धनंजय बापट यांचे ‘हितगुज’

0
77

रविवारची पत्रे
मंगळवार ११ एप्रिल १७ च्या तरुण भारतमध्ये ‘हितगुज’ या सदरात धनंजय बापट यांचा ‘वाढता वाढता वाढे…’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. तरुण भारतच्या गौरवशाली वाचकपरंपरेवर प्रकाश टाकणार्‍या या सुंदर हितगुजात, तरुण भारतच्या मान्यवर संपादकांचा एकत्र असा अत्यंत दुर्मिळ फोटो आलेला आहे. अत्यंत श्रेष्ठ व ज्येष्ठ संपादकांना एकत्र पाहून अत्यानंद झाला. आजी संपादकसुद्धा बरोबर आहेत.
आदरणीय बाबुरावजी वैद्य, मामासाहेब घुमरे व लक्ष्मणराव जोशी या मान्यवरांच्या मार्गदर्शनात तरुण भारतसाठी लिहिण्याचे भाग्य लाभले आहे. तरुण भारतच्या सर्वच संपादकांनी विज्ञानलेखनासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे. वामनराव तेलंग, शशिकुमार भगत, सुधीर पाठक यांच्याबरोबरसुद्धा काम करण्याची संधी मिळाली.
अंतराळविज्ञान स्पर्धा, ज्ञानरंजन, वेध अवकाशाचा, हॅलेच्या धूमकेतूचा सातत्याने वृत्तान्त, विज्ञान प्रश्‍नमंजूषा असे अनेक उपक्रम त्या काळात तरुण भारतने यशस्वी केले.
साधारण १९८६-८७ मध्ये योगाभ्यासी मंडळाकडे पावले वळली. प्रज्ञाभारती वर्णेकर तिथे ‘योगप्रकाश’चे संपादक होते. त्यांच्या मार्गदर्शनात शिकताना हळूहळू विज्ञानलेखनाकडचा कल कमी कमी होत गेला. धनंजय बापट यांच्या ‘हितगुजा’मुळे या गोष्टींना उजाळा मिळाला. त्यांना मनापासून धन्यवाद! सर्व ज्येष्ठ संपादकांना साष्टांग नमस्कार करून, माझ्या पुढील संपादकीय वाटचालीसाठी त्यांच्या शुभाशीर्वादाची याचना करतो.
डॉ. विश्‍वेश्‍वर सावदेकर
९०९६२१०८४७

शुकदासांची सूक्ती सुधा!
स्वामी विवेकानंदांचे निस्सीम भक्त, स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा, जिल्हा बुलडाणाचे संस्थापक शुकदास महाराज यांचे ४ एप्रिल २०१७ रोजी देहावसान झाले. त्यांनी ६० वर्षे अव्याहत गरीब, अपंग, अनाथ, दीनदुबळे यांची नि:स्वार्थ, मनोभावे सेवा केली. सुमारे दीड कोटी रुग्णांची सेवा करून त्यांना व्याधीमुक्त केले. ते खरे कर्मयोगी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन उपेक्षितांना वाहून घेतले होते. ते खर्‍या अर्थाने दासांचेही दास होते. त्यासाठी त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला. इतके करून त्यांनी आपल्या ज्ञानाचे अवडंबर कधीच केले नाही. ‘मनाचा मवाळु, दीनांचा कनवाळु त्याचे गळा माळ असो नसो’ या संत तुकयांच्या उक्तीप्रमाणे ते स्वार्थरहित वृत्तीचे होते.
या प्रचंड कार्यासोबतच त्यांनी आपले विचारधन (सुमारे सातशे वचनांचे) आम्हा सामान्य लोकांसाठी मुक्त हस्ते उधळलेले आहे. या नि:स्पृह संताने त्यांच्या त्या संग्रहाला ‘मालकी नसलेली बोधवचने’ असे मार्मिक नाव दिले आहे. केवढी ही अत्युच्च कोटीतील प्रसिद्धिपराङ्‌मुख वृत्ती! त्यापैकी काही वचनं वानगीदाखल :-
मनाची क्षुद्रता आणि दारिद्र्य व्यक्तिमत्त्वाला प्रभावहीन करतात. चार पुरुषार्थ ज्याचे जवळ आहेत तो वीर, अनासक्त होऊन राहतो तो महावीर. थोरांनी क्षुद्र व्यक्तीच्या टीकेची दखल घेऊ नये. घेतल्यास थोरपणा कमी होऊन सामान्यांना महत्त्व प्राप्त होते. व्यथित होणार्‍या जवळच व्यथा सांगावी. अन्यथा दुसर्‍याच्या दु:खाने सुखावणारे लोक आहेतच. रागीट आणि रोगीट माणसे कामाची नसतात. माळेतील मणी ओढणे म्हणजे मनाला आत ओढण्याचा प्रयत्न. युक्तिवाद म्हणजे तत्त्वज्ञान नसते. कृती शिल्लक राहते. आकृती लोप पावते म्हणून तनाकडे दुर्लक्ष करून वर्तनशील व्हावे. दु:खाची खांदेपालट म्हणजे सुख. तुमचे तुम्हाला कळायला पाहिजे. बेताल बोलून तोल गेला म्हणजे माणसाचे मोल कमी होते. चढताना आणि उतरताना पळत नसतात. डोकं पूजनीय आणि पाय वंदनीय असतात.
करमत नसेल तर ‘कर्मरत’ राहा. मूर्खांना आणि शहाण्यांना उपदेश करू नये. केल्यास परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. दुसरेच मरत असतात ही प्रत्येकाची धारणा. मृत्यूच्या दिशेने आपणही सरकत आहोत, हे जाणवत नाही.
साधे व्याकरण शिकताना कर्ता सोडता येत नाही. मग विश्‍वाचा जो निर्माता आहे तो अमान्य कसा करता येईल?
रागात गातात, पण रागात बोलतात हे मला माहीत नाही.
एखादा तरी श्रवण करणारा असावा म्हणून मी मौन धारण केले आहे. अधिकार दाखवण्यापेक्षा अधिकार वाढवा.
सौंदर्यापेक्षा औदार्य व्यक्तिमत्त्वाला खुलविते. ज्याच्याजवळ जाता येत नाही तो उच्च आसनावरील सामान्य माणूस असतो. बाहेरचे पाहताना डोळे उघडावे लागतात. आत पाहताना डोळे बंद होतात. साधे अपेंडिक्स काढताना भूल द्यावी लागते. मग आत्म्यापासून शरीर अलग करण्याचे फार मोठे ऑपरेशन कोमात गेल्याशिवाय शक्य आहे का?
जन्माला आलेला मरतो, मग मीदेखील जन्मास येऊन बरेच दिवस झालेत! मी जर उत्तेजित होत नसेल तर माझी जीत आहे. मरण ज्याला विचलित करू शकत नाही तो मुक्त.
रा. ना. कुळकर्णी
जयप्रकाश नगर, नागपूर

बापाचं राज्य आहे का!
करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी शेतकरी रोहिदास कांबळे यांना उलटं टांगून मारेल अशी धमकी दिली. तुझं जगणं मुश्कील करील, असेही म्हटले. आमदार पाटील यांनी मोबाईलमधील आवाज माझा आहे अशी कबुली दिली, परंतु धमकीचा उद्देश चांगला होता, असे म्हणतात. कोणता चांगला उद्देश होता हे जनतेला सांगा ना! आ. पाटील, खा. प्रा. गायकवाड या शिवसेनेच्या नेत्यांचे वागणे उद्धटपणाचे आहे. एकाने जाहीरपणे धमकी दिली, तर दुसर्‍याने विमानातील कर्मचार्‍याला सर्वांसमोर चपलेने मारले. सत्तेचा माज चढला आहे, परंतु बिनविरोध सत्ता हातात आली नाही. भाजपाचा पाठिंबा आहे. चिमूटभर सत्ता हातात आली व वागणे जसे संपूर्ण भारतात यांचे राज्य आहे. ‘हम करे सो कायदा,’. स्वत: शिवसैनिक म्हणता, वागणे हिटलरप्रमाणे आहे. आदर्श शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा फासू नका. बेजबाबदार वागण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? शेतकर्‍यांविषयी प्रेम दाखवितात. सरकारी कामे नीट होऊ देत नाही. मोर्चे, संपाला उधाण आले आहे. दुसरीकडे अशी वागणूक. ‘मुँह में राम, बगल में छुरी, समाजाला सर्व समजते. तो दुधखुळा नाही. एक दिवस सत्तेवरून खाली आणतील. वागण्यावर नियंत्रण ठेवा. नम्रता अंगी बाणा. कसेही वागायला तुमच्या बापाचं राज्य नाही, तर बाप्याच इंगा दाखवेल.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

‘आप’का क्या होगा
जनाबें आली…?
दिल्लीच्या चांदनी चौक विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपा- अकाली दलाचे मनजिंदरसिंह सिरसा हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. सत्ताधारी आम आदमी पार्टीचा उमेदवार तिसर्‍या स्थानावर फेकला गेला. मागील निवडणुकीत तब्बल ४६ टक्के मते घेणार्‍या आप पक्षाला धड १० टक्केसुद्धा मते मिळाली नाहीत.
खरेतर दिल्लीकरांनी आप पक्षाला दिल्लीच्या सरकारची सूत्रे दिली होती, पण केजरीवालांना झटपट पंतप्रधान व्हायचे होते. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’प्रमाणे त्यांनी आपला कारभार सुरू केला. ऊठसूट मोदींचा विरोध, नकारात्मक आणि निराशेचे राजकारण यात ते एवढे गुरफटून गेले की, आपण दिल्लीचे मुख्यमंत्री नव्हे तर पंतप्रधान आहोत, या भ्रमात ते राहिले आणि उरलेली कसर त्यांच्या नवरत्नांनी पूर्ण केली! मग तो भ्रष्टाचार असो की महिला अत्याचार!
बरं, असेही नाही की, जनतेने त्यांना मधामधात वेकअप कॉलपण दिले. नुकत्याच पार पडलेल्या गोवा, पंजाब विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने सपाटून आपटी खाल्ली. मोठ्या मनाने पराभवाला सामोरे जाण्यापेक्षा या उतावीळवीरांनी ईव्हीएम मशीनला दोषी ठरविले. जनता यांची ही मर्कटलीला पाहून कंटाळली.
केजरीवालांचा प्रवास आंदोलक ते राजकीय सोंगाड्या व्हाया दिल्लीचे मुख्यमंत्री असाच राहिला. आतातर अवघ्या १० दिवसांत दिल्ली नगर महापालिकेच्या तीन ठिकाणी निवडणुका आहेत. अजूनही हा पक्ष झालेल्या पराभवातून काहीही धडा घ्यायच्या मन:स्थितीत दिसत नाही. शेवटी आप पक्षाने आम जनतेची प्रतारणा केली, जनतेच्या विश्‍वासाला तडा पोहोचवला, उथळ राजकारण करताना हा पक्ष ‘टॉप टु बॉटम’ कधी पोहोचला, हे त्यांना कधी कळलेच नाही! केवळ एका निवडणुकीवरून पक्षाचे भवितव्य सांगणे कठीण असले, तरी ‘बुडत्याचे पाय खोलात’ असल्याची चिन्हे नक्कीच दिसत आहे. एवढे मात्र खरे आहे की, ज्यांनी ज्यांनी मोदींवर वैयक्तिक हल्ले केले, त्या सोनिया गांधी असो, समाजवादी पितापुत्र असो, की केजरीवाल असो, मोदींपुढे ते हतबल असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्याच्या निवडणुका मग त्या भलेही गल्ली ते दिल्ली, कोणत्याही प्रकारच्या असो, भाजपाचा अश्‍वमेधाचा घोडा विरोधकांना धूळ चारत २०१९ कडे दमदारपणे कूच करत आहे…
डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७

तूच माझी येडाई!
तूच माझी तुळजा भवानी!!
पारा चाळीशीपार गेलेल्या मराठवाड्यात, चैत्राच्या रणरणत्या उन्हात, आई तुळजा भवानी आणि माता येडाई आदिशक्तीचा यात्रोत्सव! मोठ्या श्रद्धाभावाने व कोणत्याही त्रासाला न जुमानता जमलेली ही भोळ्याभाबड्या भक्तांची महामांदियाळी! वारुळातून मुंग्या निघाव्यात त्याप्रमाणे जिकडे बघावे तिकडे भक्तांची गर्दी! मिळेल त्या ठिकाणी, कुणी फाटक्या झाडाच्या सावलीत, कुणी वाहनाच्या सावलीत, कुणी काठ्यांच्या आधारावर कापडाच्या पालाच्या सावलीत, तर असंख्य उघड्या आकाशाखाली! आराधी आणि आराध्यांच्या संभळ, झांज, ढोलकी, हलगीच्या आवाजाने सारा आसमंत रोमांचित! आई राजा उदो उदोचा जयघोष! डोक्यावर आपल्या पूर्ण क्षमतेने तळपणारा मार्तंड, अंगातून वाहणार्‍या घामाच्या धारा आणि प्रसन्न मुखांमधून पवित्र मातावंदना –
गारं डोंगराची हवा अन्,
माझ्या आंबेला सोसना गारवा!
अंगार्‍यावरून अनवाणी चालत असतानाही एवढ्या उच्च कोटीची शीतलता निर्माण करण्याचे महान तत्त्वज्ञान यांच्याकडे कुठून आले असेल? यांच्या पंखांत बळ कुठून येत असेल?
पाय भाजून काढणार्‍या रस्त्यांवर देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या, अनवाणी भक्तांच्या लांबच लांब रांगा! स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, अव्यंग-दिव्यांग…! एक पोर बापाच्या खांद्यावर आणि दुसरे मातेच्या कडेवर! वाटलं, धावतपळत जावं आणि त्यांच्या पायांवर डोकं टेकवावं अन् त्यांच्या चरणावरील पवित्र रज मस्तकी धारण करावी! हे माते, तूच माझी येडाई, तूच माझी तुळजा भवानी!
सोमनाथ देविदास देशमाने
९९२३५४३४८०

जब चिडियॉं चुग गयी खेत!
शेतकर्‍यांना कर्जमाफी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेतील सर्व विरोधी पक्षांनी भाजपा सरकारविरुद्ध आवाज उठवीला. शिवसेना इतर वेळी शेतकर्‍यांच्या बाजूने उभी होते, परंतु या वेळी सत्तेच्या हव्यासापायी ती मूग गिळून बसली. कॉंग्रेस पक्षाने या कर्जमाफीसाठी चांदा ते बांदा संघर्ष यात्रा सुरू केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शे.का.प., समाजवादी पार्टी, युनायटेड जनता दल, रिपाइं (कवाडे गट), एम.आय.एम. हे यामध्ये सामील झाले. शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यामुळे त्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे, असे या सर्व विरोधकांचे म्हणणे आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊन केवळ दोनच वर्षांचा काळ लोटला आहे. आत्महत्या करण्यापर्यंत शेतकर्‍यांची मजल जावी इतके कर्ज काही दोन वर्षांतच त्यांचेवर झाले नाही. याचा अर्थ तो पूर्वापार कर्जबाजारी आहे. महाराष्ट्रात दीर्घकाळ कॉंग्रेस पक्षाचे राज्य होते. तेव्हा मात्र त्या पक्षाने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही किंवा तो का कर्जबाजारी होतो याची शहानिशा करून त्यांना हव्या त्या सवलतीही प्रदान केल्या नाहीत. या वेळी ज्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शेतकरी वर्ग व खेड्यातील जनता शेतकर्‍यांची आत्महत्या, नोटबंदी इत्यादी कारणांवरून भाजपाला नाकारेल हे गृहीत धरून आज एकत्र आलेले सर्व पक्ष स्वस्वार्थासाठी परस्परांविरुद्ध लढले. त्यामुळे भाजपाचीच सरशी झाली. तेव्हा जर हे सर्व एकजुटीने लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे आता पुन्हा केवळ सत्ताप्राप्तीच्या उद्देशानेच हे मोर्चे निघत असून, शेतकर्‍यांबद्दलचे हे ‘पुतना मावशीचे’ प्रेम आहे.
यासाठी विरोधी पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढाच शेतकरीही दोषी आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकर्‍यांसाठी जीवघेणी ठरत असली तरी सरकारकडून, व्यापार्‍यांकडून त्याची जी अवहेलना होते त्यासाठी त्याने कोणतेही कडक पाऊल आतापावेतो उचलले नाही. तोसुद्धा स्वत:चा विचार न करता पक्षीय राजकारणातच गुरफटून राहिला. शेतीचे कर्जही त्याने अवांतर कामासाठी वापरले. दुबळ्या परिस्थितीतही मोठेपणासाठी अवास्तव खर्च केला. अनेक शेतकर्‍यांनी तर कर्ज भरण्याची क्षमता असूनही निवडणूक आली की कर्ज वसुली थांबते अथवा माफ होते, असे समजून कर्जाचा भरणा केला नाही. या निवडणुकीतही ते भाजपा लाटेत वाहून गेले. त्यामुळे आता त्यांची, विरोधी पक्षांची ‘अब पछतावत क्या फायदा, जब चिडियॉं चूग गयी खेत’ अशी अवस्था झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात-
‘‘शहराकडे चालला प्रवाह, तो थांबवावा नि:संदेह
सर्वांचा गावीच होईल निर्वाह, ऐसी योजना करावी’’
साहेबराव घोगरे
मो. ८१४९८७४०४६

पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर, डॉक्टरांचे काय?
पत्रकारांवर होण्यार्‍या वाढत्या हल्ल्यांची दखल घेत ‘पत्रकार हल्लाविरोधी कायदा’ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नुकतेच विधेयक मंजूर करून केले. शासनाने पत्रकारांवरील हल्ल्याची गंभीर दखल घेतली. परंतु राज्यात डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांची दखल घेण्याची गरज मात्र राज्य सरकारला वाटत नाही. या उलट डॉक्टरांनी केलेल्या संपावर दडपशाहीचा बडगा दाखवून कोणतेही ठोस अथवा प्रभावी आश्‍वासन न देता तो संप निकामी करण्याचा व अवैध ठरविण्याचा ‘मोठेपणा’ सरकारने दाखविला. वास्तविक डॉक्टरांचा संप हा एक वादाचा विषय जरी ठरला असला तरी सर्वसामान्यांची सेवा शुश्रूषा करण्याचा विडा उचललेल्या या डॉक्टर्सवर वाढते हल्ले पाहता त्यांच्या सुरक्षेसाठीदेखील असाच कायदा होणे गरजेचे आहे.
वास्तविक सरकारने डॉक्टरांवरील सतत होणार्‍या हल्ल्याच्या घटनांची कारणमीमांसा करून त्याची तेवढीच गंभीरपणे दखल घेणे अपेक्षित होते. डॉक्टरांनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे व सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांच्या जिवाला काही वेळेस रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्याकडून प्रसंगी नक्कीच धोका निर्माण होतो.
त्यामुळे पत्रकार हल्लाविरोधी कायदा झाला त्याच धर्तीवर ‘डॉक्टर हल्लाविरोधी कायदा’देखील करण्यात यावा जेणेकरून डॉक्टर्सदेखील निर्धास्तपणे आपले पवित्र कर्तव्य पार पाडत राहतील. डॉक्टर्ससाठीदेखील असा हल्लाविरोधी कायदा काळाची गरज आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना वैद्यकीय क्षेत्रात वारंवार घडत असलेल्या संपामुळे सर्वसामान्यांची होणारी गैरसोय थांबेल.
राजीव दारव्हेकर
९०९६३२२२००