‘आप’ले ठेवायचे झाकून…

0
112

अग्रलेख
राजकारणात कुणीच ‘आप’ले नसते, तसेच कुणीही परकेदेखील नसते. त्यामुळे राजकारणात ज्याला यश मिळवायचे असते त्याने ‘आप’ले बघावे… पण, अरविंदाला हे कळत नाही. तो सतत दुसर्‍याचेच बघत असतो. त्याला अण्णांनी सांगितले, देशाचे बघ. मात्र, देशही आपला असतो, हे सांगायला अण्णा विसरले. आता आपला देश आणि दुसर्‍यांचा देश, असे देशाच्या बाबत होऊ शकत नाही, इतके सामान्य ज्ञान आपल्या या असामान्य शिष्याला नक्कीच असेल, असे अण्णांना वाटले असेल. मात्र, अरविंदाला नेहमीच दोन देश दिसत राहतात. एक देश ‘आप’ला अन् दुसरा देश हा तुपला. म्हणजे मराठीत आपले-तुपले असा वाक्‌प्रचार रूढ आहे, हे त्याला कळण्याचे काही कारण नाही, पण तरीही आपले झाले की मग तुपलेच उरते, हे मात्र त्याला अलीकडच्या काळात चांगलेच कळले आहे. त्याने कायम एकच धडा गिरविला आहे- ‘आपले ठेवायचे झाकून अन् दुसर्‍याचे पाहायचे वाकून!’ आता जे करायचे ते अत्यंत प्रामाणिकपणे, असे त्याचे त्याने ठरविले आहे. आता या प्रामाणिकपणाच्या त्याच्या व्याख्याही वेगळ्या आहेत. म्हणजे ‘आप’ण जे काय करतो ते प्रामाणिकच असते, याच्यावर त्याचा ठामबीम काय असते तसा विश्‍वास आहे. त्यामुळे अर्थमंत्री जेटलींनी अरविंदावर टाकलेल्या केसचा खर्च त्याने दिल्ली सरकारमधूनच करण्याची दिल्लगी केली. जवळपास साडेतीन कोटी रुपये वकिलाची फी त्याने शासकीय खर्चाने दिली. ‘कॅग’ला हे पाहावले नाही. ‘कॅग’वाल्यांना प्रामाणिक माणसांची काहीच कदर नाही. खरे सांगायचे तर अरविंदासारख्या उच्चकोटीच्या सत्यवादी, प्रामाणिक, कष्टाळू, मनमिळू, जर्दाळू, हळूहळू असे सगळेच ‘ळू’ असलेल्या माणसाची कदर केली जायला हवी. तरीही लोक त्याला ‘आप यहॉं आयें किस लिए?’ असे विचारतात. तो एक भारी केस आहे, असाच सार्‍यांनी समज करून घेतला आहे. म्हणून तो काही बोलला की, लोक त्याच्यावर केस टाकतात. अलीकडे तर तो मुख्यमंत्री म्हणून त्याच्या कार्यालयात कमी अन् कोर्टात जास्त असतो. त्याच्या ‘तारीख पे तारीख’ सुरू असतात. त्याने तो इतका पिचून गेला आहे की, आताशा कुणी त्याला कुठल्या कार्यक्रमासाठीही तारीख मागायला आले की तो दचकतो. किंचाळतो. विव्हळतो… बरे, न्यायालयेदेखील इव्हीएम मशीनसारखेच झाले आहेत. ते अरविंदाच्या विरोधातच असतात. मागे नितीन गडकरी यांनी केस टाकल्यावर न्यायालयाने गडकरींचीच बाजू घेतली. त्याचा साहजिकच प्रामाणिक अरविंदाला खूप राग आला. पण, नंतर अरविंदाने माफी मागितली आणि सुटका करून घेतली. हे बेटे मुद्दाम जिथे तिथे कमळ, कमळ करत असतात. आता राष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला. त्यात चित्रपटांना ‘सुवर्ण कमळ’च देण्यात येते. खरेतर अरविंदाला त्यावरही आक्षेप घ्यायचा आहे. कोर्टाच्या तारखा अन् नवे आरोप करून नव्या केसेस स्वत:वर दाखल करून घेणे, या नव्या उपक्रमातून वेळ मिळाला की, तो यावरही आक्षेप घेणार आहे. ‘सुवर्ण कमळ’च का? एखाद्या चित्रपटाला ‘सुवर्ण झाडू’ का नाही? उत्तरप्रदेशच्या ‘आपटबार’नंतर राहुल गांधी गप्प गप्प आहेत. एखादा माणूस लग्न न करताही इतका पडेल चेहर्‍याचा कसा असू शकतो, असाही प्रश्‍न अरविंदाला पडला होता. अरविंदाला असे प्रश्‍नच सतत पडत असतात. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तो खरेतर राजकारणात आला, मात्र आता त्याचे त्यालाच खूप प्रश्‍न पडतात अन् ते तो जनतेलाच विचारत सुटला आहे. आता राहुल गांधी भेटल्यावर तो हाच सवाल त्यालाही करणार आहे. खरेतर देशात राहुलबाळाच्या पणजोबांची व नंतर आज्जीची सत्ता असताना त्यांनी चित्रपटांना ‘सुवर्ण कमळ’च पुरस्कारार्थ का ठेवावे? बरे, सुवर्ण कमळ, रौप्यही कमळच… त्या ऐवजी सुवर्ण पंजा किंवा त्या आधी सुवर्ण गाय-वासरू, असे का नाही बदलले, असे ‘झाडू’न सारे सवाल अरविंदाच्या डोक्यात येत असतात. खरेतर आता दिल्ली मनपाच्या निवडणुका सुरू आहेत. आचारसंहिता लागू आहे. असे असताना ‘कमळ’ बक्षीस देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. हे खरेतर आता उद्धव दिल्लीत भोजनाला आला असताना त्याला सांगायचा विचार अरविंदाच्या मनात आला. चित्रपटाला ‘सुवर्ण धनुष्य’ अधिक चांगले वाटले असते. मात्र, मराठी माणसांचे सगळेच कसे ‘कासव’गतीने चालते, असे अरविंदाचे ठाम मत असल्याने, त्याने ठाकर्‍यांची भेट घेण्याच्या मनसुब्याच्या ठिकर्‍या उडविल्या. ‘अरविंद बाळाचे भलतेसलते चाळे’ असे का, असा सवाल अण्णांसह अनेकांना पडला. मग बरेच जण त्याच्यापासून दूर झाले. कधीकाळी त्याने २०१५ मध्ये दिल्लीत आपोआप ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. दिल्ली जिंकल्यावर त्याची अवस्था ‘दिलही मे जो खिंचतीं हैं’ अशी झाली. गुजरातचा सीएम जर देशाचा पीएम बनू शकतो, तर मग दिल्लीच्या सीएमपासून तर दिल्लीचे सिंहासन वितभराच्या अंतरावरच आहे, असे त्याला वाटले. त्यात गैर असे काहीच नाही. एकतर तो अरविंदा आहे. त्याला असे नाही वाटणार तर कुणाला? म्हणून मग त्याने देश ‘आप’ला करण्याकडे वाटचाल सुरू केली. सार्‍या देशात फिरून तो, ‘आप की नजरोंने समझा प्यार के काबील मुझेऽऽ’ असे गाणे म्हणू लागला. त्यामुळे दिल्लीचे त्याचे आपले राहिले अभागे अन् इतरच राज्ये लागली मागे, अशी त्याची गत झाली. त्यातच त्याच्या पारदर्शक, प्रामाणिकपणाच्या चिंधड्या उडाल्या. एकतर इव्हीएम मशीन त्याच्यावर कोपली. काय आहे, आता मशीन बेईमान आहे, असे म्हणता, तर २०१५ मध्ये काय याच मशिना प्रामाणिक होत्या का, असा सवाल इव्हीएम मशीनला पडला आणि मग तो जनतेलाही समजला. म्हणजे नैतिक भाजपाला आपणच काय तो पर्याय आहोत, या समजाने संतत्वाचा आव आणून वावरणार्‍या अरविंदाला ‘मी बाई संतीन अन् माह्यामांग दोन-तीन’ असे जनताच समजू लागली. त्यामुळे ‘ओठनिवडणुकीत’ जिंकणारे केजरीवाल ‘पोटनिवडणुकीत’ जमानत जप्तीवर आले. आता ही पोटनिवडणूक का? तर यात पोटाचा सवाल आला. अरविंदासोबत जेवणाचा रेट २० हजारांवर गेला. त्यामुळे अरविंदा पडला. लहानपणापासूनच मात्र त्याचे ‘पल्लो पन लल्लोच नाही’ असे धोरण, त्यामुळे आताही अनामत जप्त झाल्यावरही त्याचे मुजोरी (हे राजौरीसारखेच वाटते) गार्डन सुरूच आहे. त्यावर तोच म्हणाला, ‘‘पोटनिवडणूक तो झांकी हैं, दिल्ली मनपा अभी बाकी हैं…’’
देवा! या अरविंदाला माफ कर… तो काय करतोय, हेच त्याला कळत नाही. मोदींचा विजय हा आपो‘आप’च होतो, असे त्याला वाटते. अरविंदासारख्यांनीही निवडून यावे, असे मोदींना वाटते. त्यामुळे ते झाडू हाती घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवितात. ते लोकांना झाडू दाखवितात. केवळ तेच नाही तर भाजपाचे आणि भाजपाला मानणारे ‘झाडून’ सारेच हातात झाडू घेऊन सफाई करतात. आतावर देशाने ‘हाथ की सफाई’ पाहिली, आता कमळाची स्वच्छता बघत आहेत…