पाकिस्तानीच इस्लामला बदनाम करताहेत

0
151

मलाला युसूफझईचा घरचा अहेर
इस्लामाबाद, १५ एप्रिल
पाकिस्तानी लोकच त्यांच्या कृत्यातून देशाला आणि इस्लामला बदनाम करीत आहेत. आपल्या वागण्यामुळे इस्लामची प्रतिमा डागाळत आहे, याची जाणीवही या लोकांना नाही, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाची शांतिदूत आणि नोबेल पुरस्कार विजेती सामाजिक कार्यकर्ता मलाला युसूफझईने आपल्याच देशाला घरचा अहेर दिला आहे.
ईश्‍वरनिंदा केली म्हणून पाकमध्ये अलीकडेच एका विद्यार्थ्याला अमानूष मारहाण करण्यात आली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात बोलताना मलालाने पाकवर टीका केली.
इस्लामविषयी इतर लोकांना अकारण भीती आहे आणि पाकला इतर देशातील लोक नाव ठेवतात, अशी तक्रार आपण करीत असतो. पण, सत्यता अशी आहे की, पाकची प्रतिमा दुसरे कोणी नव्हे, तर आपल्याच देशातील काही लोक खराब करीत असल्याचे तिने म्हटले. आपल्या देशाचे नाव खराब करण्यास आपणच समर्थ आहोत, अशी बोचरी टीका तिने एका व्हिडीओ संदेशातून केली.
ईशनिदेंचा बळी ठरलेल्या पीडित मुलाच्या वडिलांशी मी संपर्क साधला. देशामध्ये शांतता आणि सहिष्णुता स्थापन व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. या घटनेतून जगात वाईट संदेश गेला आहे. आपण इस्लामचा संदेशच समजून घेतला नाही. इस्लामने शिकविलेली मूल्ये आणि चांगल्या वागणुकीचा आपल्याला विसर पडला, असे मलालाने म्हटले आहे.
पाकमधील लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. इस्लाम हा शांती आणि सहिष्णुतेचा धर्म आहे. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी लोकांचा जीव जात असेल, तर येथे कोणीच सुरक्षित राहणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)