सीरियात आत्मघाती स्फोट, १२६ मृत्युमुखी

0
121

अलेप्पो, १६ एप्रिल
सीरियामध्ये आत्मघाती कार बॉम्बस्फोटात १२६ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यात ६८ बालकांचाही समावेश आहे. प्रवासी वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे. यातील जखमींची नेमकी आकडेवारी मिळू शकली नाही.
द सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्सनुसार, आत्मघाती हल्लेखोर एक व्हॅन चालवत होता. नागरिकांना घेऊन जाणार्‍या बसेसजवळ येऊन त्याने स्फोट घडवून आणला. यात १२६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.
सीरियन अपोजिशन रेस्क्यू सर्व्हिसनुसार सरकार आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या करारानुसार पश्‍चिम अलेप्पो येथील फुआ आणि कफराया या शहरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत होते. त्यावेळी हल्ला करण्यात आला.
आत्मघाती हल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नसली तरी सरकारी प्रसारमध्यमांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. एक आठवड्यापूर्वी झालेल्या रासायनिक हल्ल्यात १२६ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)