अर्थातच तिथे गेला नाही. कारण त्याला वेळ नव्हता. पण या गमतीदार अनुभवाच्या निमित्ताने त्याला लंडनच्या सामाजिक स्थितीची थोडीशी झलक पहायला मिळाली. ती त्याने डॉनमध्ये लेखरूपात मांडली आहे.
२००४ साली म्हणजे १३ वर्षांपूर्वी पोलंडला युरोपीय महासंघ ऊर्फ युरोपियन युनियन युरोपमधल्या देशांच्या संघटनेत प्रवेश देण्यात आला. पोलंड हा सोवियत रशियाच्या मांडलिक देशांमधला एक पूर्व युरोपीय देश. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सामान्य. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या पश्‍चिम युरोपातल्या संपन्न देशांचं आकर्षण जसं आपल्या लोकांना आहे, तसंच ते पूर्व युरोपातल्या गरीब देशांनाही आहे. युरोपीय महासंघामुळे पूर्व युरोप आणि पश्‍चिम युरोप यांच्या दरम्यानचे स्थानांतरणाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. परिणामी पूर्व युरोपातले लोक राशनपानी लेकर; नव्हे, राशनपाणी मिळवण्यासाठी पश्‍चिम युरोपमध्ये घुसत आहेत. गेल्या तेरा वर्षांत एकट्या लंडनमध्येच किमान ६ लाख पोलिश स्थलांतरित येऊन दाखल झाले आहेत. प्लंबर, खाटिक अशा कथित हलक्या धंद्यामध्ये ते शिरले आहेत. बहुसंख्य पोलिश लोक कसबी आणि इमानी कामगार आहेत. पण चांगल्याबरोबर वाईटही असतंच. या पोलिश स्थलांतरितांमुळे लंडनच्या गुन्हेगारीतही भक्कम वाढ झाली आहे. इरफानशी बसमध्ये लगट करणारी पोरं पूर्व युरोपीय भाषा बोलत होती; ती पोलिश असण्याचीच मोठी शक्यता आहे. अर्थात खुद्द लंडनवासीय म्हणजे ब्रिटिश लोक गुन्हेगारीत मागे आहेत असं नव्हे. विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये सुरे आणि पिस्तुलं घेतलेल्या गुंडांच्या टोळ्यांच्या आपापसातल्या मारामार्‍या हा लंडनच्या गुन्हेगारी जगाचा एक दैनंदिन कार्यक्रम झालेला आहे. पोलिस फार काही करू शकत नाहीत.
यातला दु:खाचा भाग म्हणजे या गुन्हेगारीत अगदी कोवळ्या वयाच्या पोरांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. जेमतेम बारा-तेरा वर्षांच्या कोवळ्या पोरांना मोठे गुन्हे केल्याबद्दल पोलिस पकडत आहेत आणि आपण कुणीतरी महान पराक्रमी वीर असल्याच्या थाटात ही पोरं टीव्हीच्या कॅमेर्‍याला रुंद हास्य करत हात दाखवत आहेत, अशी दृश्यं दूरदर्शनवर सतत दिसत असत.
सर्वच पाश्‍चिमात्य देशांत पाच दिवसांचा आठवडा असतो. याचा परिणाम म्हणजे शुक्रवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत सगळे पब्स, बार्स, डिस्कोज् आणि कॅसिनोज गर्दीने फुललेले असतात. मनसोक्त दारू प्यायची, मनसोक्त जुगार खेळायचा आणि मनसोक्त नाच करायचा, असा शनिवार-रविवार या सुटीचा उपयोग बरेच लोक करतात.
पण आता या सगळ्यांचा अतिरेक होताना दिसतो आहे. पूर्वी पाच दिवस काम करून दमलेले नोकरदार लोक, शीण घालवून ताजेतवाने होण्यासाठी दोन दिवस दारू-जुगार-नृत्य यात मन रमवतात, असं याचं समर्थन केलं जात असे. त्यात थोडं फार तथ्यही होतं. पण आता या वीक-एण्ड गर्दीत नोकरदार लोकांपेक्षा कॉलेज आणि शालेय वयाचे विद्यार्थी फार मोठ्या संख्येने आढळत आहेत. इतक्या लहान वयापासूनच हे विद्यार्थी दारूची पिंपच्या पिंप फस्त करतात आणि मग जबरदस्त मारामार्‍या करतात. हे प्रमाण आता इतकं वाढलं आहे की, शुक्रवार रात्र ते रविवार रात्र या कालावधीत लंडन शहरभरातल्या एखाद्या तरी अड्ड्यावर तुफान हाणामारी झाली नाही, असा आठवडा सहसा मावळत नाही.
आपल्याकडे ज्याप्रमाणे गरिबांसाठी स्वस्त घरांच्या वसाहती वगैरे प्रकार असतात, तसेच ब्रिटनमध्येही आहेत. प्रत्येक शहरात स्थानिक महापालिकांनी अशा वसाहती विकसित केल्या आहेत. त्यांना ‘कौन्सिल इस्टेट्‌स’ असं म्हटलं जातं. इरफान हुसैनच्या निरीक्षणानुसार या कौन्सिल इस्टेट्‌स म्हणजे वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख अड्डे बनलेले आहेत. प्रत्येक वसाहत हा एकेका टोळीचा विभाग असतो. अन्य टोळीवाले तिथे प्रवेश करू शकत नाहीत. कुणी तशी हिंमत केलीच, तर प्रसंगी खूनही पडू शकतात. या प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्येही बहुसंख्य अगदी तरुण मुलं आहेत. कित्येकदा तर अनेक चांगल्या मुलांना नाईलाजाने कोणत्यातरी टोळीत प्रवेश करावाच लागतो. नाही तर त्यांची खैर नसते.
सध्या ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष सत्तेवर आहे, तर मजूर पक्ष हा विरोधी पक्ष आहे. वाढती गुन्हेगारी हे सत्ताधारी पक्षाला झोडपून काढण्यासाठी विरोधी पक्षाला एक चांगलं हत्यार मिळालेलं आहे. पण, समजा उद्या मजूर पक्ष सत्तेवर आला तर गुन्हेगारीला आळा घालण्याचं प्रभावी साधन त्यांच्याकडे आहे, असं नाही.
एकीकडे हे सगळं चालू असताना, वाढत असतानाही गुन्हे नोंदले जावेत, त्यांचा तपास व्हावा, नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलिसांनी करावं; या ज्या जुन्या चांगल्या पद्धती, त्यादेखील टिकून आहेत, हीच इरफानच्या अनुभवाची गोळाबेरीज आहे. म्हणजेच, आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचा जनक असलेल्या ब्रिटनची स्थिती पूर्वीपेक्षा खराब असली, तरी पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली आहे.
पूर्वीच्या अखंड भारतातल्या कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेचा पाया ब्रिटिशांनीच घातलेला आहे. ती यंत्रणा भारतात आज कशा स्थितीत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पाकिस्तानात त्या यंत्रणेचं जे काही मातेरं झालं आहे, त्याची कारणंही आपल्या समोरच आहेत.
– मल्हार कृष्ण गोखले