मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

0
195

भारिप कार्यकर्त्यांचे कृत्य
औरंगाबाद, १७ एप्रिल 
महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि विद्यमान मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आज सोमवारी दुपारी येथील सुभेदारी अतिथिगृहात भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
गायकवाड यांनी आज सकाळी ११ वाजता विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर दुपारी ते आपल्या पत्नीसह सुभेदारी अतिथिगृहात थांबले होते. दुपारी तीनच्या सुमारास भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आणि त्यांच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या खोलीत प्रवेश केला आणि मारहाण केली. दरम्यान, गायकवाड यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली असल्याचे समजते.
मुंबईच्या दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रत्नाकर गायकवाड आपल्या पत्नीसह औरंगाबादेत आले होते. विश्रांतिगृहात असताना अचानक झालेल्या मारहाणीमुळे गायकवाड हतबल झाले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी धाव घेतली आणि सर्व आरोपींना अटक केली. मारहाण करणार्‍यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेचा जनतेत राग आहेच. तथापि, रत्नाकर गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)