आता शेवटचाच अध्याय?

0
241

पराभवातून काहीच न शिकणार्‍याचा अंत होतो असे म्हणतात. त्याचा प्रत्यय येणार्‍या काळात कॉंग्रेसच्या बाबतीत देशाला येईल की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. पराभवामागून पराभव होत असतानाही त्यातून काहीच धडा न घेता, स्वत:च्या आचार-विचारात कुठलाच बदल न करता, स्वत:च्या शैलीत बदल न करता काम करणार्‍या कॉंग्रेसला पुढची वाटचाल कठीण आहे. ‘हायकमांड’ संस्कृतीने कॉंग्रेसचे प्रादेशिक नेतृत्व संपुष्टात आणले आहे. राज्याराज्यांमधले दिग्गज नेते कुठे गायब झाले आहेत, ते हायकमांडच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध बंड का पुकारत नाहीत, हे एक गूढच आहे. अशीच स्थिती राहिली तर हा कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा शेवटचाच अध्याय ठरेल, यात शंका नाही.

‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा कॉंग्रेसच खरा करून दाखवायला निघाली आहे! उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस आणखी खचली आहे. ज्या कॉंग्रेसने सहा दशकांपर्यंत केंद्रात आणि देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये अनिर्बंध सत्ता गाजवली, ती कॉंग्रेस आज रसातळाला गेली आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात भाजपाला जो विजय मिळाला तो जनादेश न मानता कॉंग्रेसने भाजपावर, मतदान यंत्रात छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. पण, असा आरोप करताना कॉंग्रेसला पंजाबात मिळालेल्या विजयाचा आणि गोवा-मणिपुरात मिळालेल्या सर्वाधिक जागांचा विसर पडला आहे! एकीकडे कॉंग्रेस, मतदान यंत्रात भाजपाने गडबड केल्याचा आरोप करते आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसचेच वरिष्ठ नेते हा आरोप अप्रत्यक्षपणे फेटाळून लावत आहेत. मतदान यंंत्रामध्ये भाजपाने छेडछाड केली असती, तर पंजाबमध्ये आपली सत्ता आलीच नसती, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते कॅ. अमरिंदरसिंग यांनी केले आहे. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय कायदा मंंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, यांनीही स्वपक्षाच्या विपरीत भूमिका घेतली आहे. असे असतानाही जर कॉंग्रेस पक्ष मतदान यंंत्रात भाजपाने छेडछाड केली असेच म्हणत असेल, तर ती बाब त्या पक्षात आलेले नैराश्यच प्रकट करते.
गेल्या बुधवारी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील १३ विरोधी पक्षांचा समावेश असलेले शिष्टमंंडळ राष्ट्रपतींना भेटले. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून देशात दहशतीचे वातावरण असल्याची माहिती या शिष्टमंंडळाने राष्ट्रपती प्रणव मुुखर्जी यांना दिली. काळा पैसा, भ्रष्टाचार, गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी जर मोदी सरकार कठोर पावलं उचलत असेल अन् त्यात कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई होत असेल, तर त्याला दहशत म्हणायचे काय? एवढी वर्षे जो पक्ष सत्तेत होता, त्या पक्षाने देशातील गोरगरीब जनतेसाठी काम केले, देशाच्या विकासासाठी काम केले, गरिबी हटवली की गरिबालाच उद्ध्वस्त केले… अशा सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी कॉंग्रेसने खरे तर आत्मचिंतन करायला हवे. केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून कॉंग्रेस बावचळल्यासारखी वागत आहे. संपूर्ण देश भयग्रस्त आहे, लोकशाही वाचवण्याची गरज आहे, असे साकडे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंंडळाने राष्ट्रपतींना घातले. राष्ट्रप्रमुख या नात्यानेे त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा घडवून आणावी, अशी अपेक्षाही शिष्टमंंडळाने व्यक्त केली. हे सगळं हास्यास्पद आहे, कॉंग्रेसची अगतिकता दाखविणारं आहे. सत्तेबाहेर कॉंग्रेसची अवस्था कशी दयनीय झाली आहे, हेही यातून दिसते आहे.
भारतात लोकशाही आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ज्या कॉंग्रेसने सहा दशकांपेक्षा अधिक काळ देशात सत्ता गाजवली, त्या कॉंग्रेसचंही ही लोकशाही टिकवण्यात योगदान आहे. ते कोणी नाकारू शकत नाही. पण, आज तीच कॉंग्रेस उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालांनंतर ज्या वळणावर उभी आहे, ते वळण धोकादायक आहे. कॉंग्रेससाठी एक अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत जय-पराजय काही नवीन नाही. एका पक्षाला विजय मिळतो तेव्हा दुसर्‍या पक्षाला पराभवाला सामोरे जावेच लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. राजकीय पक्षांच्या वाट्याला कधी विजयाचा गोडवा येतो, तर कधी पराभवामुळे नैराश्य. असे असले तरी उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालांनंतर कॉंग्रेसला जे नैराश्य आले आहे, ते फार पलीकडचे आहे. देशातल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची अशी स्थिती होणे हे काळजी करायला लावणारे आहे. कॉंग्रेसच्या अशा स्थितीमुळे सामान्य कार्यकर्ते तर चिंतेत पडले आहेतच, बहुआयामी लोकशाही मानणारे सगळेच चिंतित झाले आहेत. आज कॉंग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसने निडरपणे आत्मचिंतन करायला हवे. एकेकाळी या पक्षाला कुठलाही प्रतिस्पर्धी नव्हता. एकेकाळी बलाढ्य आणि मजबूत अशा पक्षाची दयनीय व केविलवाणी अवस्था का झाली, याबाबत आत्मचिंतन करण्याची जबाबदारी कॉंग्रेसच्या सर्वच स्तरातील नेत्यांनी स्वीकारली पाहिजे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक संख्याबळ कॉंग्रेसकडे असू नये, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
एकामागोमाग एक पराभव होत असतानाही कॉंग्रेसचे नेते सुधरायला तयार नाहीत. २०१२ साली उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला प्रचंड बहुमत मिळाले. कॉंग्रेस पराभूत झाली. त्यानंतर २०१३ साली राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपाला तीनही राज्यांत दणदणीत यश मिळाले. नंतर दिल्ली विधानभेची निवडणूक झाली. त्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी कॉंग्रेस औषधालाही उरली नाही! सत्तरपैकी एकही जागा कॉंग्रेसला मिळाली नाही. असे पराभवाचे झटके बसत असतानाही कॉंग्रेसच्या वर्तणुकीत, ध्येयधोरणात, नेत्यांच्या देहबोलीत कुठलाही फरक झाल्याचे आढळून आले नाही. कॉंग्रेसची काम करण्याची शैलीही बदलली नाही आणि विचारसरणी तर अजीबातच नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीने तर कॉंग्रेसला पार रसातळाला नेले. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद न मिळण्याइतपत कॉंग्रेस कमकुवत झाली. तरीही या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हे कॉंग्रेसला समजलेले नाही, उमगलेलेही नाही. उत्तरप्रदेशातील पराभवाने तर कॉंग्रेसचे कंबरडेच मोडले आहे. २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला उत्तरप्रदेशात २२ जागा मिळाल्या होत्या आणि समाजवादी पार्टीनंतर कॉंग्रेस दुसर्‍या क्रमांकावर होती. असे असतानाही १४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेच फक्त निवडून येऊ शकले. २००९ साली जी भाजपा चौथ्या क्रमांकावर होती, ती आज पहिल्या क्रमांकावर आहे आणि आज कॉंग्रेस चौथ्या स्थानी आहे.
कॉंग्रेसची ही परिस्थिती चिंता करायला लावणारी असली, तरी कॉंग्रेस संपून जाईल, भारत कॉंग्रेसमुक्त होईल, असा निष्कर्ष आजच काढणे घाईचे होईल. देशातील प्रत्येक राज्यात अन् प्रत्येक गावात कॉंग्रेसचे अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांच्या मनात कॉंग्रेसला मानाचे स्थान आहे. देशातले जे व्यापक जनमानस आहे, त्यात कॉंग्रेस सामावलेली आहे, हे नाकारून चालत नाही. पण, आजही ज्या जनतेचा कॉंग्रेसवर भरवसा आहे, तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी तर कॉंग्रेसच्या नेत्यांचीच आहे ना? पक्षात ज्या उणिवा आहेत, त्रुटी आहेत, त्या शोधून दुरुस्त कशा करता येतील, हे कॉंग्रेसच्या धुरीणांना बघावे लागेल. आत्मचिंतनात या सगळ्या बाबींचा समावेश करावा लागेल. आज आत आणि बाहेरही जे प्रश्‍न विचारले जात आहेत, त्याकडेे दुर्लक्ष करून चालणार नाही. या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करून कॉंग्रेस फक्त तुष्टीकरणाचेच राजकारण करणार असेल, तर कॉंग्रेसला कोणीही वाचवू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुसंख्यकांच्या भावभावनांकडे दुर्लक्ष कसे करता येेईल? प्रत्येक राज्यातले राजकारण जर दिल्लीत बसलेले श्रेष्ठीच निश्‍चित करणार असतील, तर राज्यातल्या नेतृत्वाला वाव कसा मिळणार, ते नेतृत्व विकसित होऊन पुढे कसे येणार, याचा विचार तरी करायला नको का? ज्या राहुल गांधींना प्रादेशिक राजकारणाचा अनुभव नाही, ते राहुल गांधी प्रादेशिक स्तरावरच निर्णय घेणार असतील, तर पक्ष आणखी रसातळाला जाईल, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही!
गेल्या २० वर्षांत कॉंग्रेस पक्षात ज्यांनी नेतृत्व केले, ज्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत निर्णय घेतले, त्यांना काही प्रश्‍नांची उत्तरं तर द्यावीच लागतील ना? पक्षाची आज ही अवस्था का झाली, राज्याराज्यांत नवे नेतृत्व उदयास का आले नाही? उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तामिळनाडू, महाराष्ट्र यांसारख्या अनेक मोठ्या राज्यांकडे कॉंग्रेसची दीर्घकाळ सत्ता होती. मग आज अचानक असे काय झाले की, या सगळ्या राज्यांमधून कॉंग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली? या राज्यांमध्ये शक्तिशाली नेतृत्व का उभे राहू शकले नाही? कॉंग्रेसच्या हायकमांड संस्कृतीने पक्षाची अशी दयनीय अवस्था केली, असे म्हणायला त्यामुळेच वाव आहे. काहीही झाले की, प्रदेशातले नेते दिल्लीत धाव घेत असत अन् प्रदेशातले काहीही माहिती नसलेली हायकमांड निर्णय देत असे. त्यामुळे अनेक पात्र नेत्यांवर अन्याय झाला आणि त्याच्या परिणामी पक्ष रसातळाला गेला. हे कोणाला अमान्य करता येईल? गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या जनतेचा मूड बदलला आहे, त्यांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत, हेही कॉंग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता उणिवा आहेत हे मान्य करणे, नव्या दमाच्या नेत्यांना संधी देणे, प्रादेशिक ताकद पुन्हा वाढविणे, सकारात्मक राजकारणावर भर देणे, या शिवाय कॉंग्रेसला गत्यंतर नाही. सारखे नकारात्मक राजकारण केले आणि भाजपावरच आसूड ओढण्यात कॉंग्रेसने धन्यता मानली, तर पुढचा काळ त्या पक्षासाठी अधिक कठीण राहील. जनतेला विकास हवा आहे, जनतेला चांगले राहणीमान हवे आहे, जनतेला शांतता हवी आहे, याकडे कॉंग्रेसला लक्ष पुरवावे लागेल. आज जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या मोदींनाच लक्ष्य करण्याची नीती कॉंग्रेसला यश मिळवून देणार नाही, हे त्या पक्षाच्या धुरीणांनी लक्षात घेतले पाहिजे. पक्षात संवाद वाढला पाहिजे आणि पक्षाने जनतेशी संवाद साधला पाहिजे. संवादातूनच प्रगतीचा मार्ग गवसणार आहे. पण, दुर्दैवाने कॉंग्रेस पक्ष संवादाकडे वळेल, अशी चिन्हे आजतरी दिसत नाहीत…!
– गजानन निमदेव