कुलभूषण जाधव आणि पाकिस्तान

0
150

प्रासंगिक
भारतीय नौदलातून अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानात घातपाती कारवाया करणे आणि दहशत माजविणे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे जाधव हे ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचे हस्तक आहेत आणि हेरगिरीसाठीच ते पाकिस्तानात आले होते, असाही आरोप पाकने त्यांच्यावर ठेवला. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात एकतर्फी खटला चालवून त्यांना दोषीही ठरविण्यात आले आणि गेल्या १० एप्रिल रोजी फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. वास्तविक, हा जाधव यांच्यावर अन्याय आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची कुठलीही संधी न देता, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. त्याचे संतप्त पडसाद भारतभर उमटले नसते तरच नवल.
देशभर जसे संतप्त पडसाद उमटले, तसेच ते भारताच्या संसदेतही उमटले. संसदेत जाधव यांच्यासाठी न्याय मागताना विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे राजकारण केले असले, तरी सरकारनेही जाधव यांना न्याय मिळवून देऊ, कुठल्याही परिस्थितीत त्यांना भारतात सुरक्षित आणू, असा विश्‍वास गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याने, वातावरण निवळण्यास मदत झाली. कुलभूषण जाधव हे ‘रॉ’साठी काम करीत नव्हते, हे सरकारला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना झालेली फाशीची शिक्षा हा त्यांच्यावरील अन्याय आहे, हेही सरकारला माहिती आहे आणि म्हणूनच व वस्तुस्थिती लक्षात घेत सरकारने संसदेत निवेदन केले. भारतीय संसदेत जाधव प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटल्याने पाकिस्तानही थोडी नरमाईची भूमिका घेता झाला. कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरुद्ध अपील करायचे असल्यास त्यांना ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे आणि ते असे अपील करू शकतात, असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य बोलके आहे. कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यासाठी पाकिस्तान सरकार घाई करणार नाही, असे संकेतही आसिफ यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फसविले आहे. त्यांना ‘रॉ’चा हस्तक मानून जगाची दिशाभूल केली आहे. कुलभूषण जाधव ना हेर आहेत ना दहशतवादी, तरीही पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने जाधव यांना अटक केल्यापासून वर्षभराच्या आत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने पुरावे मागितले तर पाक द्यायला तयार नाही. पुरावे जर असतील तर ते द्यायला हरकत काय? पुरावे दिले तर भारत सरकारही जाधव यांच्या सुटकेची मागणी करणार नाही. पण, पाकजवळ पुरावेच नसल्याने ते द्यायचे कसे, हा त्यांच्यापुढील प्रश्‍न आहे. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्यासाठीच पाकिस्तान हा सगळा खोटारडेपणा करीत आहे, हे आता लपून राहिलेले नाही.
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे वृत्त भारतभर अगदी वार्‍यासारखे पसरले अन् संतापाची लाट उसळली. भारताच्या संसदेत हा मुद्दा जोरकसपणे उचलला गेला. त्याचप्रमाणे भारत सरकारनेही कडक भूमिका घेतली. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानला आपली भूमिका तत्काळ स्पष्ट करणे भाग पडले. भारतभर जो संताप व्यक्त झाला, त्याची दखल भारत सरकारने घेतली अन् कुठल्याही परिस्थितीत कुलभूषणला परत आणू, अशी पाकिस्तानला ऐकू जाईल एवढ्या जोरात आरोळी ठोकली! त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. काहीही झाले तरी आम्ही कुलभूषणच्या फाशीचा निर्णय बदलणार नाही, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली असली, तरी एकूण परिस्थिती लक्षात घेता, पाक दबावाला बळी पडेल, यात शंका नाही. भारतासारख्या बलाढ्य शेजार्‍याशी पंगा घेतल्याचे परिणाम पाकने याआधी भोगले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी शासक अविचाराने वागतील, असे वाटत नाही. असे असले तरी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला खोटे पाडण्यासाठी जोरकस प्रयत्न करणे भाग आहे.
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फासावर लटकवलेच, तर त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर फार विपरीत परिणाम होईल, या शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला ठणकावलेच आहे. भारताच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, अशी जी भूमिका पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख बाजवा यांनी घेतली आहे, त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पाकिस्तानी जनता तुटून पडू नये, दहशतवादी गट आक्रमक होऊ नयेत यासाठी नवाझ शरीफ आणि बाजवा यांना ती भूमिका घेणे भाग आहे. पाकिस्तानात पंतप्रधान जरी नवाझ शरीफ असले, तरी प्रत्यक्षात सगळेच निर्णय त्यांना घेता येत नाहीत. तिथे लष्कराचाही आणि आयएसआयचाही प्रभाव आहे. दहशतवादी व कट्‌टरपंथी गटांचाही प्रभाव आहे. त्यामुळे नवाझ शरीफ यांची समजा इच्छा असेलही की, कुलभूषण जाधव यांची शिक्षा मागे घ्यावी, तरीही ते तसे करू शकत नाहीत.
संसदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जे विधान केले आणि पाकिस्तानला खडसावले, ते योग्यच झाले. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात जेव्हा जाधव हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हापासूनच दोन्ही देशांमध्ये या मुद्यावर चर्चा सुरू होती. गेल्या मार्चपासून यंदाच्या मार्चपर्यंत भारत सरकारने किमान १३ वेळा तरी पाकिस्तान सरकारला विनंती केली की, कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांना भेटू द्यावे. एखाद्या देशाचा नागरिक जेव्हा परदेशात कुठल्याही समस्येत सापडतो तेव्हा त्याला अशा प्रकारची मदत आपल्या दूतावासाकडून मिळवण्याचा अधिकार आहे. परंतु, पाकिस्ताने कुलभूषण जाधव यांना हा अधिकार नाकारला. आंतरराष्ट्रीय नियमांचे पाकने उल्लंघन केले आहे. भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना जाधवपर्यंत पोहोचण्यासंबंधीची अनुमतीही पाकने दिली नाही, यावरूनच पाकचा दुष्ट हेतू स्पष्ट होतो. कुलभूषण जाधव पाकिस्तानात पोहोचले कसे, ते तिकडे कशासाठी गेले होते, हेही उघड झाले आहे. जर्मनी आणि अफगाणिस्तानने पाकिस्तान हा खोटारडा आहे, अशा शब्दात टीका केली आहे. पण, पाकने या कामी सहकार्य न करण्याचीच भूमिका सातत्याने घेतल्याने, पाकचे आडमुठे धोरण स्पष्ट झाले आहे.
कुलभूषण जाधव यांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यामागे पाकिस्तानचा हेतू प्रामाणिक नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. बलुचिस्तानमध्ये आणि कराचीत घातपाती कारवाया करून अशांतता निर्माण करण्याचा भारताचा इरादा आहे, भारतच अशा कारवायांमध्ये सामील आहे, हेच पाकिस्तानला जगाला दाखवून द्यायचे आहे, हेही स्पष्ट आहे. कुलभूषण जाधव यांना फाशी देऊन त्यांना अन्य कुठलाही हेतू साध्य करायचा नाही. भारत आमच्या अंतर्गत कारभारात दखल देत असल्याचेही त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगायचे आहे. हा त्यांचा केवळ कांगावा आहे. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानात हिंसाचार घडवून आणत होते, दहशतवादाला खतपाणी घालत होते, असा दुष्प्रचार पाकिस्तानने केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करून असंख्य निष्पाप लोकांचे जीव घेतले आहेत. भारताने पाकच्या दहशतवादाविरुद्ध अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भूमिका मांडली. पाक दहशतवाद्यांचे कसे पोषण करीत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, जागतिक समुदायाने कधीच भारताच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवला नाही. पण, जेव्हा अल् कायदा या संघटनेच्या अतिरेक्यांनी अमेरिकेतले ट्विन टॉवर उडविले, त्या वेळी जागतिक समुदायाचे डोळे उघडले अन् त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे ठरविले. आता आता कुठे आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या भूमिकेवर विश्‍वास ठेवायला लागला आहे. मात्र, जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकने कुलभूषण जाधव यांना पकडले अन् त्यांच्यावर खोटे आरोप करीत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यात जर पाकला यश मिळाले, तर भारतासाठी मोठीच डोकेदुखी होऊन बसणार आहे. मात्र, सुदैवाने अजूनतरी पाकिस्तानने केलेल्या आरोपांकडे जागतिक समुदायाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळे पाक निराश जरूर झाला असेल, पण त्याने आपले भारतविरोधी प्रयत्न सोडलेले नाहीत.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत बोलताना देशाला आश्‍वस्त केले की, भारत सरकार कुलभूषण जाधव यांना तज्ज्ञ वकील उपलब्ध करून देईल. या आश्‍वासनामुळे नागरिकांना थोडा धीर आला आहे. गरज पडल्यास भारत सरकार पाकिस्तानच्या राष्ट्रपतींशीही बोलणी करेल, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले असले, तरी दुर्दैवाने वास्तव हे आहे की, पाकिस्तानात सरकार आणि राष्ट्रपतींपेक्षा लष्कर-आयएसआय जास्त प्रभावी आहे. भारताच्या बाबतीत पाकचे जे धोरण आहे ते लष्कराच्याच सांगण्यानुसार निश्‍चित होत असल्याने कुलभूषण प्रकरणात न्याय मिळेलच, याची शक्यता धूसर आहे. कुलभूषण जाधव हे नौदलातून निवृत्त झाले आहेत, त्यांचा आणि सरकारचा काही संबंध नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केल्यानंतरही जर पाकिस्तान जाधव यांना नौदलातील अधिकारीच मानत असेल, तर पाकिस्तानचा हेतू आपण ओळखला पाहिजे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना सुरक्षितपणे भारतात परत आणायचे असेल, तर पाकिस्तानी लष्कराला निपटण्यासाठी भारत सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील. पाकच्या कारवायांना जशास तसे उत्तर दिले तर पाकिस्तान दोन नव्हे, चार पावलं मागे हटेल, यात शंका नाही. इतिहास साक्षी आहे. पाकिस्तानला प्रत्यक्ष युद्धात आपण १९६५, १९७१ आणि १९९९ साली चारीमुंड्या चीत केले आहे. आताही वेळ पडली तर पाकिस्तानात घुसून कुलभूषण जाधव यांना परत आणता येऊ शकते. कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने भारताने पाकला कडक संदेश असा द्यावा की, पुन्हा पाकची वाकडी नजर भारतावर पडू नये.
कुलभूषण जाधव या भारतीय अधिकार्‍याला हेर मानून पाकिस्तानी लष्कर त्या देशातील जनतेच्या भावना भडकावण्याचे काम करीत आहे. असे करून तिथले लष्कर या प्रकरणातील गुंतागुंत अधिकाधिक वाढवत आहे. त्यामुळे भारत सरकारने अधिकाधिक कडक भूमिकाच घेणे फायद्याचे ठरणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावताच, लष्करप्रमुख बाजवा यांनी तातडीने निकालपत्रावर शिक्कामोर्तब केले अन् त्या देशातील कथित राजकीय विश्‍लेषकांनी चर्चा सुरू केल्या. जाधव यांच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, असा सूर त्या चर्चांमधून निघाला. याला काही निवडक लोकांचा अपवादही होता. पाकने घाईघाईने कुठलाही निर्णय घेतला तर त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा तिथल्याच माध्यमांनी दिला हे बरे झाले. कुलभूषण जाधव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी सगळ्या भारतवासीयांनी एक होणे यावेळी गरजेचे आहे. भारत सरकार जर काही कठोर निर्णय घेणार असेल, तर आम्ही सगळे देशवासी सरकारसोबत आहोत, हे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. राजकारण करून स्वत:च्या स्वार्थी राजकारणाच्या पोळ्या शेकण्याची ही वेळ नाही…!
– डॉ. वाय. मोहितकुमार राव
९५४५८४७७९९