थोबाड फोडले!

0
734

विशेष संपादकीय 

अभूतपूर्व! ऐतिहासिक! भारताने इतिहास रचला. छुप्या पद्धतीने दहशतवाद्यांना पुढे करून भारतावर भ्याड हल्ले करणार्‍या पाकिस्तानचे थोबाड फोडले. दहशतवाद्यांना भारतात घुसवून हल्ले करणार्‍या पाकिस्तानला सणसणीत उत्तर देताना भारताने अगदी अधिकृतरीत्या सर्जिकल अटॅक करून पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ले करून ४० दहशतवाद्यांचा खात्मा केला. आडवे आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनाही कंठस्नान घातले. लपून छपून नाही तर अगदी अधिकृतरीत्या पत्रकार परिषद घेऊन भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी या सैनिकी कारवाईची माहिती अत्यंत अभिमानाने जगाला सांगितली. विजयादशमीच्या आधीच भारतीय सैन्याने विजयी सीमोल्लंघन करून टाकले! प्रत्येक भारतीय माणसाला आता ५६ इंचाची छाती म्हणजे काय असते, त्याचा अनुभव आला. उरीतील लष्करी तळावर झोपलेल्या सैनिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ‘मोदी यांची ५६ इंची छाती कुठे आहे?’ असा प्रश्‍न विचारणार्‍यांची तोंडेही आता या कारवाईने बंद झाली आहेत. एकाच कारवाईने शत्रूचे थोबाड फुटले आणि विरोधकांची तोंडे बंद झाली.

सर्वसामान्य भारतीय माणसाचा ऊर मात्र अभिमानाने भरून आला. ‘भारत म्हणजे येरागबाळ्यांचा देश नाही’, असे जगाला या कारवाईने निक्षून सांगितले गेले आहे. एकाने फेसबुकवर या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘आता यापुढे शत्रूला धडा शिकविण्याच्या विषयात इस्रायलचे उदाहरण देण्याची गरज पडणार नाही!’ भारतीय सैन्याने शत्रूला धडा कसा शिकवायचा असतो याचे एक जबरदस्त उदाहरणच आज पहाटे जगापुढे आणले आहे. गेली अनेक वर्षे पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर गोळीबार, भारतात दहशतवादी घुसवून कधी मुंबईवर हल्ला, तर कधी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया हे सत्र सतत चालू आहे. धडधडीत हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे पुरावे सापडले तरी सतत पाकिस्तानने या दहशतवादी कारवायांबाबत कानावर हात ठेवण्याचा शहाजोगपणा केला आहे. उलट उर्मटपणे भारताकडेच या दहशतवाद्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मागितले आहेत. ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशतवादी पाकिस्तानात असल्याबाबत अमेरिकेचे सरकार कधीच पुरावे देत बसले नाही, तर लादेनचा पत्ता अचूक मिळवून अचानक कारवाई केली आणि लादेनचा खात्मा केला. त्याला समुद्रात फेकून जलसमाधीही देऊन टाकली. भारतात दहशतवादी कारवाया पाकिस्तानमधील लष्करी अधिकारी, आयएसआयसारखी गुप्तहेर संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून घडवून आणणार आणि भारताने आरोप केला की पुरावे मागणार, पुरावे दिले की ते नाकारणार, असे सतत चालत आले आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यापासून ते अलीकडे झालेल्या पठाणकोट आणि उरीतील लष्करी तळावरील हल्ल्यापर्यंत सतत हेच चालले होते. अखेर भारत सरकारने अगदी चतुराईने निर्णय करत दहशतवादी तळांची अचूक माहिती मिळवत गुलाम काश्मीरमध्ये घुसून भारतात प्रवेश करण्यासाठी जमलेल्या प्रशिक्षित दशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानच्या ताब्यातील भूमीवर हे खात्मा झालेले दहशतवादी हाच पाकच्या नापाक कारवायांचा पुरावा!

पाकिस्तानी सैन्याला इतका जबरदस्त तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसला आहे की भारतीय सैन्याने अशी कारवाई केली हेच त्यांना नाकारावे लागत आहे. सर्जिकल अटॅक भारतीय सैन्याने केलेलाच नाही असा दावा पाकिस्तानी सैन्याला करावा लागला, हेच भारतीय कारवाईचे खरे यश आहे. उरी येथील भारतीय लष्करी तळावर झोपलेल्या सैन्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकले. त्यांना हत्यारे, प्रशिक्षण, रस्ता दाखविणारी यंत्रणा हे सगळे पाकिस्तानी सैन्याने पुरविले होते, हे सिद्ध झाले आहे. त्याचे पुरावे भारताच्या हाती लागले. भारतातील मोदी सरकारने हे सगळे पुरावे पाकिस्तानला दिले. नरेंद्र मोदी यांनी हा उरीतील हल्ला झाल्याबरोबर भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याची किंमत शत्रूला चुकवावी लागेल, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार घातला. अन्य शेजारी देशांनीही भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत सार्कवर बहिष्कार घातल्याने ही परिषद रद्द करावी लागली. जगातील अनेक देशांनी दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सगळ्या जगात पाकिस्तान एकाकी पडत चालल्याचे चित्र दिसू लागले. भारताने आंतरराष्ट्रीय जलकराराबाबत पुनर्विचार करण्याबाबत विधान केले. पाकिस्तानच्या कुरापतींना नेहमीप्रमाणे भारत मुत्सद्देगिरीने उत्तर देणार असे चित्र तयार झाले. जगातून अमेरिका, रशिया, इंग्लंड अशा अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतप्रदर्शन करून पाकिस्तानविरोधी आणि दहशतवादविरोधी एक जागतिक वातावरण तयार करण्यात भारत सरकारला यश आले. अशी एक पार्श्‍वभूमी तयार झाल्यावर गुलाम काश्मीरमधील पाकिस्तानने उघडलेली दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात घुसविण्याची सात केंद्रे भारतीय सैन्याने निश्‍चित केली. तेथे दहशतवादी भारतात घुसून निरपराध भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याच्या योजनेत आहेत याची माहिती मिळाली. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना, पाकिस्तानच्या तर कल्पनेतही नसताना भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्टरने एलओसीवर उतरून आत घुसून या सात दहशतवादी अड्ड्यांवर अनपेक्षित हल्ला चढवला. हल्ला इतका अनपेक्षित आणि इतका जबरदस्त होता की या सर्व दहशतवादी तळांवरील दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवाद्यांच्या मदतीला धावून आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. चोरून, लपून, दहशतवाद्यांना मदत आणि प्रशिक्षण देऊन भारतावर भ्याड हल्ले करणार्‍या पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मग भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की होय, पाकिस्तानव्याप्त गुलाम काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने भारतात घुसू पाहणार्‍या दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचे सात तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी अगदी ठामपणे सांगितले की, ‘आम्हाला फक्त दहशतवादीच मारायचे होते की जे भारतात घुसून येथील निरपराध नागरिकांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते. आम्ही तेवढेच केले. फक्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.’ हे सर्जिकल ऑपरेशन होईपर्यंत भारतीय संरक्षणमंत्र्यापासून ते लष्करी अधिकार्‍यांपर्यंत सर्वजण रात्रभर जागत माहिती घेत होते. घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. या कारवाईची माहिती पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दिली. या कारवाईतून भारताने दाखवून दिले आहे की, दहशतवादाला आणि दहशतवादाचे साहाय्य घेणार्‍यांना सभ्यतेने पुरावे देऊन, चर्चा करून उत्तर देऊन काहीच उपयोग नसतो, तर दहशतवाद असा घुसून मारूनच संपवावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या प्रचंड छावणीत घुसूनच त्याची बोटे छाटून त्याला धडा दिला होता, अफजलखानाच्या समोर जात त्याचा कोथळा बाहेर काढला होता, तसे दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी शत्रूच्या गोटात घुसूनच मारले पाहिजे असा एक नवा धडा भारतीय शूर सैनिकांनी आणि भारत सरकारने जगासमोर ठेवला आहे.

आता पाकिस्तान बावचाळल्यासारखे भारताविरोधात आततायी आक्रमण करेल अशा प्रकारचे कयास किंचाळ्या आवाजात काही विद्वान करू लागले आहेत. भारतीय सैन्याने या शक्यता आधी गृहीत धरूनच ही धडक करवाई केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठ दिवसांत अनेक वेळा दीर्घकाळ लष्करी अधिकारी, लष्करी सल्लागार यांच्याशी बैठका आणि विचारविनिमय करून ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कोणत्या प्रतिक्रिया येऊ शकतील आणि पाकिस्तानकडून कोणती प्रतिक्रिया येऊ शकेल याचा विचार करून भारतीय लष्कराची ही धडक कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेवरील अनेक गावांतून नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यात येत असल्याबद्दलच्या बातम्या या कारवाईनंतर लगेच येऊ लागल्या आहेत. सीमाभागातील रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवून रुग्णालये तयार ठेवली जात असल्याबद्दलच्या बातम्याही आल्या आहेत. या बातम्यांमधूनही भारतीय लष्कर कोणत्याही येणार्‍या प्रतिक्रियेचा सामना करण्यास तयार असल्याचा आणि सतर्क असल्याचा संदेश शत्रूपर्यंत निश्‍चित पोहोचला आहे. मुत्सद्देगिरीपासून ते प्रत्यक्ष कारवाईपर्यंत भारत सरकारने आणि लष्कराने एका अतुलनीय धैर्याचा, साहसाचा, मुत्सद्देगिरीचा परिचय जगाला दिला आहे. वर्षानुवर्षे फक्त पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन, सीमेवरील भारतीय सैनिकाचा अपमानास्पद शिरच्छेद, सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, प्रशिक्षण घेऊन भारतीय सीमेत घुसणारे दहशतवादी हे सगळे भारत सहन करत आला. निषेधाचे कागदी लखोटे पाठवत राहिला. व्हाईट हाऊसकडे फक्त पुरावे पाठवत राहिला. आपले संरक्षण आपणच करायचे असते. जगात कोणीही कोणाच्या मदतीला उगाच धावून येत नसते. हे लक्षात घेऊन आता भारतात सरकार बदलताच रोख बदलला आहे. आता यापुढे अशी मनमानी चालणार नाही. दहशतवादाला नेस्तनाबूत केले जाईल. जशास तसे सणसणीत उत्तर दिले जाईल. अशा प्रकारचा इशारा भारताने या सर्जिकल ऑपरेशनमधून दिला आहे. विनाकारण भारताच्या वाटे जाल तर थोबाड फोडले जाईल, असा सज्जड इशारा या कारवाईने दिला गेला आहे. पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना सणसणीत चपराक बसली आहे. पाकिस्तानातील विविध सत्ताकेंद्रांमध्ये आता मतभेद तीव्र झाले आहेत. आता भारतात अतिरेकी घुसविण्याचे नियोजन करताना पाकिस्तानला दहादा विचार करावा लागेल. फुंकून फुंकून पावले टाकावी लागतील. इथे काही आगळीक केली तर थोबाड फुटेपर्यंत मार बसतो, हा अनुभव आल्यानंतर आता त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल. दहशतवादाशी आमचा काहीच संबंध नाही असे आता शहाजोगपणे जगात त्यांना सांगता येणार नाही. भारतात नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून टीका करणार्‍या विरोधकांचीही तोंेडे बंद झाली आहेत. आपण सरकारसमोर प्रश्‍नचिन्ह उभे करताना आपल्या देशाच्या शत्रूला मदत करत आहोत, याचे भानही या देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांना आलेले नाही. अशा सगळ्यांचीही बोलती या धडक कारवाईने बंद झाली आहे. एका धडक कारवाईने पंतप्रधानांनी अनेक पद्धतीने विजय मिळविला आहे. अनेक दिशांनी दसर्‍याआधीच केलेले हे सीमोल्लंघन देशाचा विजयध्वज डौलाने फडकत ठेवणारे आहे. हा छप्पन्न इंची दणका प्रत्येक भारतीयाची मान ताठ आणि छाती अभिमानाने फुगविणारा आहे!