श्रीनगरचा चिंताजनक संकेत

0
122

दिल्ली दिनांक

जगात भारताच्या निवडणूक आयोगाचे कौतुक होत असताना, विरोधी पक्षांनी त्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. याने पुन्हा आंतरराष्ट्रीय जगतात भारताच्या प्रतिष्ठेवर प्रश्‍नचिन्ह लावण्याची संधी पाकिस्तानला मिळणार आहे. काश्मीर खोर्‍यात कधीही मुक्त वातावरणात निवडणुका झालेल्या नाहीत, त्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली व्हाव्यात, अशी मागणी पाकिस्तान व खोर्‍यातील नेते करत आलेले आहेत. त्यांच्या त्या अपप्रचाराला या घटनांनी बळ मिळणार आहे.
••
दहा विधानसभा जागांचे निकाल सत्तारूढ भाजपा व कॉंग्रेस- दोन्ही पक्षांसाठी सुखद असले, तरी श्रीनगर लोकसभा निवडणुकीत झालेले ८ टक्के मतदान चिंताजनक आहे. काश्मीर खोर्‍यातील स्थिती सुधारण्याऐवजी अधिक गंभीर होत आहे, असे जे म्हटले जात होते, मतदानाच्या या आकड्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. यातील आणखी एक गंभीर पैैलू म्हणजे, श्रीनगर लोकसभेतील ३८ मतदान केंद्रांवर फेरमतदान झाले असताना, त्यात फक्त २ टक्केच मतदान झाले. यातील २७ केंद्रांवर तर एकही मत टाकले गेले नाही! याचा चुकीचा संदेश काश्मीर खोर्‍यात, देशात व जगभरात जाणार आहे. काश्मीर खोर्‍यातील स्थितीसाठी भारत आम्हाला दोष देत असतो; पण काश्मीरची जनताच भारतासोबत राहण्यास तयार नाही, याचा पुरावा म्हणून मतदानाचे हे आकडे जगात दाखविले जाणार आहेत. देशात दहा विधानसभा निकालांची चर्चा होईल, पण जगात मात्र श्रीनगर लोकसभा मतदानाचे आकडे प्रसारित केले जातील. पाकिस्तानचे माहिती तंत्र या कामी सक्रियही झालेले असेल.
नेताच नाही!
काश्मीरमध्ये भारतसमर्थक नेतृत्व नाही, ही समस्या उग्र होत आहे. फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांच्या रक्तातच गद्दारी आहे. मेहबुबा मुफ्ती आपला प्रभाव पाडण्याच्या स्थितीत नाहीत, त्यांच्या पक्षावर त्यांची पकड ढिली होत आहे. नोकरशाहीवर त्यांचा वचक नाही आणि राज्याचे राज्यपाल एन. एन. वोरा हे एक नोकरशहा आहेत. वोरा हे देशाचे गृहसचिव राहिलेेले आहेत. युपीए सरकारने त्यांना काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून पाठविले. ते चांगले प्रशासक असतील; पण आज काश्मीरला गरज आहे जनभावनांना साद घालणार्‍या नेत्याची! काश्मीरचा प्रश्‍न विकासाशी संबंधित नाही, असे म्हटले जात होते. ते खरेही आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीर खोर्‍याला देशाशी जोडणार्‍या एका भूमिगत मार्गाचे उद्घाटन झाले. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांचे मार्मिक भाषण झाले. तरीही श्रीनगरच्या जनतेने मतदानावर बहिष्कार घातला. श्रीनगरमध्ये जनभावनांशी जुळणार्‍या राज्यपालाची आवश्यकता आहे. राज्यपाल कशी योग्य भूमिका बजावू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक! कोणत्याही राज्यपालाने केला नसेल एवढा प्रवास नाईक यांनी आपल्या राज्यात केला. जनसमस्या, जनभावना समजावून घेतल्या. राज्यात मुख्यमंत्री असतानाही, राज्यपाल कोणती भूमिका बजावू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. नाईक राजकीय नेते असल्याने जनभावना, जनसमस्या याची त्यांना जाणीव आहे. ती वोरा यांना असू शकत नाही. ते मुळातच नोकरशहा आहेत. आज काश्मीरला गरज आहे ती राजकीय अनुभव असणार्‍या राज्यपालाची. असा एखादा राज्यपाल श्रीनगरमध्ये नियुक्त झाल्यास, त्या नियुक्तीचा मोठा फायदा राज्याला होऊ शकेल.
पोटनिवडणुकीचे निकाल
पाच राज्यांत झालेल्या दहा विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी उत्साहवर्धक आहेत. यात कॉंग्रेसलाही आशेचा किरण आहे. राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाची जमानत जप्त झाली. दोन वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या… भाजपा अकाली दल उमेदवाराने ही जागा जिंकली. मात्र, या मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराला मिळालेली २५ हजार मते आश्‍चर्याचा धक्का देणारी आहेत. दिल्लीत कॉंग्रेसचा सफाया झाला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसला एका विधानसभा मतदारसंघात २५ हजार मते मिळणे पक्षासाठी एक उपलब्धी आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आम आदमी पक्ष, भाजपा व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना पर्याय म्हणून समोर येत होता. ती शक्यता आता संपली आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सांभाळता येत नव्हती आणि त्यांनी पंजाबात उडी घेतली. नवज्योतसिंग सिद्धूसारखा हाती आलेला मोहरा गमावला. केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हावयाचे होते. त्या नादात त्यांनी सिद्धूची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य केली नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काही जागा मिळाल्या, मात्र सत्ता मिळाली नाही. पंजाबमधील प्रचार संपताच केजरीवाल गुजरातमध्ये गेले. गुजरात काबीज करून दिल्लीकडे स्वारी करावयाची, असे मनसुबे त्यांनी बांधले होते. ते सारे कोसळले. यात भाजपाचा फायदा झाला तसाच कॉंग्रेसचाही फायदा झाला व होत आहे. कॉंग्रेसची सारी व्होट बँक आम आदमी पक्षाकडे सरकली होती, ती काही प्रमाणात कॉंग्रेसकडे परत येत असल्याचे दिल्ली पोटनिवडणुकीत दिसलेे. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष लढला असता, तर भाजपासाठी ते सोपे झाले असते. कारण, सरकारविरोधी मते कॉंग्रेस व आम आदमी पक्षात विभागली गेली असती. गुजरातमध्ये भाजपाचे संघटन चांगले असल्याने भाजपाला फार त्रास होणार नाही, असे मानले जाते.
मशीनवर दोषारोपण
निवडणुकीत विजयी होणारा पक्ष आपल्या जागांची संख्या सांगत असतो, तर पराभूत होणारा पक्ष आपल्या मतांची टक्केवारी सांगत असतो. यात आता बदल करावा लागेल. निवडणुकीत पराभूत होणारा पक्ष आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर दोषारोपण करू लागला आहे. केजरीवाल यांना दिल्लीत ७० पैकी ६७ जागा मिळाल्या तेव्हा त्यांना या मशीन चांगल्या वाटत होत्या, आता त्यांना या मशीनमध्ये दोष दिसत आहे. हीच बाब मायावतींची. त्यांना उत्तरप्रदेशात बहुमत मिळाले, तेव्हा या मशीन चांगल्या होता. अखिलेश यादव यांना बहुमत मिळाले तेव्हा मशीन चंागल्या होत्या. आज कॉंग्रेससह सार्‍या पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटून आले. या मशीनऐवजी पुन्हा एकदा मतदानपत्राचा वापर करावा, अशी त्यांची मागणी आहे. जगात भारताच्या निवडणूक आयोगाचे कौतुक होत असताना, विरोधी पक्षांनी त्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. याने पुन्हा आंतरराष्ट्रीय जगतात भारताच्या प्रतिष्ठेवर प्रश्‍नचिन्ह लावण्याची संधी पाकिस्तानला मिळणार आहे. काश्मीर खोर्‍यात कधीही मुक्त वातावरणात निवडणुका झालेल्या नाहीत, त्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली व्हाव्यात, अशी मागणी पाकिस्तान व खोर्‍यातील नेते करत आलेले आहेत. त्यांच्या त्या अपप्रचाराला या घटनांनी बळ मिळणार आहे.
दोन व्हिडीयो
काश्मीर खोर्‍यातील दोन व्हिडीयोंनी वातावरण पुन्हा तापविले आहे. एका व्हिडीयोत एक काश्मिरी युवक सीआरपीएफच्या एका जवानाला मारहाण करताना दिसत आहे; तर दुसर्‍या एका व्हिडीयोत लष्कराच्या एका जीपच्या बोनेटवर एका काश्मिरी युवकाला बांधून फिरविण्यात येत असल्याचे दाखविले गेले आहे. स्वाभाविकच या दुसर्‍या व्हिडीयोची चर्चा अधिक होत आहे. मानवाधिकार संघटना पुढे सरसावल्या आहेत. लष्कराच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली जाते. त्यावर उपाय म्हणून लष्कराने एका काश्मिरी युवकाला आपल्या जीपच्या बोनेटवर बांधले. ही जीप सात खेड्यांमध्ये फिरली. एकही दगड मारला गेला नाही. कारण, जीपच्या बोनेटवर बांधला असलेला काश्मिरी युवक! काश्मीर खोर्‍यात युद्धजन्य स्थिती आहे आणि युद्धात सारे काही क्षम्य असते. काश्मीर खोरे आज भारतात आहे, ते मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यांच्यामुळे नाही, तर भारतीय लष्कराच्या जवानांमुळे आहे! काश्मीर खोर्‍याचे हे एक कठोर वास्तव आहे- जे श्रीनगरमध्ये झालेल्या ८ टक्के मतदानाने समोर आणले आहे…!
-रवींद्र दाणी