पुरोहितांना जामीन मिळण्याची शक्यता

0
119

मालेगाव स्फोट प्रकरण
आरोपींची आणखी कोठडी आवश्यक नाही : एनआयए
नवी दिल्ली, १७ एप्रिल 
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असल्याने आरोपींच्या आणखी न्यायालयीन कोठडीची आता गरज नाही, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.
आता आम्हाला आरोपींची कुठलीही चौकशी करायची नसल्यामुळे आम्ही त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणार नाही, असे एनआयएच्या वकिलाने न्या. आर. के. अग्रवाल आणि न्या. ए. एम. सप्रे यांच्या न्यायासनापुढे सांगितले. यामुळे या प्रकरणातील आरोपी लेफ्ट. कर्नल श्रीकांत पुरोहित आणि इतरांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे. शिवाय, आरोप निश्‍चित करण्यावरील युक्तिवाद सुरू असल्याने आरोपींच्या कोठडीची काहीच गरज नाही, अशी भूमिका एनआयएने घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत हे प्रकरण स्थगित केले आहे. एनआयएने दीर्घकाळपर्यंत आरोपपत्र सादर न केल्याने आमची अटक बेकायदेशीर ठरली आहे. त्यामुळे आता आम्हाला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका पुरोहित व अन्य एक आरोपी सुधाकर द्विवेदी यांनी दाखल केली होती. (वृत्तसंस्था)