संतप्त चीन

0
171

दक्षिण कोरियातून आपले ऍण्टी मिसाईल रडार हटविण्यास अमेरिका तयार होणार नाही, हे चीनला कळून चुकले आहे. त्यामुळे आता चीननेदेखील शिरजोरीची भाषा बोलायला सुरुवात केली आहे-‘‘आम्ही आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे क्षणात ‘थाड’ला ब्लाइंड म्हणजे निष्क्रिय करू शकतो.’’ अशी दर्पोक्ती चिनी लष्करी अधिकार्‍याने केली आहे.

उत्तर कोरियाचा हुकुमशहा म्हणून किम-जॉंग-उनचे नाव आता सर्व जगभर गाजत आहे. मागच्या वर्षी उत्तर कोरियाने २० बॅलिस्टिक मिसाईलचे प्रक्षेपण करून युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिलचा ठराव धुडकावून लावला. त्याच्या मिसाईल प्रक्षेपणाचा ध्यास सारखा वाढतच आहे. काही दिवसापूर्वी त्याने जपानच्या समुद्रात चार मिसाईलचे प्रक्षेपण करून आपले मनसुबे जाहीर केले. जागतिक राजकारणात किम जॉन उन हे अत्यंत खुनशी व्यक्तिमत्त्व समजले जाते. स्वत:ला सर्वोच्चपदी कायम ठेवण्यासाठी त्याने स्वकीयांचीदेखील पर्वा केली नाही. त्याला राजकीय सत्तेचा वारसा अशाच रक्तपात करणार्‍या क्रूरकर्मा वडिलांपासून मिळाला आहे.
किम-जॉंग-नाम हा किम-जॉंग-उन या उत्तर कोरियाच्या हुकुमशहाचा सावत्र भाऊ. या दोघांत वितुष्ट निर्माण झाले. मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा, १३ फेब्रुवारी १७ ला खून झाला. अर्थात, त्यामागे किम-जॉंग-उनचे कारस्थान होते. विशीच्या दोन तरुणी त्याच्या मागावर होत्या. वेळ साधून किम जॉंग नामच्या चेहर्‍यावर विषप्रयोग करण्यात त्यांना यश आले. श्‍वास कोंडून त्याचा मृत्यू झाला होता. मलेशिया सरकारने त्याचे शवविच्छेदन करून ते विष व्हीएक्स असल्याचा अहवाल दिला. हे विष उत्तर कोरिया आपल्या रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीकरिता वापरत असते. हे विष एवढे जहाल आहे की, एक लिटर विष १० लक्ष लोकांचा जीव घेऊ शकते. व्हीएक्सच्या नुसत्या वाफेनेदेखील काही सेकंदात गुदमरून मृत्यू ओढवतो. उत्तर कोरिया अशी रासायनिक शस्त्रास्त्रे राखून आहे.
उत्तर कोरियाला चीनचे, तर दक्षिण कोरियाला अमेरिकेचे पाठबळ आहे. आज उत्तर कोरियातील शेकडो मिसाइल्स दक्षिण कोरियाच्या दिशेने रोखून आहेत. किम-जॉंग-उन हा माथेफिरू हुकुमशहा त्याचा कोणत्याही क्षणी उपयोग करू शकतो. याच एका कारणावरून अमेरिकेने दक्षिण कोरियात आपले ऍण्टी मिसाईल युनिट ‘थाड’ आता तैनात केले. अमेरिकेचे ऍण्टी मिसाईल रडार त्यामुळे आपोआपच चीनच्या सीमेजवळ आले आहे. चीनच्या दृष्टीने हे त्यांच्या संरक्षण यंत्रणेला आव्हान देण्यासारखे आहे. चीनच्या न्यूक्लियर सिस्टीमला शह देण्यासाठी मुद्दामहून दक्षिण कोरियाने हे ‘थाड’ त्यांच्या सीमेत बसविल्याचा आरोप चीनने केला आहे.
चीनचा हा रोष एवढा प्रचंड आहे की, त्यांनी दक्षिण कोरियाशी असलेले व्यापारिक संबंध ताबडतोब तोडून टाकले. चीन ही दक्षिण कोरियासाठी मोठी बाजारपेठ आहे. पण, आता दक्षिण कोरियातील मालावर तेथे बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये दक्षिण कोरियाने चीनमध्ये १३७ मिलियन डॉलर्सचा व्यापार केला होता. पण, आता चीनशी झालेल्या या विसंवादामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट, रेक्स टायलरसन यांनी मागच्याच आठवड्यात चीनच्या या आक्रमक धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. येत्या मे महिन्यात दक्षिण कोरियात अध्यक्षीय निवडणुका आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत आघाडीवर असलेले नेते मून-जाई-इन यांनीदेखील ‘थाड’चे संदर्भात कोणतेच आश्‍वासन देण्यास नकार दिला. चीनची मानसिकता या ‘थाड’चे बाबतीत बरीच पूर्वग्रहदूषित आहे. चीनच्या सर्वच भागांवर त्यामुळे अमेरिकेला लक्ष ठेवता येईल. त्यांचे न्यूक्लिअर शस्त्रागारसुद्धा त्यांच्या मार्‍याच्या टप्प्यात येऊ शकेल, असे चीनला वाटते. दुसर मुद्दा असा की, ‘थाड’ ही यंत्रणा जर ४० ते १५० कि. मी. अंतरावरच्या मिसाईलला लक्ष्य करण्यासाठी तयार केली आहे, तर त्याचे येथे प्रयोजन काय? कारण उत्तर सीरियातील मिसाईल प्रक्षेपण केंद्र ही तेथून फारच जवळ म्हणजे ४० कि. मी.पेक्षाही कमी अंतरावर आहेत. याचाच अर्थ, अमेरिकेने चीनच्या न्यूक्लियर यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी हे ‘थाड’ तेथे बसविले आहे. यावर उत्तर देताना अमेरिकेचे मिसाईल डिफेन्सचे प्रमुख शास्त्रज्ञ मालकेल इलेमन यांनी स्पष्ट केले की, ‘थाड’ची क्षमता चिनी भूमीवरून होणारे मिसाईलसचे प्रक्षेपण शोधून काढण्याची असली, तरी आमचे रडार त्याला रोखण्यासाठी काहीच करू शकत नाही. हे झाले अमेरिकन शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण. पण, चीन सहजासहजी ते मान्य करायला तयार नाही. गोष्ट अगदी साधी आहे. आजच्या घडीला दक्षिण कोरियाच्या रक्षणासाठी अमेरिकन लष्कराच्या २८,५०० तुकड्या दक्षिण कोरियाच्या भूमीवर तैनात आहेत. उत्तर कोरियाच्या मिसाईलपासून त्याचे रक्षण अमेरिकेला करावेच लागणार आहे.
दक्षिण कोरियातून आपले ऍण्टी मिसाईल राडार हटविण्यास अमेरिका तयार होणार नाही, हे चीनला कळून चुकले आहे. त्यामुळे आता चीननेदेखील शिरजोरीची भाषा बोलायला सुरुवात केली आहे-‘‘आम्ही आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे क्षणात ‘थाड’ला ब्लाइंड म्हणजे निष्क्रिय करू शकतो.’’ अशी दर्पोक्ती चिनी लष्करी अधिकार्‍याने केली आहे.
दक्षिण कोरियातील त्यांच्या ऍण्टी मिसाईल ‘थाड’ यंत्रणेच्या क्षमतेबद्दल अमेरिका कितीही बचावात्मक बोलत असली, तरी ‘थाड’ची यंत्रणा ही उत्तर कोरियाकडून येणार्‍या नव्वद टक्के क्षेपणास्त्रांचा मारा हाणून पाडण्यास समर्थ असल्याचे बोलले जाते. अमेरिकन संरक्षण रडार यंत्रणा ही थेट जपानपासून भारतापर्यंत पोहोचली आहे. जपानमध्येही दोन ‘थाड’ राडार कार्यान्वित आहेत. ही यंत्रणा युद्धकाळात आपले मिसाइल्स नाकाम करू शकेल, अशी सुप्त भीती अजूनही चिनी शासकांच्या मनात घर करून बसली आहे. त्याचीच ही संतप्त प्रतिक्रिया.
डोनाल्ड ट्रम्प व चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची अनेक मुद्यांवरील चर्चा लवकरच अभिप्रेत आहे. त्यात ‘थाड’चा ज्वलंत विषय असेलच. पण, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे उत्तर कोरियाचे तानाशाह किम-जॉंग-उन यांची अमर्याद वक्तव्ये. त्यासाठी चीनने आपले उत्तर कोरियासंबंधीचे धोरण निश्‍चित करावे, अशी अट अमेरिका घातल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण आशिया खंडाची सुरक्षा व शांतता किम-जॉंग-ऊनच्या एका चुकीच्या निर्णयाने ढासळू शकते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
– प्रमोद वडनेरकर/९४०४३४३५०७