जिराफच्या बाळंतपणाचे १२ लाख लोक साक्षीदार!

0
166

न्यूयॉक, १६ एप्रिल 
नवीन तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे अमेरिकेतील एका मादी जिराफाच्या बाळंतपणाचे शनिवारी प्रत्यक्ष प्रसारण करण्यात आले. या घटनेचे आंतरजालावर १२ लाख लोक साक्षीदार ठरले.
न्यूयॉर्कजवळील हार्पर्सविला या शहरातील एका छोट्याशा प्राणिसंग्रहालयात हा जन्माचा सोहळा झाला. एप्रिल नावाच्या १५ वर्षीय मादी जिराफाने मादी जिराफालाच जन्म दिला. जन्मतःच एप्रिलने आपल्या बाळाचे सर्वांग चाटून काढले आणि ४५ मिनिटांनी हे पिल्लू चालू लागले. या पिलाचा जन्मदाता असलेला ऑलिव्हर नावाचा नर जिराफही या प्रसंगी साक्षीदार ठरला.
ही एप्रिल या जिराफाची चौथी कालवड आहे, मात्र या प्राणिसंग्रहालयातील पहिली जिराफ कालवड आहे. ऑलिव्हरचे मात्र हे पहिलेच अपत्य आहे. या पिलाचे नाव ठेवण्यासाठी स्पर्धाही घेतली जाणार आहे.
या प्राणिसंग्रहालयाची यूट्यूबवर स्वतःची वाहिनी आहे. त्यावरून या प्रसंगाचे थेट प्रक्षेपण केले. किमान १२ लाख लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिले. हे प्राणिसंग्रहालय खासगी असून फेब्रुवारी महिन्यापासून प्रक्षेपण सुरू केले होते. विशेष म्हणजे या चित्रणात अश्‍लीलता असल्याचा आरोप करून कोणी तरी तक्रार केली होती. त्यावेळी यूट्यूबने ही वाहिनी काही काळ खंडित केली होती. घ(वृत्तसंस्था)